नवी दृष्टी देणारी भन्नाट माणसे भेटीला
esakal January 11, 2025 01:45 AM

नवी दृष्टी देणारी भन्नाट माणसे भेटीला
‘स्वयं टॉक्स’चा मुंबईकरांसाठी उपक्रम

मुंबई, ता. १० : ‘स्वयं टॉक्स’ आणि ‘सकाळ’ समूह यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराष्ट्राची नवी सकाळ’ हा उपक्रम मुंबईत पुन्हा राबविण्यात येत आहे. यापूर्वी मुंबईसह संभाजीनगर, पुणे, सातारा, बंगळूर यांसह आठ शहरांत हा उपक्रम राबविण्यात आला. वांद्रे, पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिरात रविवारी (ता. १२) सकाळी १० ते सायंकाळी सहा हा कार्यक्रम आयोजित केला जाणार असून ‘सकाळ’ समूह सहआयोजक, तर ‘पी. एन. गाडगीळ अँड सन्स’ हे मुख्य प्रायोजक आणि ‘निमित्त’ हे सहप्रायोजक आहेत.

‘महाराष्ट्राची नवी सकाळ’ या कार्यक्रमात वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक आपण निवडलेल्या अनवट वाटेवरचा प्रवास उलगडून सांगणार आहेत. यामध्ये हेरंब कुलकर्णी हे त्यांनी यशस्वीरीत्या रुजवलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीबद्दल संवाद साधतील. फिनलँडमध्ये १४,००० विद्यार्थ्यांनी त्यांच्या उपक्रमाचा लाभ घेतला असून जगभरातील शिक्षण क्षेत्रात त्याचे स्वागत केले जात आहे. भारतीय रेल्वेत चीफ लोको इन्स्पेक्टर पदावर रुजू असलेले गणेश मनोहर कुलकर्णी ‘मेल ड्रायव्हर’ म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली आहे. ३४ वर्षांच्या नोकरीत त्यांना आलेले अनुभव त्यांनी ‘रुळानुबंध’ या पुस्तकात लिहिले आहेत. अनेक रोमांचकारी किस्से त्यांच्याकडून उपस्थितांना ऐकायला मिळतील. खाकी वर्दीतला रुबाब सांभाळून आफ्रिकेत पोलिस यंत्रणा उभारणारी महिला अशी ओळख असणाऱ्या पोलिस निरीक्षक धनश्री करमरकर या आपल्या २६ वर्षांच्या कारकीर्दीत घडलेले रोचक प्रसंग सांगणार आहेत. याशिवाय कुक्कुटपालन व्यवसायातून पाच ते सहा कोटींची उलाढाल करीत पाच हजार लोकांना रोजगार देणारे तरुण उद्योजक सौरभ तापकीर व मनोरंजन आणि माहितीप्रसार माध्यमांवर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा परिणाम होऊ शकतो का आणि झाला तर कसा, याबद्दल आनंदसागर शिराळकर मार्गदर्शन करणार आहेत.

..
गृह शिक्षणाची ओळख
गृह शिक्षण (होम स्कूलिंग) कसे असते, ते यशस्वी होते का? कोणते अडथळे येतात? या नावीन्यपूर्ण विषयाची ओळख आणि स्वानुभवाची गोष्ट कियारा आणि तिचे आई-वडील ‘महाराष्ट्राची नवी सकाळ’ या कार्यक्रमात सांगणार आहेत. तसेच, नृत्यांगना धनश्री आपटे यांच्या मार्गदर्शनाखाली भरतनाट्यममध्ये एमए आणि नृत्य विशारद झालेली दृष्टिहीन शिल्पा मेंदर्गी हिचा प्रवास डोळ्यात अंजन घालणारा ठरेल. या सर्व वक्त्यांशी डॉ. उदय निरगुडकर हे संवाद साधणार आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.