भुवनेश्वर - ‘जगात जेव्हा तलवारीच्या बळावर साम्राज्यविस्ताराचा काळ होता, तेव्हा आपल्या सम्राट अशोकांनी येथे शांततेची मार्ग स्वीकारला होता. देशाच्या वारशाच्या प्रेरणेतूनच आपण आंतरराष्ट्रीय समुदायाला सांगू शकतो की, भविष्य ‘युद्धा’त नाही तर ‘बुद्धा’त आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले.
भुवनेश्वरमध्ये १८ व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘सध्या भारताचे म्हणणे जग लक्षपूर्वक ऐकले जात आहे. भारत स्वतःच्या विचारांबरोबरच दक्षिण जगाचा आवाजही प्रबळपणे जगासमोर मांडत आहे.
‘तलवारीच्या बळावर जग जेव्हा साम्राज्यविस्तार करण्यात गुंतले होते, त्यावेळी सम्राट अशोकांनी शांततेच्या मार्ग स्वीकारला. भारताच्या वारशाची हीच ताकद होती. याच वारशामुळे ‘भविष्य युद्धात नाही तर बुद्धात आहे,’ हे भारत जगाला सांगू शकतो.’
या संमेलनाला उपस्थित असलेल्या परदेशातील भारतीयांबद्दल मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘परदेशस्थ भारतीयांना मी कायमच भारताचे राष्ट्रदूत मानतो. जगभरातील तुमच्यासारख्या सहकाऱ्यांना मी तुम्हाला भेटतो, तुमच्याशी बोलतो तेव्हा मला खूप आनंद होतो. मला जे प्रेम मिळते, ते मी विसरू शकत नाही.
तुमचे प्रेम, आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी असतात. भारत केवळ लोकशाहीची जननी नाही तर येथील जनतेच्या आयुष्याचा भागच लोकशाही आहे. आपल्याला विविधतेचे शिक्षण घ्यावे लागत नाही, तर ती आपल्या जीवनाचा आधारच विविधता आहे. म्हणूनच भारतीय जिथे जिथे जातात तिथे त्या समाजाचा भाग बनतात.
त्या देशाचे नियम आणि परंपरेचा सन्मान ते करतात आणि पूर्ण निष्ठेने तो देश आणि तेथील समाजाची सेवा करून त्यांच्या प्रगतीत आणि समृद्धीसाठी योगदान देतात. त्याच वेळी, आमच्या हृदयात भारतही वसलेला असतो.' ‘प्रवासी तीर्थ दर्शन योजने’अंतर्गत विशेष प्रवासी रेल्वेला मोदी यांनी आज हिरवा झेंडा दाखविला.
परदेशस्थ भारतीयांबद्दल मोदी म्हणाले...
- जगभरातून मिळणारे प्रेम, आपुलकी आणि प्रतिष्ठा याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो
- तुमच्यामुळेच जगभरात मी माझी मान ताठ असते
- गेल्या दहा वर्षांत मी जगातील अनेक नेत्यांना भेटलो आहे. जागतिक पातळीवरील नेते अनिवासी भारतीयांची प्रशंसा करतात
- तुम्ही तेथील समाजात रूजविलेल्या सामाजिक मूल्यांमुळेच हे शक्य
- तुमची सुरक्षा आणि कल्याण याला आमचे सर्वोच्च प्राधान्य
- अनिवासी भारतीय मग ते कोणत्याही देशातील असोत, संकटाच्या काळात त्यांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे
- गेल्या दोन वर्षांत १४ दूतावास आणि वाणिज्य दूतावास उघडण्यात आले आहेत
- ‘ओव्हरसीज सिटिझनशिप ऑफ इंडिया’ची (परदेशातील भारतीयांचे नागरिकत्व) व्याप्तीही वाढविण्यात येत आहे
- परदेशातील नागरिकांनी ‘मेड इन इंडिया’ खाद्य पाकिटे, कपडे आणि अन्य उत्पादने विकत घ्यावी.
जागतिक पातळीवर काम करीत असताना प्रत्येक टप्प्यावर परदेशातील भारतीय महत्त्वपूर्ण ठरत आहेत. परदेशात काही संकट निर्माण झाले तर नरेंद्र मोदी यांचे सरकार पाठीशी असल्याची त्यांना खात्री असतो. आपल्या परदेशस्थ भारतीयांच्या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.
- एस.जयशंकर, परराष्ट्र मंत्री
भारताचे कौतुक
त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्ष क्रिस्टिन कार्ला कांगालू यांनी या संमेलनात व्हर्च्युअली सहभाग घेतला. त्या म्हणाल्या, ‘‘जगाच्या विकासात भारताचे योगदान उल्लेखनीय आहे. जगातील पहिले विद्यापीठ तक्षशिला येथे इ.स.पूर्व ७०० मध्ये स्थापन झाले होते. आयुर्वेद हे औषधाचे मूळ म्हणून ओळखले जाते. बीजगणित, त्रिकोणमिती आणि ‘कॅल्क्युलस’ देखील प्रथम भारतात विकसित केले गेले.’’ तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनाला विविध ५० देशांमधील अनिवासी भारतीय आणि भारतीय वंशाचे नागरिक उपस्थित आहेत.