"लोकसभेतील विरोधी पक्षनेते नेहमीच संविधानाच्या रक्षणासाठी पुढे असतात. यासाठी ते सातत्याने लढा देत आहेत. राहुल सत्याची बाजू घेऊन लढत असल्यामुळे भाजप सरकार त्यांना घाबरत आहे."
बेळगाव : भाजप सरकारने राबविलेले प्रत्येक धोरण संविधानविरोधी आहे. सत्तेसाठी संविधान बदलण्याचा घाट भाजपने घातला आहे. स्वातंत्र्यानंतर अनेक पक्षांची सरकारे सत्तेवर आली, मात्र भाजप सरकारकडून ज्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा अवमान झाला, तसा कोणत्याही सरकारकडून झाला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान हा देशातील गोरगरीब व दीनदलित जनतेचा, स्वातंत्र्यलढ्यात बलिदान दिलेल्या नेत्यांचा अवमान आहे, असा घणाघात खासदार (Priyanka Gandhi) यांनी केला.
येथील सीपीएड् मैदानावर आयोजित ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे (Congress) राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे होते. व्यासपीठावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, कर्नाटकचे प्रभारी रणदीपसिंग सुरजेवाला, कार्यकारिणी सदस्य के. सी. वेणुगोपाल, जयराम रमेश यांच्यासह देशातील विविध राज्यांमधील खासदार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या, ‘‘देशातील भाजप सरकारकडून (BJP) राबविण्यात येणारे धोरण गोरगरिबांसाठी मारक आहे. यामुळे देशातील दीनदलित, गोरगरीब आणि शेतकऱ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक वस्तूला जीएसटी भरावी लागत आहे. त्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आपली वृत्ती लढाऊ विचारांची आहे. आपल्याला बलिदानाची परंपरा आहे. त्यामुळे या धोरणाला चोख उत्तर दिले जात आहे. संविधानाच्या संरक्षणासाठी बलिदान देण्यास काँग्रेस समर्थ आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते नेहमीच संविधानाच्या रक्षणासाठी पुढे असतात. यासाठी ते सातत्याने लढा देत आहेत. राहुल सत्याची बाजू घेऊन लढत असल्यामुळे भाजप सरकार त्यांना घाबरत आहे. सत्याची बाजू घेऊन आवाज उठवणाऱ्यांच्या मागे ईडी व अन्य सरकारी संस्थांचा ससेमिरा लावून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. भाजप सरकारकडून समाजात दुही माजवण्याचे काम सुरू आहे. त्याला कदापिही थारा देऊ नका.’’
भाजप सरकार अदानींसारख्या श्रीमंतांचे कर्ज माफ करत आहे. मात्र, गोरगरीब शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करीत आहे. ७०० शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर शेतकरीविरोधी कायदे मागे घेण्यात आले आहेत. राहुल गांधी यांच्याकडून सत्य सांगितले जात असल्याने त्यांच्यावर देशातील विविध राज्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, आपण त्याला घाबरणार नाही. आमची विचारधारा लढाऊ वृत्तीची आहे, सत्याची आहे, असे सांगून संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नेहमीच लढाऊ वृत्तीने सामना केला पाहिजे, असे आवाहन प्रियांका गांधी यांनी केले.
Congress session Belgaum MP Priyanka Gandhiमल्लिकार्जुन खर्गे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, ‘‘केंद्रातील भाजप सरकारकडून देशविरोधी धोरण राबवून देशात अस्थिरता निर्माण केली जात आहे. काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या जनहित योजना केंद्रातील एनडीए सरकार पुढे राबवून जनतेची दिशाभूल करत आहे. काँग्रेस सरकारकडून आपल्या कार्यकाळात अनेक जनहिताच्या योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, केंद्रातील भाजप सरकारकडून केवळ श्रीमंतांना श्रीमंत करण्यात येत आहे. आरएसएस, भाजप, हिंदू महासभा या संघटना दलित विरोधी आहेत. गोरगरिबांची काळजी नसणारे हे सरकार आहे.
देशासाठी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, राजीव गांधी यासारख्या अनेक नेत्यांनी बलिदान दिले आहे. तरीही भाजपकडून गांधी कुटुंबियांवर टीका केली जात आहे. भाजपने कोणता त्याग केला आहे, हे दाखवून द्यावे. लोकशाहीसाठी भाजप सरकार धोकादायक आहे. ते विकासाच्या बाजूने नसून हिंदू-मुस्लिमांना आपापसात लढवून सत्ता भोगत आहे. कर्नाटकातील जनतेने भाजपला योग्य धडा शिकवला आहे. आगामी जिल्हा पंचायत, तालुका पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसला समर्थपणे साथ द्यावी.’’
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी यावेळी काँग्रेसचे अधिवेशन हे महात्मा गांधीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्व व सिद्धांतांचा प्रचार व जागृती करण्यासाठी आयोजित केल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘‘भाजप, आरएसएस यांच्या विचारसरणीच्या विरोधात हा लढा आहे. प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात लढा दिला पाहिजे. भाजप सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हातातील बाहुले होऊन काम करीत आहे. भाजपने नेहमीच महात्मा गांधीजी व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना विरोध केला आहे. देशातील समता, स्वातंत्र्य, एकता शाबूत ठेवण्याचे काम संविधानाने केले आहे. अशा संविधानाला बदलण्यासाठी भाजप सरकार पुढे येत आहे, त्याला कदापिही थारा देऊ नका.’’
जय बापू, जय भीम, जय संविधान’ या अभियानाच्या माध्यमातून महात्मा गांधीजींच्या आदर्श तत्त्वांचा प्रचार व प्रसार करण्यात येणार आहे. सर्व जाती-धर्माचे नागरिक एकत्र राहावेत, संविधानाचे रक्षण व्हावे, असा उद्देश आहे. आर्थिक, सामाजिक स्वातंत्र्य मिळाले, तरच देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे सार्थक होईल, असे थोर नेत्यांनी सांगितले आहे. त्या दृष्टीने आपले सरकार विकास योजना राबवून कल्याण साधत आहे. पंचहमी योजनांच्या माध्यमातून हे दाखवून दिले आहे. निवडणुकीमध्ये हार-जीत महत्त्वाची नसून, सिद्धांत जिंकले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
‘अमित शहा यांनी माफी मागावी’- खर्गेकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून जनतेचा अपमान केला आहे. त्यासाठी शहा यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन यापुढेही सुरूच ठेवू, असा इशाराही खर्गे यांनी दिला.