भारताचा माजी फिरकीपटू आर अश्विनने ऋषभ पंतची स्तुती करत बरंच काही सांगितलं आहे. त्याच्या फलंदाजीत खरंच खूप क्षमता असल्याचं सांगितलं. इतकंच काय तर त्याने आपल्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घेतला तर नक्कीच प्रत्येक सामन्यात शतक ठोकेल. अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर सांगितलं की, ‘आम्हाल पंतला योग्य पद्धतीने सांगावं लागेल की काय करायचं आहे. सॉलिड बॅटिंग करायची आहे की इंटेंटसह खेळायचं आहे. त्याने खूप काही धावा केलेल्या नाहीत. पण विना धावा करता तो अन्य फलंदाजांप्रमाणे खेळलेला नाही. पंतकडे खूप वेळ आहे आणि त्याला आपल्या क्षमतेबाबत माहिती होणं बाकी आहे. त्याच्याकडे सर्व शॉट्स आहेत. रिव्हर्स स्वीप, स्लॉग स्वीप आणि बरंच काही.. पण एकच त्रुटी आहे की, सर्व शॉट उच्च जोखिमेचे आहेत. आपल्या डिफेंसह तो निश्चित प्रत्येक सामन्यात धावा करेल. पण यासाठी 200 चेंडूंचा सामना करावा लागेल.’
आर अश्विनने पुढे सांगितलं की, त्याला फक्त आपला गेम शोधण्याची गरज आहे. जर तो त्यात यशस्वी झाला तर तो प्रत्येक सामन्यात 100 धावा करेल. मी कायम असं ऐकत मोठा झालो की, तुम्हाला संघर्ष करावा लागेल. पण सिडनीत पंतने एकाच सामन्याच्या दोन डावात वेगवेगळी खेळी केली. पहिल्या डावात त्याला काही दुखापत झाली आणि 40 धावा केल्या. पण त्याच्या या डावाची खूप काही चर्चा झाली नाही, ते चुकीचं आहे. दुसऱ्या डावात त्याने अर्धशतक ठोकलं. 29 चेंडूत त्याने ही कामगिरी केली त्याच्या या खेळीचं कौतुक झालं. प्रत्येक जण पहिल्या डावातील खेळीला विसरला आणि दुसऱ्या डावातील खेळीची स्तुती करू लागला.
आर अश्विनने पुढे पंतबाबत सांगताना म्हणाला की, ‘मी त्याला नेटमध्ये खूप गोलंदाजी केली आहे. तो आऊटच झाला नाही. त्याला एज मिळालीच नाही. एलबीडब्ल्यू मिळाला नाही. त्याचा डिफेंस सर्वात बेस्ट आहे. मी त्याला हे सांगण्याचा प्रयत्न केला. ऋषभबाबत एक चर्चा अशी आहे की तो खूप सारे शॉट्स खेळतो. त्याला कसोटीत संघर्ष करावा लागतो. जर कोणी ऋषभ पंतला डिफेंस करताना 10 वेळा आऊट झाल्याचं व्हिडीओ दाखवला तर मी माझं नाव बदलेन. ऋषभचा डिफेंस जगातील सर्वश्रेष्ठ डिफेंसपैकी एक आहे.’