ढिंग टांग
मा ना. नानासाहेब फडणवीस यांसी, शतप्रतिशत प्रणाम, वंदनीय श्री. मोदीजी, प्रार्थनीय श्री. मोटाभाई आणि नमस्करणीय श्री. नड्डाजी यांच्या व आपल्या कृपेकरुन मजसारख्या सामान्य कार्यकर्त्यास मंत्रिमंडळात स्थान मिळाले, याखातर माझ्या मतदारसंघातील नागरिकांतर्फे आणि व्यक्तिश: मी आपले
आभार मानतो. (हुश्श), तथापि, अतिशय संकोचाने सदरील गोपनीय पत्र आपल्याला लिहीत आहे. कृपया राग मानून मंत्रिमंडळातून काढून टाकू नये. प्लीज!
नानासाहेब, नागपुरात राहूनही आज मुंबईत आपले घर नाही. मीदेखील आपल्यासारखाच मुंबईत बेघर आहे. कोट, जाकिट आदी पोशाख शिवायला टाकला नसताना ऐनवेळी मला शपथविधीसाठी उभे करण्यात आले. ‘शपथविधीला पोहोचा’ असा निरोप मिळाल्यानंतर (माननीय श्री बावनकुळेसाहेबांचा व त्यांच्या पीएचाही मी आभारी आहे, कारण त्यांनीच पहिला फोन केला होता…) मी आधी कांदा मागवला.
आमच्या खुळ्या पीएने बारीक चिरलेला कांदा आणला. तर्री पोह्यावर पखरण्यासाठी कांदा हवा असणार, असे त्यास वाटले. गाढव लेकाचा! शेवटी पायताण हुंगून शुद्ध टिकवली.
सोमवारी बंगल्यांचे वाटप जाहीर झाले. आपल्याला अलॉट झालेला बंगला हा अत्यंत भिकार आणि दुय्यम दर्जाचा असून चांगले बंगले शेजारीपाजारीच असतात, हा साक्षात्कार झाला. माझ्या वाट्याला आलेल्या बंगल्याचे प्रवेशद्वार आग्नेय दिशेस उघडते, अशा घरात लक्ष्मी येत नाही, असे एका वास्तुशास्त्रवाल्याने सांगितले. यावर उपाय म्हणून त्याने दक्षिण दिशेला अरोवाना नावाचा विनी मासा फिश टँकमध्ये पोहोता ठेवावा, असा तोडगा सुचवला आहे.
आता हा अरोवाना मासा शोधणे आले!! या माशाचा शोध घेताना नाकी नव आल्याने आमच्या पीएने पापलेट चालेल का? असे विचारले. आता या माणसाने जिवंत पापलेट कुठे बघितला कुणास ठाऊक. मालवणला राहणाऱ्या माणसानेही आजवर जिवंत पापलेट बघितला नसेल. पापलेट हा आपला राज्य मासा आहे, तरीही, तो प्राय: मृतावस्थेतच जनसामान्यांस भेटतो. असो.
ईशान्येचा कोपरा साफसुथरा ठेवून तेथे स्फटिकवस्तू ठेवल्यास धनसंपत्तीचा ओघ वाहील, तसेच नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सुखसमाधान नांदेल, असे एका वास्तुवाल्याने सांगितले. गेले तीन दिवस मी सदरील निवासस्थानात ईशान्येचा कोपरा धुंडत आहे. अजून मिळालेला नाही. काय ठेवू?
मला मिळालेल्या सरकारी बंगल्यात सैपाकघर दक्षिण दिशेस असल्याने अपचनाचे रोग बळावतील, असाही इशारा वास्तुशास्त्रवाल्यांकडून मिळाला. या दिशेस चूल पेटवली असता संपत्तीचे ज्वलन त्वरेने होते, असे कळले.
शेजारचा बंगला या सर्व वास्तुगुणांनी युक्त असून तो मात्र ‘राष्ट्रवादी’वाल्यांकडे गेला आहे!! त्या पलिकडला बंगला मला पसंत पडला होता; पण तोही शिंदेगटाकडे गेला आहे. शेवटी मी माननीय श्री. बावनकुळेसाहेबांकडे तक्रार करण्यासाठी गेलो.
‘‘साहेब, बंगला बदलून द्या!,’’ मी आग्रहाने हट्ट केला. बावनकुळेसाहेब आपले हक्काचे माणूस आहे. नाही का?
‘‘अरे लेका, मला ‘रामटेक’ मिळालाय! एक नंबरचा पनवती बंगला आहे तो!’’
बावनकुळेसाहेबांनी कपाळ ठोकत मला सांगितले. मला त्यांचीच कणव आली. रामटेक वाट्याला आल्याने टेकीला आलेले बावनकुळेसाहेब ‘महसूल मिळून काय फायदा? असे कुरकुरत होते. मी तिथून निघून आलो.
काही राज्यमंत्र्यांना तर दालनेसुद्धा मिळालेली नाहीत. एका राज्यमंत्र्याने तर मंत्रालयासमोरच्या झाडाखाली चहा आणि बनमस्का विकणाऱ्याच्या शेजारीच टेबल टाकून बसायची तयारी दर्शवली आहे, असे समजते. काय बोलणार? जमत असल्यास बंगला बदलून द्यावा, नपेक्षा खाते तरी बदलून द्यावे, अशी विनंती करण्यासाठी हे पत्र लिहिले. कृपया राग मानू नये.
सदैव आपला एकनिष्ठ. एक निनावी मंत्री.