Air India Express: टाटा ग्रुपचा मोठा निर्णय! अर्ध्या किमतीत करता येणार विमान प्रवास; अट फक्त एकच...
esakal January 15, 2025 06:45 PM

Air India Express Army Day Offer: तुमच्या कुटुंबातील व्यक्ती किंवा तुम्ही स्वतः भारतीय लष्करात किंवा निमलष्करी दलात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडिया एक्स्प्रेसने लष्कर दिनानिमित्त सैनिकांसाठी खास ऑफर दिली आहे.

लष्कर दिनानिमित्त, एअरलाइनने देशाच्या संरक्षण आणि निमलष्करी दलातील सैनिकांसाठी विमान भाड्यात 50 टक्के सवलत दिली आहे. भारतीय लष्कर दिनानिमित्त सैनिकांना ही सवलत दिली जात आहे. एअरलाइनच्या या सुविधेअंतर्गत, तिकीट बुकिंग याच दिवशी म्हणजेच 15 जानेवारीलाच करावे लागेल.

एअरलाइन्सने दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, ही ऑफर फक्त 15 जानेवारी 2025 रोजी केलेल्या बुकिंगसाठी उपलब्ध आहे. ऑफर अंतर्गत तिकीट बुक करून, तुम्ही 15 जानेवारी ते 31 मार्च 2025 दरम्यान प्रवास करू शकता.

संरक्षण आणि निमलष्करी दलाचे सैनिर एअरलाइनच्या वेबसाइट वर किंवा मोबाईल ॲपद्वारे स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी तिकीट बुक करू शकतात. विमान कंपनीच्या iOS किंवा Android ॲपवरही तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध असेल. ऑफरचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला प्रोमो कोड 'DEFENCE' वापरावा लागेल.

ही सवलत देशातील सर्व 37 शहरांमध्ये लागू असेल. 37 शहरांमध्ये लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या महत्त्वाच्या केंद्रांचाही समावेश आहे. उदाहरणार्थ, जयपूर, कोलकाता, लखनौ आणि पुणे यांसारखी प्रमुख लष्करी केंद्रे आहेत.

तसेच दिल्ली आणि तिरुवनंतपुरम सारख्या प्रमुख हवाई दल आणि कोची, मुंबई, विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर सारख्या प्रमुख नौदल केंद्रांनाही या सवलतीचा फायदा होईल. लष्करातून निवृत्त झालेले सैनिकही या सवलतीचा लाभ घेऊ शकतात.

एअरलाइन्सकडे 90 हून अधिक विमाने आहेत

एअर इंडिया एक्स्प्रेसने ऑफर केलेल्या सवलतीसह, सैनिक त्यांच्या कुटुंबासाठी देखील बुकिंग करू शकतात. नुकतेच एअर इंडिया एक्सप्रेसने आपल्या विमान सेवांचा विस्तार केला आहे. एअर इंडिया एक्सप्रेस आता 50 पेक्षा जास्त शहरांमध्ये सेवा देणार आहे.

नवीन शहरांच्या यादीत बँकॉक, फुकेत आणि श्री विजया पुरम (पोर्ट ब्लेअर) या नवीन शहरांचा समावेश करण्यात आला आहे. सध्या कंपनीकडे 90 हून अधिक विमाने आहेत. यापूर्वी नौदल दिनानिमित्त विमान कंपनीकडून विशेष सवलतही जाहीर करण्यात आली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.