भारत विरुद्ध इंग्लंड संघात टी२० मालिकेतील पहिला सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांची शानदार कामगिरी झाली. त्यामुळे इंग्लंडला भारतासमोर केवळ १३३ धावांचे लक्ष्य ठेवता आले आहे. तरी इंग्लंडकडून कर्णधार जॉस बटलरने एकाकी झुंज दिली.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडकडून बेन डकेट आणि फिलिप सॉल्ट यांनी डावाची सुरूवात केली.
मात्र पहिल्याच षटकात सॉल्टला शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर कर्णधार जॉस बटलरने आक्रमक सुरुवात केली, पण तिसऱ्या षटकात अर्शदीपने डकेटलाही माघारी धाडले. पण त्यानंतर बटलरला हॅरी ब्रुकने साथ दिली होती. त्यांच्यात चांगली भागीदारीही रंगली होती. त्यामुळे इंग्लंडने ६० धावांचा टप्पा सहज पार केला.
पण ८ व्या षटकात वरूण चक्रवर्तीने केलेली गोलंदाजी कलाटणी देणारी ठरली. त्याने तिसऱ्या चेंडूवर ब्रुकला १७ धावांवर त्रिफळाचीत केले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने लियाम लिव्हिंगस्टोनला शून्यावर त्रिफळाचीत केले.
पाठोपाठ जेकॉब बॅथलला हार्दिक पांड्याने ७ धावांवर बाद केले, तर जॅमी ओव्हरटन आणि गस ऍटकिन्सन यांना प्रत्येकी दोन धावांवर अक्षर पटेलने माघारी धाडले. त्यामुळे १६ षटकांपर्यंत ७ बाद १०३ धावा अशी बिकट अवस्था इंग्लंडची झाली होती. पण एक बाजू बटलरने लावून धरली होती. त्याने अर्धशतकही केले.
बटलरने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध ५० पेक्षा जास्त धावांची खेळी करण्याची ही पाचवी वेळ आहे. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध सर्वाधिकवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत निकोलस पूरनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
दरम्यान, बटलरला १७ व्या षटकात वरूण चक्रवर्तीनेच माघारी धाडले. बटलरने ४४ चेंडूत ६८ धावांची खेळी केली, यात त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले. तो बाद झाल्यानंतर शेवटच्या षटकात जोफ्रा आर्चर १२ धावांवर बाद झाला, तर मार्क वूड डावाच्या शेवटच्या चेंडूवर धावबाद झाला. त्यामुळे इंग्लंडचा डाव २० षटकात १३२ धावांवर संपुष्टात आला.
भारताकडून गोलंदाजी करताना वरूण चक्रवर्तीने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.