HbA1C : मधुमेहाची ही चाचणी कोणी आणि का करावी? त्याची पातळी किती पाहिजे?
BBC Marathi January 11, 2025 03:45 PM
Getty Images

बदललेली जीवनशैली, आहाराच्या चुकीच्या सवयी, व्यायामाचा अभाव, ताणतणाव यामुळे अलीकडच्या काळात अनेक गंभीर आजारांचं प्रमाण वाढत चाललं आहे. हा असाच एक सर्वत्र आढळणारा गंभीर आजार आहे.

मधुमेहाच्या संदर्भात एक सामान्य रक्तचाचणी सर्वांनाच माहित असते. मात्र HbA1C ही एक रक्ताची चाचणी आहे, ज्याद्वारे तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणाबद्दल अचूक माहिती मिळते.

तुम्हाला मधुमेह आहे की नाही आणि असल्यास तो नियंत्रणात आहे की नाही हे या चाचणीतून नेमकेपणानं लक्षात येतं.

ही चाचणी काय असते, ती कशी करतात, ती कधी आणि कोणी करायची असते या सर्व प्रश्नांचा आढावा घेणारा हा लेख.

रंगा राव यांना 10 वर्षांपासून मधुमेह आहे. त्यामुळे ते चांगला, पोषक आहार घेतात, दररोज व्यायाम करतात, दर सहा महिन्यांनी डॉक्टरांकडून तपासणी करून घेतात आणि औषधंदेखील घेतात.

मात्र, गेल्या महिन्यात सीताफळ पाहिले आणि रंगा राव यांच्या तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी लगेचच एक टोपलीभर सीताफळं विकत घेतली आणि घरी नेली. त्यानंतर ते दररोज एक सीताफळ खात होते.

"गेल्या 8 महिन्यांपासून मी माझ्या रक्तातील साखरेचं प्रमाण तपासतो आहे. या महिन्यात मला डॉक्टरांकडे जायचं होतं. मात्र, डॉक्टर रागावतील याची मला भीती वाटते आहे. त्यामुळे मी दोन तीन दिवसांपासून काहीही न खाता उपवास करतो आहे. डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी मी दुपारी आणि रात्री फक्त ज्वारीची भाकरी आणि अंडा करी एवढंच जेवलो," असं रंगा राव यांनी सांगितलं.

रंगा राव हॉस्पिटलमध्ये गेल्यावर त्यांना दिसलं की यावेळेस तिथे नवीन डॉक्टर आले आहेत. हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, जुने डॉक्टर दहा दिवसांच्या सुट्टीवर गेले आहेत आणि त्यांच्या जागी नवीन डॉक्टर आले आहेत. ते ऐकून रंगा राव यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मात्र, यावेळेस नेहमीप्रमाणे रंगा राव यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण, उपाशीपोटी (fasting sugar test) आणि जेवल्यानंतर तपासण्याऐवजी एक नवीन चाचणी करण्यास सांगण्यास आली. रंगा राव यांना ती रक्त चाचणी करायची नव्हती. मात्र डॉक्टरांनी सांगितल्यामुळे त्यांनी ती केली.

BBC

BBC

रंगा राव यांची फास्टिंग ग्लुकोज टेस्ट म्हणजे उपाशीपोटी असलेलं रक्तातील साखरेचं प्रमाण 150 mg/dl इतकं होतं. मात्र, जेवणानंतर रक्तातील साखरेचं प्रमाण 270 mg/dl झालं होतं. डॉक्टरांनी जी नवीन चाचणी करायला सांगितली होती त्यानुसार ते 9 टक्के होतं.

डॉक्टर रंगा राव यांच्याशी सर्वसामान्यपणे बोलले आणि त्यांनी काही नवीन औषधं लिहून दिली.

मात्र नवीन डॉक्टर अधिक कडक होते. त्यांनी रंगा राव यांना विचारलं, "रक्तातील साखरेचं प्रमाण का वाढलं?" डॉक्टरांना काय उत्तर द्यावं हे रंगा राव यांना समजत नव्हतं.

रंगा राव म्हणाले, "रक्तातील साखरेचं प्रमाण फारसं वाढलेलं नाही ना, डॉक्टर?"

त्यावर, "डॉक्टर कोण आहे? तुम्ही की मी?" असं डॉक्टरांनी म्हटल्यावर रंगा राव काहीही न बोलता गप्प बसले.

नवीन डॉक्टरांनी एक कागद आणि पेन घेतला, त्यावर काही आकडे लिहण्यास सुरुवात केली.

डॉक्टर म्हणाले की, रक्तातील साखरेचं प्रमाण तपासणाऱ्या चाचण्यांचे निष्कर्ष बदलते असतात. आपण आदल्या दिवशी काय खाल्लं यानुसार त्यात बदल होतात. मात्र या चाचणीचं तसं नाही.

डॉक्टरांनी रंगा रावा यांना पुढं सांगितलं की, या चाचणीला HbA1C असं म्हणतात. यात रक्तातील साखरेचं तीन महिन्याचं प्रमाण तपासलं जातं.

या चाचणीनुसार रक्तातील साखरेचं प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक वाढल्याचं दिसतं आहे. असं असल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात नाही हे दिसतं आणि असं खूप जास्त प्रमाणात गोड खाल्ल्यामुळे होतं.

HbA1C चाचणी काय असते?

HbA1C चाचणी A1C चाचणी किंवा ग्लाकेटेड हिमोग्लोबिन किंवा हिमोग्लोबिन A1C चाचणी असंही म्हणतात. आपल्या रक्तात साखर ही ग्लुकोजच्या स्वरुपात असते. आपण जे अन्न खातो त्यातून हे ग्लुकोज रक्तात येतं.

हिमोग्लोबिन हे आपल्या रक्तातील एक प्रकारचं प्रोटिन असतं. रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढलं, की ते ग्लुकोज हिमोग्लोबिनला चिकटतं. हिमोग्लोबिनभोवती ग्लुकोजचं आवरण तयायर होतं. HbA1C चाचणीद्वारे हिमोग्लोबिनला चिकटलेलं ग्लुकोजचं प्रमाण तपासलं जातं.

HbA1C चाचणीतून तीन महिन्यातील (8 ते 12 आठवडे) रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण स्पष्ट होतं. याचा अर्थ, गेल्या तीन महिन्यात आपण खाल्लेल्या अन्नाद्वारे आपल्या रक्तात किती प्रमाणात साखर गेली होती हे त्यातून निष्पन्न होतं.

Getty Images

म्हणजेच यातून तीन महिन्यात सरासरी किती साखर रक्तात गेली हे दिसतं. साहजिकच या चाचणीत आपण आदल्या दिवशी किंवा दोन दिवस अगोदर काय खाल्लं होतं याचा परिणाम होत नाही.

ज्या लोकांना मधुमेहाची समस्या आहे त्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते. तसंच एखाद्याला मधुमेह झाला आहे का आणि एखादी व्यक्ती प्री-डायबेटिस (मधुमेह होण्यापूर्वीची स्थिती) प्रकारात आहे का, हे तपासण्यासाठी ही चाचणी केली जाते.

ही चाचणी करण्यासाठी उपाशीपोटी करण्याची आवश्यकता नसते. ती दिवसभरात कधीही करता येते. त्या दिवशी तुम्ही काय खाल्लं याचाही त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. कारण त्यातून रक्तातील साखरेची तीन महिन्यांची स्थिती स्पष्ट होते, एका दिवसाची नाही.

HbA1C चाचणीचा रिपोर्ट कसा समजून घ्यायचा?

ज्या लोकांना मधुमेह नाही अशांची हिमोग्लोबिन A1C पातळी सर्वसाधारणपणे 4 टक्के ते 5.6 टक्के असते. तर हिमोग्लोबिन A1C ची पातळी 5.7 टक्के ते 6.4 टक्के असल्यास त्याला प्रीडायबेटिक म्हणजे मधुमेह होण्यापूर्वीची स्थिती मानलं जातं. याचा अर्थ या पातळीत रक्तातील साखरेचं प्रमाण असल्यास अशा लोकाना मधुमेह होण्याचा मोठा धोका असतो.

तर 6.5 टक्के किंवा त्यावर रक्तातील साखरेचं प्रमाण असल्यास त्या व्यक्तीला मधुमेह असल्याचं मानलं जातं.

अशा लोकांना औषधं घ्यावी लागतात.

हिमोग्लोबिन A1C ची पातळी 9 टक्क्यांहून अधिक असली तर त्याचा अर्थ रक्तातील साखर अजिबात नियंत्रणात नाही. या स्थितीत शरीरातील काही अवयवांना अपाय होण्याचा किंवा त्यांची हानी होण्याचा मोठा धोका असतो.

HbA1C चाचणी कधी करायला हवी?

ज्या लोकांचं वय 45 वर्षांहून अधिक आहे अशांनी वर्षातून एकदा HbA1C करण्याचा सल्ला दिला जातो.

घरात पालक, भावंडांना मधुमेह असेल किंवा मित्रमंडळींमध्ये मधुमेह असेल तर दरवर्षी HbA1C चाचणी करणं योग्य ठरतं. मग अशावेळी तुमचं कितीही असलं तरी खबरदारी म्हणून ही चाचणी केली पाहिजे.

Getty Images

ज्या लोकांचं वजन जास्त आहे, ज्यांना उच्च रक्तदाब आहे किंवा ह्रदयविकाराची समस्या आहे आणि ज्याचं वय 30 ते 45 वर्षांदरम्यान आहे, अशांनी दर दोन वर्षांनी HbA1C चाचणी केलीच पाहिजे.

तुम्हाला जर मधुमेहाची काही लक्षणं जाणवत असतील तर अशा परिस्थितीतदेखील ही चाचणी करायलाच हवी.

प्री-डायबेटिस म्हणजे काय?

प्री-डायबेटिस किंवा मधुमेहपूर्व स्थिती म्हणजे आपलं शरीर जेव्हा रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवू शकत नाही. याचा अर्थ काही वर्षांनी शरीरातील काही अवयव नीट कार्यक्षम राहणार नाहीत आणि रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहणार नाही.

तुमच्या रोजच्या आहारात आणि जीवनशैलीत योग्य ते बदल केल्यास मधुमेह टाळता येऊ शकतो. चांगला पोषक आहार घेतल्यास रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्याची क्षमता शरीरात पुन्हा येते.

जर HbA1C चाचणीतून दिसत असेल की तुम्ही प्री-डायबेटिस (मधुमेह होण्यापूर्वीची स्थिती) स्थितीत आहात, तर अशा वेळा तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे.

HbA1C चाचणी कशी केली जाते?

ही एक सोपी रक्ताची चाचणी आहे. ती कोणत्याही मान्यताप्रात प्रयोगशाळेत केली जाऊ शकते.

तुमच्या रक्ताचा नमुना घेतला जातो आणि त्यानंतर ही चाचणी केली जाते. या चाचणीचा रिपोर्ट तुम्हाला त्याच दिवशी मिळतो.

Getty Images

या चाचणीतून तुमच्या रक्तातील गेल्या 2-3 महिन्यांमधील सरासरी साखरेचं प्रमाण समोर येतं. त्यामुळे उपवास केल्यानं, पाणी प्यायल्यानं किंवा चाचणीआधी जेवण केल्यामुळे HbA1C चाचणीच्या रिपोर्टवर काहीही परिणाम होत नाही.

अर्थात फक्त HbA1C चाचणीच्या रिपोर्टच्या आधारेच डॉक्टर औषधं देऊ शकत नाहीत.

उपाशीपोटी आणि जेवणानंतर केलेल्या रक्ताच्या चाचणीच्या रिपोर्टच्या आधारे डॉक्टरांना योग्य ती औषधं रुग्णाला देता येतात.

HbA1C चं प्रमाण योग्य असण्यासाठी काय करावं?

HbA1C रक्तातील साखरेचं तीन महिन्यातील सरासरी प्रमाण असल्यामुळे ते दोन किंवा तीन दिवस आहारात बदल केल्यामुळे किंवा औषधं घेतल्यामुळे कमी होऊ शकत नाही.

HbA1C योग्य पातळीत असण्यासाठी तुम्हाला जीवनशैलीत बदल करणं, दररोज व्यायाम करणं आणि आहाराच्या सवयींमध्ये बदल करणं आवश्यक असतं. असं किमान तीन महिने केल्यावरच रक्तातील साखरेचं योग्य ते प्रमाण राखता येतं.

Getty Images

ज्या लोकांना मधुमेह आहे आणि जे मधुमेहाची औषधं घेत आहेत, अशांनी HbA1C ची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज नियमितपणे औषधं घेतलीच पाहिजेत.

मधुमेह असणाऱ्यांनी ही चाचणी दर सहा महिन्यांनी करायलाच हवी.

HbA1C नक्की काय असतं?

आपण जो आहार घेतो, जे अन्न खातो त्यातून जे ग्लुकोज तयार होतं ते आपल्या पचनसंस्थेतून रक्तात जातं. त्यानंतर ते ग्लुकोज रक्तात फिरतं.

अर्थात रक्तात वेगवेगळे प्रोटिनदेखील असतात. हिमोग्लोबिन हे त्यातीलच एक असतं. ते लाल रक्तपेशींमध्ये असतं आणि शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम करतं. रक्तात मुक्तपणे फिरत असलेल्या ग्लुकोजचे कण या हिमोग्लोबिनला चिकटतात. त्याला ग्लायकेशन (glycation)म्हणतात.

BBC विविध स्थितीतील रक्तातील साखरेच्या प्रमाणाचे निकष दाखवणारा तक्ता. गर्भवती महिलांसाठी हे निकष लागू होत नाहीत.

ग्लुकोज चिकटलेलल्या हिमोग्लोबिनला ग्लायकेटेड हिमोग्लोबिन म्हणतात.

लाल रक्तपेशींचं जीवनचक्र दोन ते तीन महिन्यांचं असतं. त्यातून त्यांना गेल्या तीन महिन्यात किती ग्लुकोज चिकटलं हे लक्षात येतं. जर रक्तात साखरेचं म्हणजे ग्लुकोजचं प्रमाण अधिक असेल तर हिमोग्लोबिनला अधिक प्रमाणात ग्लुकोज चिकटलेलं असेल. HbA1C चाचणीतून रक्तातील साखरेचं ते प्रमाण समोर येतं.

ही चाचणी प्रत्येकासाठी आवश्यक आहे का?

रक्तातील ग्लुकोज (साखर) हिमोग्लोबिन प्रमाणेच अल्बुमिन, फेरिटिन आणि फायब्रिनोजेन सारख्या प्रोटिनलादेखील चिकटतं. मात्र प्रत्येकानंच या चाचण्या करण्याची आवश्यकता नसते.

ज्या लोकांना गंभीर स्वरुपाचा अनेमिया (रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण खूपच कमी होणं) चा त्रास आहे, ज्यांना मूत्रपिंडाची समस्या आहे, हिमोफिलिया सारखे रक्ताचे विकास आहेत आणि यकृताचे आजार आहेत अशा लोकांच्या बाबतीत HbA1C चाचणीचा रिपोर्ट विश्वसनीय नसतो

फक्त अशा लोकांनीच रक्तातील इतर प्रोटिनला चिकटलेल्या ग्लुकोजची पातळी तपासण्यासाठीच्या चाचण्या केल्या पाहिजेत.

लेखक डॉक्टर आहेत. या लेखात देण्यात आलेली माहिती जागरुकता वाढवण्यासाठी आणि शैक्षणिक दृष्टीकोनातून देण्यात आली आहे. आरोग्यासंदर्भातील कोणतीही समस्या किंवा तक्रार असल्यास डॉक्टराचं मार्गदर्शन घेणं आवश्यक आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.