अक्षय शिंदे
जालना : महापलिकडून पाणी पुरवठा केला जात असताना याकरिता नळ कनेक्शन दिले जातात. मात्र काही जण अधिकृत नळ कनेक्शन न घेता अवैधपणे नळ जोडणी करून घेत असतात. अशा अवैध नळ कनेक्शन धारकांविरोधात महापालिका आता ऍक्शन मोडवर आली आहे. त्यांचा शोध घेऊन कारवाई करत थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा महापालिका आयुक्तांनी दिला आहे.
शहरातील अनाधिकृत नळ कनेक्शन धारकांविरोधात जालना शहर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे. आजपासून अनाधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीमला सुरुवात होणार आहे. जालना शहरात तब्बल ३० ते ३५ हजार अनाधिकृत नळ कनेक्शन असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली. त्यांचा शोध घेण्याची मोहीम राबविली जात असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दहा पथकांद्वारे घेणार शोध
दरम्यान शहरातील अनधिकृत नळ कनेक्शन शोधण्यासाठी महापालिकेने मोहीम राबवत आहे. या कामासाठी एका खाजगी एजन्सीची नेमणूक करण्यात आली असून १० पथकांमार्फत अनाधिकृत नळ कनेक्शनचा शोध घेतला जाणार आहे. हे पथक शहरातील वेगवेगळ्या भागात परिसरात फिरून शोध घेणार आहे. यानंतर या नळ कनेक्शन धारकांना नोटीस बजावत दंड आकारण्यात येणार आहे.
तर थेट फौजदारी गुन्हा
अनधिकृत नळ कनेक्शन घेऊन वापर करणाऱ्यांचा शोध घेऊन संबंधिताला नोटीस बजावण्यात येणार आहे. नोटीस दिल्यापासून शहरातील नागरिकांनी सात दिवसाच्या आत १० हजार रुपये इतकी रक्कम भरून अधिकृत नळ कनेक्शन करून घ्यावे. अन्यथा पाणी चोरीसह मनपाच्या मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा कडक इशारा आयुक्तांनी दिला आहे.