Pune Murder: तरुणाचा खून; 'त्या' माजी उपसरपंचाचा जामीन अर्ज फेटाळला
esakal January 08, 2025 04:45 AM

Pune Latest News: पेट्रोल चोरी केल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणात नऱ्हेगावच्या माजी उपसरपंचाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हा आदेश दिला.

सुशांत सुरेश कुटे (रा. चैतन्य बंगला, मानाजीनगर, नऱ्हे) असे जामीन फेटाळण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कुटे हा नऱ्हेगावचा माजी उपसरपंच आहे. समर्थ नेताजी भगत (वय २० वर्षे, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी,अभिनव कॉलेज रोड, नऱ्हे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत नेताजी सोपान भगत यांनी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे येथील मानाजीनगर भागात २५ नोव्हेंबर पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास कुटे यांच्या ऑफिससमोर हा प्रकार घडला होता. समर्थ हा त्याच्या गाडीतील पेट्रोल संपल्याने तो दुसऱ्या गाडीतून पेट्रोल काढत असल्याच्या संशयावरून आरोपी गौरव संजय कुटे व त्याच्या इतर दोन ते तीन साथीदारांनी त्याला लाथा बुक्यांनी, काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यात त्याचा मृत्यू झाला होता.

या गुन्ह्यात कुटे याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्यास जिल्हा सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. गुन्हा झाल्यापासून अर्जदार आरोपी फरार आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबामध्ये आरोपीचे नाव आलेले आहे.

गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला अटक करणे गरेजेचे आहे. त्यामुळे जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. बोबटकर यांनी केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.