Jalgaon Railway Accident : आग लागली, आग लागली... एकजण ओरडला अन् प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या; प्रत्यक्षदर्शीने सांगितलं काय घडलं?
esakal January 23, 2025 02:45 AM

जळगावहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसमध्ये आग लागल्याच्या अफवेनंतर घाबरून प्रवाशांनी धावत्या रेल्वेतून उड्या मारल्या. याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसने उड्या मारलेल्या प्रवाशांना चिरडल्यानं भीषण दुर्घटना घडलीय. परांडा रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर जळगाव जिल्हा प्रशासनातील अधिकारी, रेल्वे प्रशासन आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पुष्पक एक्सप्रेसमध्ये नेमकं काय घडलं याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने माहिती दिलीय. जळगाहून पुष्पक एक्सप्रेस निघाली होती. परांडा स्थानकाजवळ येताच ब्रेक दाबल्यानंतर घर्षण होऊन ठिणग्या उडतात तशा ठिणग्या उडाल्या. त्यावेळी एक प्रवाशी आग लागली, आग लागली असं बोलला. अचानक आग लागल्याचं ऐकताच प्रवाशांनी रेल्वेतून उड्या मारल्या. तेव्हा दुसऱ्या बाजूने येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसखाली प्रवाशी चिरडले गेले. एकाच डब्यातल्या लोकांनी उड्या मारल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. दुर्घटनेनंतर घटनास्थळी भीषण असं चित्र होतं. ट्रॅकवर शीर कापलेल्या, हातपाय तुटलेल्या अवस्थेतील मृतदेह पडले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही दुर्घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलंय. प्रशासन जखमींच्या उपचारासाठी व्यवस्था करत आहे. घटनास्थळी ८ रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. परिस्थितीचा आम्ही आढावा घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. मंत्री गिरीश महाजन, पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींवर उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात य़ेत आहे. ग्लासकटर, फ्लडलाइट्स यासह आपत्कालीन यंत्रणाही सज्ज असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.