- रिना भुतडा, करिअर समुपदेशक
शालेय जीवनातील ऑलिंपियाड परीक्षा विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता सादर करण्यासाठी आणि त्यांची विचारशक्ती, समस्या सोडविण्याची क्षमता आणि विश्लेषणात्मक कौशल्ये विकसित करण्यासाठी स्पर्धात्मक मंच तयार करतात. या परीक्षा नियमित अभ्यासक्रमाच्या पलीकडे जातात. या परीक्षांची काठिण्य पातळी थोडी जास्त असली, तरीसुद्धा वैयक्तिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आवश्यक कौशल्यांची या परीक्षांमुळे ‘जेईई’ व ‘नीट’सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी होते.
ऑलिंपियाड परीक्षांचे फायदे
सर्जनशील विचार करायला, गुंतागुंतीच्या समस्यांवर उपाय शोधायला प्रोत्साहन.
गणित, विज्ञान, तार्किक विचारांचे सखोल ज्ञान विकसित होते.
यशाची भावना निर्माण होते आणि आत्मविश्वास वाढतो. बहुपर्यायी प्रश्न सोडविण्याची सवय लागते.
ऑलिंपियाडची तयारी करताना विद्यार्थी वेळेचे व्यवस्थापन आणि कार्यांना प्राधान्य देण्याची कला शिकतात.
ऑलिंपियाड परीक्षा विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धा करण्याची संधी देते आणि त्यांना आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मानकांची ओळख करून देते.
ऑलिंपियाड परीक्षांमधून मिळालेले कौशल्य आणि रणनीती भविष्यातील महाविद्यालयीन प्रवेश परीक्षा जसे की जेईई व नीट आणि इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त ठरतात.
ऑलिंपियाड परीक्षा उत्कृष्टतेसाठी शिष्यवृत्ती, पुरस्कार आणि जागतिक स्तरावरील ओळख विद्यार्थ्यांना देतात.
प्रमुख ऑलिंपियाड परीक्षा
आयएनएमओ (इंडियन नॅशनल मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड) - ही गणितीय परीक्षा ‘आयआयटी-जेईई’च्या अपवादासह विशेष चाचण्या किंवा मुलाखतीद्वारे प्रमुख पदवीपूर्व कार्यक्रमातील प्रवेशासाठी संधी देते. ‘आयएनएमओ’ पुरस्कार विजेत्यांसाठी गुणवत्तेनुसार प्रवेशासाठी विशेषाधिकार खालील नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळतो.
आयआयटी कानपूर, बॉम्बे व गांधीनगर - बीटेक इन सीएससी, बीएस (मॅथ्स अँड कॉम्प्युटिंग), बीएस्स्सी इन स्टॅटिस्टिक्स आणि डेटा सायन्स, बीएस्स्सी इन मॅथ्स यांमधील निवडक जागांसाठी प्रवेश दिला जातो.
सीएमआय चेन्नई - बीएस्सी गणितासाठी थेट प्रवेश.
आयएसआय कोलकता - बॅचरल इन स्टॅटिटिक्स आणि बॅचलर इन मॅथ्यसाठी विशेष मुलाखतीद्वारे प्रवेश.
एनटीएसई (नॅशनल टॅलेंट सर्च एक्झाम) - दोन टप्प्यातील ही परीक्षा, ज्यामुळे शिष्यवृत्ती तसेच प्रवेश, नोकऱ्या, परदेशी विद्यापीठांमध्ये प्राधान्य मिळते.
एनएसईजेएस (नॅशनल स्टँडर्ड एक्झामिनेशन इन ज्युनिअर सायन्स)
आंतरराष्ट्रीय ज्युनिअर सायन्स ऑलिंपियाड - भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणारी महत्त्वाची परीक्षा.थेअरी आणि प्रायोगिक मूल्यमापनांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नैसर्गिक विज्ञानांप्रती रुची निर्माण करणारी जागतिक पातळीवरील स्पर्धा परीक्षा आहे.
प्री-रिजनल आणि रिजनल मॅथेमॅटिकल ऑलिम्पियाड - भारताच्या गणितीय ऑलिंपियाड कार्यक्रमाचे महत्त्वाचे टप्पे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुढील स्पर्धांसाठी मार्गदर्शक आहे.
ऑलिंपियाड परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि वैयक्तिक प्रगतीसाठी अमूल्य साधन आहे. या परीक्षांमुळे शिकण्याची प्रेरणा, जागतिक स्पर्धात्मकता, आत्मविश्वास विकसित करतात.