येरवडा परिसरातील चंद्रमा चौक ते होळकर पूलदरम्यान शनिवार, ११ जानेवारीपासून वाहतूक मार्गांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. हे बदल सैन्य दिन संचलनाच्या तयारीसाठी सकाळी ७ ते ११ या वेळेत लागू राहतील. वाहतूक बदलांची अंमलबजावणी १५ जानेवारीपर्यंत करण्यात येईल. या काळात वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी केले आहे. वाहनचालकांसाठी हा निर्णय तात्पुरता असला तरी तो सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी योग्य नियोजन करून पर्यायी मार्गांचा अवलंब करावा.
येरवड्यातील शादलबाबा चौक ते चंद्रमा चौक मार्गे खडकीकडे जाणारी तात्पुरती बंद करण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, अशी सूचना देण्यात आली आहे. शादलबाबा चौक, डॉ. आंबेडकर चौक, आळंदी चौक, विश्रांतवाडीतील साप्रस पोलीस चौकी आणि जुना होळकर पूल या मार्गांद्वारे वाहनचालकांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचता येईल.
तसेच विश्रांतवाडीकडून होळकर पूल मार्गे खडकीकडे जाणारी वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे. या बदलांमुळे प्रवासाच्या वेळापत्रकात अडथळा होऊ नये म्हणून वाहनचालकांनी नियोजन करून प्रवास करावा, असे प्रशासनाने सांगितले आहे. विश्रांतवाडी, साप्रस पोलीस चौकी आणि जुना होळकर पूल मार्गे त्यांच्या इच्छित स्थळी प्रवास करावा. बोपोडी चौक, खडकी बाजार आणि चर्च चौक दरम्यान होळकर पूल मार्गे येरवड्याकडे जाणारी वाहतूक तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
या मार्गांवरील प्रवासासाठी पाटील इस्टेट आणि वाकडेवाडी मार्गांचा वापर करावा. तसेच, जुन्या रस्त्यावरील अंडी उबवणी केंद्राजवळील (पोल्ट्री चौक) भुयारी मार्गातून मुळा रस्तामार्गे खडकी बाजाराकडे जाणारी वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. वाहनचालकांनी या बदलांनुसार योग्य नियोजन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे प्रशासनाने सूचित केले आहे.
Edited By: अक्षय बडवे.