डोंबिवली - घाटमाथ्यावर बैलगाडा शर्यती पार पडत असताना डोंबिवली ग्रामीण भागात देखील बैलांच्या झुंजीच्या स्पर्धा रंगत आहेत. डोंबिवली जवळील सोनारपाडा गावात नुकतीच बैलांची झुंज पार पडली. ही झुंज पाहण्यासाठी माळरानावर बघ्यांची गर्दी जमली होती. चक्क तमिळनाडूच्या जलीकट्टूला मागे टाकणारी अशी ही स्पर्धा होती असे बोलले जात आहे.
या स्पर्धेसाठी सुमारे आठ लाखांचे बक्षीस होते तर लाखोंचा सट्टा लागला होता, अशी आता चर्चा सुरु झाली आहे. या झुंजीचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना जाग आली असुन झुंज बैल मालक व झुंज स्पर्धा आयोजक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनारपाडा गावात दोन बैलांची झुंज आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत अंबरनाथ तालुक्यातील काकडवाल आणि कल्याणच्या सापर्डे गावचे बैल सहभागी झाले होते. स्पर्धा स्पर्धेत प्रेक्षक बैलांची सुरू असलेली झुंज पाहत असताना त्यांच्यासमोर तरुणांई धिंगाणा घालताना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाले असून हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान यापूर्वी सुद्धा अश्या स्पर्धामध्ये दोन गटात भांडण आणि राडे झाले आहेत, त्यामुळे या स्पर्धेत असा प्रकार घडला असता तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थिती केला जात आहे. मानपाडा पोलिसांना या घटनेची कुणकुण कशी लागली नाही? की पोलिसांनी दुर्लक्ष केले? असा प्रश्न यावरून उपस्थित केला जात होता.
अखेर पोलिसांना जाग आली असून व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास करत झुंज आयोजक व झुंज बैल मालक यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 8.30 च्या सुमारास डोंबिवली पूर्वेतील सोनारपाडा येथील क्रिकेट ग्राउंडवर दोन बैलांची झुंज लावल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात काकडवाल गावातील झुंज बैल मालक रोशन दळवी, गणेश साळवी तसेच सापर्डे गावातील बारक्या मढवी व आयोजक यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
र. क्र. 78/2025 कलम 125 बी एन एस सह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 चे कलम 11(1)(क), 11(1)(ड) सह म पो का कलम 37(3), 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती त्यांनी दिली.