जळगावमध्ये आज मोठी रेल्वे दुर्घटना घडली. पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. याचवेळी समोरून आलेल्या बेंगळुरू एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवले. या रेल्वे अपघातामध्ये ७ ते ८ जणांचा मृत्यू झाला. तर २० पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. मंत्री गिरीष महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या अपघाताबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून असून जखमींना तातडीने मदत करा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जळगाव रेल्वे अपघातावर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी असे लिहिले आहे की, 'जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत.'
मुख्यमंत्र्यांनी पुढे असे लिहिले की, 'संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहे. ८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य तसेच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.'
दरम्यान, जळगावच्या परधाडे गावाजवळ मोठा रेल्वे अपघात झाला. पुष्पक एक्स्प्रेस ही लखनऊकडून मुंबईच्या दिशेने येत होती. एक्स्प्रेसच्या लोकोपायलटनं अचानक ब्रेक दाबला. त्यामुळं ठिणग्या उडाल्या आणि धूर येऊ लागला. त्यामुळेआग लागल्याच्या भीतीनं पुष्पक एक्स्प्रेसमधून ३५ ते ४० प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या. त्याचवेळी बाजूच्या रुळांवरून येणाऱ्या बेंगळुरू एक्स्प्रेसने या प्रवाशांना उडवलं. यात ७ ते ८ जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.