Truck Accident : राज्यात दोन भीषण अपघातांत 14 जण ठार; यल्लापूरजवळ दहा, तर रायचूरजवळ तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू
esakal January 23, 2025 12:45 PM

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत १४ जणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली.

बंगळूर : कारवार (उत्तर कन्नड) जिल्ह्यातील यल्लापूरजवळ भाजीपाल्याचा ट्रक (Truck Accident) उलटून झालेल्या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला, तर रायचूरमधील सिंदनूरजवळ झालेल्या दुसऱ्या एका भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. राज्यात झालेल्या या दोन रस्ते अपघातांत एकूण १४ जणांचा बळी गेला. दोन्ही अपघातांमध्ये २५ जण जखमी झाले आहेत.

१५ हून अधिक जखमींना स्थानिक रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले असून, त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक आहे. हावेरी येथील सावनूरहून काही व्यापारी ट्रकमधून भाजीपाला आणि फळे घेऊन कुमठ्याकडे येत होते. यल्लापूर येथील गुळ्ळापूर (Gullapur National Highway) पहाटे हा अपघात झाला. ट्रक उलटून झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. १५ हून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

फयाज जमखंडी (वय ४५), वसीम मुदगेरी (३५), इजाज मुल्ला (२०), सादिक भाशा परस (३०), गुलाम हुसेन जवळी (४०), इम्तियाज मुलगेरी (३६), अल्फाज जाफर मंडकी (२५), जलानी अब्दुल जकाती (२५), अस्लम बाबू बेन्ने (२४) यांचा अपघातात मृत्यू झाला. आणखी एका अनोळखीचा मृतांत समावेश आहे.

या घटनेतील गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. १५ जखमींना यल्लापूर तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतदेह यल्लापूर रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस प्रमुख नारायण यांनी सांगितले की, माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी जाऊन बचावकार्य केले. मदतकार्य केले आणि यल्लापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

स्कूलबस उलटून घडला अपघात

दुसऱ्या एका अपघातात रायचूरच्या सिंधनूर शहराच्या हद्दीत मुंजनारा मंत्रालयाच्या संस्कृत विद्यापीठाची स्कूल बस उलटून तीन विद्यार्थ्यांसह चौघांचा मृत्यू झाला. हयवदना (वय १८), सुजयेंद्र (२२), अभिलाष (२०) आणि चालक जमसाली शिवा (२०) अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

१४ जणांना घेऊन हे वाहन मंत्रालयातून कोप्पळ येथील आनेगुंडी येथील नरहरी तीर्थच्या वृंदावनकडे जात होते. यावेळी एक्सल तुटल्याने वाहन उलटले. चालकाचा अतिवेग आणि निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. दहा जखमी विद्यार्थ्यांना रायचूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एका विद्यार्थ्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी सिंदनूर वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंत्रालयाचे स्वामीजींनी घटनास्थळी दाखल होऊन माहिती घेतली.

दोन्ही अपघातांतील जखमींवर मोफत उपचाराची व्यवस्था तसेच मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी तीन लाखांची मदत सरकार करणार असल्याचेही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले. घाई, अतिवेग आणि निष्काळजीपणा ही अपघातांची कारणे आहेत. जपून वाहन चालवा आणि सुरक्षित राहा, असे आवाहनही सिद्धरामय्या यांनी केले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करून मृतांच्या कुटुंबियांना केंद्राकडून प्रत्येकी दोन लाखांची व जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली.

दोन महिन्यांपूर्वी लग्न

यल्लापूरजवळ अपघातात मृत्यू झालेल्या अस्लमचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. अस्लमने भाजीपाला घेऊन रात्री उशिरा येणार असल्याने आग्रह धरला आणि ट्रकमध्ये चढला, असे सांगून कुटुंबियांना अश्रू अनावर झाले.

राज्याकडून तीन, केंद्राकडून दोन लाखांची मदत

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातांत १४ जणांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आणि मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यांनी ‘एक्स’ या सोशल नेटवर्किंग साइटवर याबद्दल ट्विट केले आणि यल्लापूर आणि रायचूर जिल्ह्यातील सिंधनूर येथे झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये एकूण १४ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून दुःख व्यक्त केले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.