Anti-Corruption Bureau : हातकणंगले 'पुरवठा'तील दोघे 'लाचलुचपत'च्या जाळ्यात; एक संगणक ऑपरेटर, तर दुसरा कंत्राटी कामगार
esakal January 11, 2025 03:45 PM

काल दुपारी येथील तहसील कार्यालय आवारात ‘लाचलुचपत’ने सापळा रचून कारवाई केली. साक्षीदारांच्या समक्ष घुणके व त्याचा साथीदार डोईफोडे याला २५०० रुपयांची लाच घेताना पकडले.

हातकणंगले : शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा प्राधान्य कुटुंब योजनेत नाव समाविष्ट करण्यासाठी अडीच हजार रुपयांची लाच घेताना हातकणंगले पुरवठा कार्यालयातील (Hatkanangale Office) खासगी संगणक ऑपरेटर (Computer Operator) सुभाष मधुकर घुणके (वय ३४, रा. घुणके मळा, यळगूड) व कंत्राटी कामगार शैलेंद्र महादेव डोईफोडे (२२, रा. सनगर गल्ली, पेठवडगाव) या दोघांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोल्हापूर उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या पथकाने पकडले.

या प्रकरणी हातकणंगले ठाण्यात (Hatkanangale Police Station) गुन्हा दाखल आहे. याबाबत विभागाने आणि पोलिसांनी दिलेली माहिती अशी : हातकणंगले येथील पुरवठा कार्यालयात वारंवार लाच मागितली जात होती. याबाबत तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्याकडेही तक्रार आली होती.

त्यानंतर त्यांनीही संबंधितांना ताकीद दिली होती. यातील तक्रारदार याचे नाव शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ योजनेंतर्गत प्राधान्य कुटुंब योजनेत ‘वरच्या साहेबांना सांगून समाविष्ट केले आहे’ असे सांगून घुणके याने तक्रारदाराकडे चार हजार रुपयांची मागणी केली होती. यात तडजोड होणार नसल्याचे घुणके याने तक्रारदार यांना सांगितले होते. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क साधला.

यानंतर काल दुपारी येथील तहसील कार्यालय आवारात ‘लाचलुचपत’ने सापळा रचून कारवाई केली. साक्षीदारांच्या समक्ष घुणके व त्याचा साथीदार डोईफोडे याला २५०० रुपयांची लाच घेताना पकडले. याबाबत दोघांविरोधात हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे यांचीही सखोल चौकशी केली जाणार आहे. पोलिस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, प्रकाश भंडारे, विकास माने, संदीप काशीद, सचिन पाटील, उदय पाटील, प्रशांत दावणे यांनी ही कारवाई केली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.