मुख्यमंत्री मोहन यादव सरकारने घेतला निर्णय : नव्या आर्थिक वर्षात लागू होणार
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशातील मोहन यादव सरकारने शुक्रवारी नव्या अबकारी धोरणावर शिक्कामोर्तब केले आहे. राज्यातील 17 धार्मिकस्थळी मद्याच्या विक्रीवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्थळांमध्ये एक महापालिका, 6 नगरपालिका आणि नगर पंचायत समवेत 7 ग्रामपंचायत क्षेत्रांचा समावेश आहे. भाजप नेत्या उमा भारती यांनी सातत्याने राज्यात मद्यविक्रीवर बंदी घालण्याची मागणी लावून धरली होती. या पार्श्वभूमीवर त्यांची मागणी आंशिक स्वरुपात राज्य सरकारने पूर्ण केली आहे. नव्या आर्थिक वर्षात हा निर्णय लागू होणार असल्याचे समजते.
धार्मिक शहरांमधील मद्यबंदीचे सूत्रही समोर आले आहे. ज्या स्थळांवरील मद्यविक्रीची दुकाने बंद होतील, त्यांना अन्यत्र स्थलांतरित केले जाणार नाही, ही दुकाने स्थायी स्वरुपात बंद केली जाणार आहेत. तर नर्मदा काठाच्या दोन्ही बाजूला 5 किलोमीटर अंतरापर्यंत मद्यबंदीचे धोरण जारी ठेवले जाणार असून यात कुठलाही बदल केला जाणार नाही. मंडला, मुलताई, मंदसौर, अमरकंटक, सलकनपूर, बरमानकलां, लिंगा, बरमानखुर्द, कुंडलपूर, बांदकपूर, उज्जैन, ओंकारेश्वर, महेश्वर, मंडलेश्वर, ओरछा, मैहर, चित्रकूट, दतिया, पन्ना या ठिकाणी मद्यविक्री बंदचा निर्णय लागू करण्यात येणार आहे.
मद्यप्राशनाच्या दुष्प्रभावांची प्रत्येकाला जाणीव आहे. आमचे युवा हे देशाचे भविष्य आहेत, त्यांना वाईट व्यसन लागू नये अशी आमची इच्छा आहे. मध्यप्रदेश ही भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्ऱीराम यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून तेथे मद्यविक्री बंदीचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी म्हटले आहे.