वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘मी माझे सारे जीवन काँग्रेससाठी अर्पण केले आहे. काँग्रेसच्या प्रगतीत माझाही वाटा आहे. तथापि, आज या पक्षात मला कोणीही विचारत नाहीत. काँग्रेसच्या बैठकांचे आमंत्रणही मला मिळत नाही,’ अशी खंत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसच्या संघटनेसंबंधी एक बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. तिथे कमलनाथ उपस्थित होते. त्यांनी भर बैठकीत आपली व्यथा स्पष्ट शब्दांमध्ये व्यक्त केली. या बैठकीला मध्यप्रदेश काँग्रेस शाखेचे अध्यक्ष जीतू पटवारी, मध्यप्रदेशातील विरोधी पक्षनेता उमंग सिंघार, कमलनाथ, दिग्विजयसिंग तसेच काँग्रेसच्या राज्यशाखेचे अन्य नेते उपस्थित होते. कमलनाथ यांनी व्यक्त केलेल्या व्यथेला आणखी एक माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांनीही स्पष्ट समर्थन दिले.
अब्बास यांची सारवासारवी
प्रदेश काँग्रेस समितीचे प्रवक्ते अब्बास हाफिज यांनी कमलनाथ यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. कमलनाथ आमचे सर्वात ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही सर्व त्यांच्याशी जोडले गेलो आहोत. ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान करणे, ही काँग्रेसची परंपरा आहे. कमलनाथ यांनी त्यांची नाराजी स्पष्टपणे व्यक्त केली आहे. तथापि, आम्ही सर्वजण एक आहोत आणि एकत्रितरित्या पक्षाला पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी सारवासारवी करण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
ऑनलाईन बैठक
काँग्रेसची ही बैठक ऑन लाईन होती. कमलनाथही या बैठकीत आपल्या निवासस्थानातून समाविष्ट झाले होते. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करतानाही मला विचारले जात नाही. बैठका केव्हा होणार आहेत, याची माहितीही दिली जात नाही. या बैठकांसंबंधी मला केवळ वृत्तपत्रांमधूनच माहिती मिळते, अशा अनेक तक्रारी कमलनाथ यांनी केल्या, अशी माहिती नंतर देण्यात आली.
सुरात सूर
कमलनाथ यांच्या सुरांमध्ये दिग्विजयसिंग यांनीही त्यांचा सूर मिसळला. कमलनाथ यांच्या तक्रारी योग्य आहेत. ज्येष्ठ नेत्यांनी काँग्रेससाठी खूप काही केले आहे. त्यांचा यथोचित सन्मान ठेवला जावा, एवढीच अपेक्षा आहे. पक्षात नव्या नेतृत्वाने पुढे येण्यास ज्येष्ठ नेत्यांनी कधीही विरोध केलेला नाही. मात्र, त्यांना टाळले जाऊ नये, एवढेच आमचे म्हणणे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भाजपची खोचक टिप्पणी
भारतीय जनता पक्षात ज्येष्ठ नेत्यांचा आदर केला जात नाही, अशी टीका काँग्रेसकडून नेहमी केली जाते. आता काँग्रेसला कमलनाथ यांच्या वक्तव्याच्या रुपाने ‘घरचा आहेर’ मिळाला आहे. काँग्रेसनेच कधीही ज्येष्ठांचा मान ठेवलेला नाही, हे कमलनाथ यांच्या व्यथेवरुन सिद्ध होते, अशी टिप्पणी भारतीय जनता पक्षाने केली.