Jalgaon Railway Accident: "हा एक्स्प्रेसचा अपघात नाही तर..."; रेल्वेच्या पीआरओंनी सांगितला नेमका घटनाक्रम
esakal January 23, 2025 02:45 AM

Jalgaon Railway Accident Marathi News : जळगावजवळच्या पाचोऱ्याजवळ झालेल्या रेल्वे ट्रॅकवरील भीषण अपघातात १३ ते १४ प्रवाशांचा मृत्यू झाली माहिती आहे. या अपघातादरम्यान नेमकं काय घडलं? याची माहिती मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिली आहे. नेमकं काय घटनाक्रम घडला याची सविस्तर माहिती नीला यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वप्नील नीला म्हणाले, हा एक्स्प्रेसचा अपघात नाही, ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणी एसीपी अर्थात अलार्म चेन पुलिंग झालं होतं. लखनौवरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे निघालेली पुष्पक एक्स्प्रेस साधारण ४ वाजण्याच्या सुमारास जळगाव स्थानकातून निघाली होती. त्यानंतर पाचोरा रेल्वे स्थानकाजवळ आलार्म चेन पुलिंग झालं होतं, त्यामुळं या ठिकाणी ही रेल्वे थांबली. त्यानंतर काही प्रवाशी हे रेल्वेमधून खाली उतरले होते.

त्याचवेळी विरुद्ध बाजूनं येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसनं त्यांना धडक दिली. यामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत, या प्रवाशांना आम्ही वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. तसंच स्थानिक प्रशासनाकडून आम्ही मदत घेत आहोत. त्याचबरोबर रेल्वेची अपघात वैद्यकीय रिलीफ व्हॅन असते ती देखील भुसावळवरुन निघाली आहे. घटनास्थळी काही वेळातच पोहोचेल.

व्हिडिओत काय दिसतंय?

या अपघातापूर्वीचे काही व्हिडिओ देखील माध्यमांमध्ये समोर आले आहेत. यामध्ये चेन पुलिंगनंतर पुष्पक रेल्वे ट्रॅकवर थांबवल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक डब्यांमधून खाली उतरले होते. मोठ्या प्रमाणावर या लोकांनी ट्रॅकवर गर्दी केल्याचं या व्हिडिओंमध्ये स्पष्टपणे दिसते आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर पुरुष तसेच काही महिला आणि लहान मुलंही दिसत आहेत. त्यामुळं या अपघतात सध्याच्या घडीला १३ ते १४ जणांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याचं सांगितलं जात आहे. तर मोठ्या प्रमाणावर लोक जखमीही झाले आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.