छत्रपती संभाजीनगर : स्टील खरेदीच्या व्यवहारात उत्तरप्रदेशच्या दोन भामट्यांनी शहरातील व्यापाऱ्याची एक कोटी ५५ लाख रुपयांची फसवणूक केली.
मुश्ताक अहेमज शफी अहेमद (वय ४३ रा. सईदा कॉलनी, जटवाडा) यांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीचा आशय असा ः मुश्ताक यांचा स्टील खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे.
त्यांनी आरोपी मोहम्मद रियाजोद्दिन फकरोद्दिन आणि मुनवर जहाँ (दोघे रा. निश शिवीलनेन, अलिगड, उत्तरप्रदेश) यांच्या बाँबे आणि पुणे स्टील येथून माल मागवला होता. यासाठी त्यांनी आरोपींच्या खात्यावर ३ कोटी ८६ लाख १९ हजार रुपये भरले होते.
यापैकी आरोपींनी मुश्ताक यांना १ कोटी ७३ लाख ६८ हजारांचा माल दिला होता. आरोपीकडे मुश्ताक यांचे १ कोटी ३४ लाख ८१ हजार रुपये येणे बाकी आहेत; तसेच पुणे स्टीलच्या फर्ममधूनही मुश्ताक यांना ५७ लाख ४७ हजार रुपयांचा माल मिळाला असून, २० लाख २१ हजारांचा माल येणे बाकी आहे.
मुश्ताक यांनी आरोपींना वारंवार माल पाठवण्याबाबत विचारणा केली. मात्र, आरोपींनी माल पाठवला नाही. त्याचप्रमाणे मुश्ताक यांना माल मिळाल्याचे बनावट बिल आरोपींनी जीएसटी पोर्टलवर अपलोड करीत फसवणूक केली.