TCS shares Rally: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी एकीकडे शेअर बाजारात घसरण सुरू असतानाच दुसरीकडे रतन टाटांची आवडती कंपनी टीसीएसचे शेअर्स रॉकेट बनले आहेत. शेअर्स वाढल्याने गुंतवणूकदारही श्रीमंत होत आहेत. बीएसईवर सुरुवातीच्या व्यवहारात आयटी कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांनी वाढले.
शेअर बाजारातील सर्व निर्देशांक लाल रंगात व्यवहार करत आहेत, तर टीसीएसच्या वाढीमुळे आयटी निर्देशांकातही वाढ होताना दिसत आहे. आज टीसीएसच्या शेअर्समध्ये एवढी वाढ का झाली ते जाणून घेऊया?
शेअर्स का वाढत आहेत?TCS चे शेअर्स आज 2 कारणांमुळे वाढत आहेत. सर्वप्रथम, कंपनीने काल आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. दुसरे म्हणजे, लाभांश जाहीर झाल्यामुळे शेअर्समध्ये वाढ झाली आहे. आज शुक्रवारी वृत्त लिहिपर्यंत कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह 4,279.50 रुपयांवर व्यवहार करत होते. त्याच वेळी, सध्याचे मार्केट कॅप देखील 15.49 लाख कोटी रुपये झाले आहे.
गुरुवारी (9 जानेवारी) तिमाही निकाल जाहीर करताना, TCS ने सांगितले की 31 डिसेंबर 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफा वार्षिक 12% ने वाढून रु. 12,380 कोटी झाला आहे. मागील आर्थिक वर्ष 2023-24 च्या याच तिमाहीत तो 11,058 कोटी रुपये होता.
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (TCS) तिसऱ्या तिमाहीच्या निकालांसह लाभांशही जाहीर केला आहे. कंपनीने प्रति शेअर 10 रुपये लाभांश आणि 66 रुपये विशेष लाभांश जाहीर केला आहे. TCS ने यापूर्वी प्रति शेअर 20 रुपये आणि पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीसाठी प्रति शेअर 10 रुपये लाभांश जाहीर केला होता.
ब्रोकरेज फर्म बर्नस्टीनने 4,700 च्या टार्गेटसह आपले उत्कृष्ट रेटिंग कायम ठेवले आहे. टीसीएसच्या शेअर्सनी मोठा नफा मिळवून दिला आहे. मागील वर्षी 4 जून 2024 रोजी तो 3593.30 रुपयांवर होता.
2 सप्टेंबर 2024 रोजी तो 28 टक्क्यांनी वाढून 4585.90 रुपयांवर पोहोचला. हा शेअर्सचा विक्रमी उच्चांक आहे. सध्या कंपनीचा शेअर 4,279.45 रुपयांवर व्यवहार करत आहे.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.