- अश्विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार
अलीकडेच मला कुणीतरी विचारलं, की ‘बाह्य सौंदर्याला किती महत्त्व आहे? आजपर्यंत आम्हाला शिकवलं गेलं आहे, की वरवरच्या दिखाव्याला महत्त्व न देता फक्त आत काय आहे फक्त ते महत्त्वाचं आहे; पण आजच्या जगात खरंच असं आहे का?’ पण मैत्रिणींनो तुम्हीच विचार करून मला सांगा.
तुम्ही अगदी भाजी घ्यायला जाता, तेव्हा तुम्हीसुद्धा वाळलेली, सुरकुतलेली, मळलेली किंवा कीड लागलेली भाजी न घेता, स्वच्छ, ताजी, दिसायला चांगली, डाग नसलेली अशी भाजी निवडता. एखादी वस्तू विकत न फाटलेला, तुटलेला, नीट ठेवलेला, धूळ नसलेला, वरून दिसायला चांगला असा निवडता. यावरून लक्षात येतं, की आतल्या गोष्टींना, गुणांना, स्वभावाला महत्त्व आहेच; पण बाह्य रूपालाही तितकंच महत्त्व आहे.
माणसांचं बाह्यरूप म्हणजे चांगले महागातले कपडे, दागिने किंवा दिखाऊपणा नसून, स्वच्छता, नीटनेटकेपणा, योग्य पोशाख, चांगली वागणूक आणि सादरीकरण हे आहे. यातल्या योग्य पोशाखाबद्दल काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे. योग्य पोशाख म्हणजे काय? योग्य पोशाख म्हणजे प्रसंगानुसार किंवा परिस्थितीनुसार परिधान केलेला पोशाख.
ज्यामध्ये सौंदर्य, नीटनेटकेपणा, आणि सभ्यतेचा विचार केला गेला आहे. योग्य पोशाखाची काही उदाहरणं म्हणजे मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी पारंपारिक पोशाख घालणं. कामाच्या ठिकाणी फॉर्मल कपडे घालणं, पार्टीला जाताना आधुनिक कपडे घालणं.
योग्य पोशाख का महत्त्वाचा?
नीटनेटके आणि योग्य पोशाख परिधान केल्यानं इतरांवर सकारात्मक प्रभाव पडतो.
योग्य पोशाख प्रसंगाचा आदर दर्शवतो.
योग्य पोशाख आपलं व्यक्तिमत्त्व उंचावतो आणि आपल्याला प्रेझेंटेबल बनवतो.
आत्मविश्वास वाढतो.
इतरांवर चांगला प्रभाव पडतो आणि आपला आदर वाढतो.
योग्य पोशाखाबाबतच्या टिप्स
पोशाख निवडण्यापूर्वी प्रसंगाचा विचार करा आणि त्यानुसार पोशाख निवडा
पोशाख निवडताना रंगसंगतीचा विचार करा. अति चमकदार किंवा विचित्र रंगांपेक्षा सौम्य रंगांचे कपडे निवडा.
पोशाख घालण्यापूर्वी तो स्वच्छ आणि योग्य स्थितीत आहे ना याची खात्री करा.
कपडे तुमच्या शरीराच्या मापानुसार आणि तुम्हाला साजेसे घाला. फार ढगळ किंवा फार टाईट कपडे घालणं टाळा.
धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी किंवा ठिकाणी पारंपारिक पोशाख घाला.
व्यावसायिक ठिकाणी साधे, सभ्य आणि फॉर्मल कपडे घाला.
कपडे निवडताना हंगाम आणि हवामानाचाही विचार करा.
योग्य आणि साजेशा ॲक्सेसरीज निवडा (घड्याळ, ज्वेलरी, पर्स, चपला).
पोशाख फक्त सौंदर्यदृष्ट्या चांगला नाही तर आरामदायी निवडावा.
मैत्रिणींनो योग्य पोशाख केवळ बाह्य सौंदर्यासाठी महत्त्वाचा नसून, तो आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा आहे. योग्य पोशाख आपला आत्मविश्वास वाढवतोच; पण त्याचबरोबर इतरांवर सकारात्मक प्रभाव टाकतो आणि प्रसंगाचा आदर दर्शवतो. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रसंगाचा आणि परिस्थितीचा विचार करून कपडे निवडा आणि तुमचं व्यक्तिमत्त्व खुलवा.