बुलढाण्यात केस गळतीनंतर आता ब्ल्यू बेबी सिंड्रोमचे संकट
Marathi January 11, 2025 10:25 PM

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील 11 गावांमध्ये केस गळतीनंतर दूषित पाण्यामुळे होणाऱ्या ब्ल्यू बेबी चा धोका वाढल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय भूजल मंडळाच्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवालात जिल्ह्यातील भूजलात विषारी पदार्थ असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र याकडे आरोग्य विभाग व लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष केल्याने घाटाखालील राहणाऱ्या किडनीग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

गावातील पाण्यात नायट्रेटचं प्रमाण पाचपटीने वाढल्यामुळे त्या परिसरातील नागरिकांचे टक्कल पडत असल्याची शक्यता वर्तविण्यात आली. याच दरम्यान भूजल सर्वेक्षण विभागाने जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी केली.  यात नायट्रेटसह इतर विषारी घटकांचा समावेश असल्याची माहिती समोर आल्याने जिल्ह्यातील सर्व तालुके “ब्लू बेबी सिंड्रोम “च्या छायेत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या आजाराला वैद्यकीय भाषेत इन्फंट मेथेमो-ग्लोबीनेमिया असे  म्हटले जाते. या आजारामुळे बालकाच्या शरीरातील अवयव कार्यक्षमता कमी होण्याची शक्यता असते. बाळाच्या रक्तातील हिमोग्लोबिन कमी होते. ज्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा अथवा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यास त्याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, जळगाव जामोद, खामगाव, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मलकापूर व मोताळा या नऊ तालुक्यातील अनेक गावातील पाण्याची तपासणी सर्वेक्षण विभागाच्या वतीने करण्यात आली होती. या तालुक्यातील 135 पाण्याचे नमुने हे दूषित आढळून आले असून यात नायट्रेट व टीडीएस प्रमाण जास्त आढळले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.