Mumbai: कांजूरमार्ग मेट्रो कारशेडजवळील निर्जन भागात सापडलेल्या ४१ वर्षीय तरुणाच्या मृतदेहाचे गूढ मुंबई पोलिसांनी बुधवारी (ता. २२) उकलले.
दारूच्या नशेत कुटुंबीयांना सतत मनस्ताप देणाऱ्या या तरुणाच्या हत्येची सुपारी त्याच्याच मावस भावाने दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. कांजूरमार्ग पोलिसांनी मावस भाऊ विजय सारवान याला तर गुन्हे शाखेने हत्या करणाऱ्या दोघांना बेड्या ठोकल्या.
कांजूरमार्ग पोलिसांना रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मेट्रो कारशेडजवळील निर्जन भागात अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळला. मृतदेहाच्या डोक्यावर जखमा आढळल्या. पुढील तपासात कांजूरमार्ग पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. हा मृतदेह विलेपार्लेच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या राजेश सारवान (वय ४१) याचा होता.
त्याची हत्या करण्यात आल्याचे शवचिकित्सेत स्पष्ट झाले. ओळख पटताच पोलिसांनी राजेशबद्दल माहिती मिळवली. राहत्या परिसरात चौकशी केल्यावर कांजूरमार्ग पोलिसांनी मावस भाऊ विजय यास ताब्यात घेत सखोल चौकशी केली. तेव्हा त्याने राजेशच्या हत्येची सुपारी जवळपास राहणाऱ्या रोहित चांडालिया आणि सागर पिवाळ या तरुणांना दिल्याचे कबूल केले.
राजेशची हत्या करणाऱ्या रोहित, सागर यांना गुन्हे शाखेने अटक केली. रविवारी या दोघांनी राजेशला घटनास्थळी आणून दारू पाजली आणि दगडाने ठेचून त्याची हत्या केली.
तीन लाखांची सुपारी
मृत राजेश हा बेरोजगार होता; मात्र त्याला मद्याचे व्यसन लागल्याने तो पैशांवरून कुटुंबीयांसोबत वाद घालून मारहाण करीत होता. त्याच्या सततच्या कटकटीला सगळेच वैतागले होते. अलीकडेच झालेल्या कौटुंबिक सोहळ्यात राजेशने गोंधळ घातला होता.
त्यामुळे त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचे विजय याने पोलिसांना सांगितले. आरोपी विजय याने राजेशला मारण्यासाठी सागर, रोहित यांना तीन लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. सुरुवातीला त्याने या दोघांना ६० हजार रुपये दिले होते, असे तपासात निष्पन्न झाले.