महाराष्ट्रातील जळगाव येथील पारधाडे रेल्वे स्थानकावर बुधवारी (२२ जानेवारी) एक मोठा अपघात झाला. आगीच्या भीतीने प्रवाशांनी पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या मारल्या. यानंतर दुसऱ्या ट्रॅकवरून जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने प्रवाशांना चिरडले. जळगाव आणि पारधाडे स्थानकादरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली आहे. यात ११ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले की, जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत.
8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालीन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
तर दुसरीकडे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुष्पक ट्रेन दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, पुष्पक ट्रेन दुर्घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. अपघातातील जखमींना योग्य उपचार मिळावेत. जखमींच्या लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.
ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, हा अपघात दुपारी 3.30 ते 4 च्या दरम्यान झाला. आग लागल्याची अफवा पसरली होती. यानंतर काही लोकांनी ट्रेनमधून उड्या मारल्या. दरम्यान, समोरून बेंगळुरू एक्स्प्रेस येत होती, त्यात 30 ते 35 जणांना चिरडले. अनेक जण जखमी झाले आहेत. काहींचा मृत्यू झाला आहे, असा दावाही काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे की, समोरून येणाऱ्या बेंगळुरू एक्स्प्रेसने हॉर्नही वाजवला नाही. हॉर्न दिला असता तर प्रवाशांना सावध केले असते.