जीवनाचे तत्त्वज्ञान उलगडून दाखवणारे साधे प्रसंग, आयुष्य समृद्ध करणारे अनुभव, भेटलेल्या साध्यासुध्या माणसांतील वेगळेपणा टिपणारी शोधकदृष्टी, जेजुरी परिसरावर अलोट प्रेम आणि खंडेरायांविषयी अपार श्रद्धा या साऱ्यांचं ‘कोलाज’ म्हणजे प्रा. डॉ. नारायण टाक यांचे कोलाज हा ललितलेखसंग्रह होय. अतिशय संवेदनशीलतेने त्यांनी आपले अनुभवविश्व आखीव रेखीव पद्धतीने शब्दबद्ध केले आहे.
प्रा. टाक सरांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला आहे. किचकट अर्थशास्त्र हे साध्यासोप्या पद्धतीने शिकवण्यात त्यांचा हातखंडा होता. नेमकी तीच किमया त्यांनी लेखनातही साधली आहे. साध्यासुध्या प्रसंगातूनही त्यांनी जीवनाचे मर्म उलगडून दाखवलेले दिसून येते.
जेजुरीतील मार्तंड देवसंस्थान या संस्थेचे विश्वस्त म्हणून प्रा. टाक यांनी काम पाहिले आहे. तसेच जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यामुळे खंडोबाविषयी त्यांना आत्मीयता आणि प्रेम आहे. त्यामुळेच त्यांच्या अनुभवविश्वात जेजुरी आणि खंडोबा यांना अनन्यसाधरण महत्त्व आहे.
खंडोबाचा सर्वसामान्यांवर असलेला पगडा, विविध आख्यायिका, पौराणिक काळापासून असलेले संदर्भ सहजतेने देतात. त्यांच्या अभ्यासूवृत्तीची ओळख यातून पटते. खंडोबा हे सर्व जाती-धर्माच्या लोकांचे दैवत. खऱ्या अर्थाने लोकदैवत आहे, याची प्रचिती त्यांच्या लेखनातून येते.
सर्वसामान्य व्यक्ती किती मोठ्या मनाच्या असतात, मदतीला तत्परतेने धावतात, याची असंख्य उदाहरणे प्रा. टाक यांनी पुस्तकात दिली आहेत. सांगवीतील महाविद्यालयातून जेजुरीला जाताना खडकीजवळ त्यांचा अपघात होता. अनेक जण बघ्याची भूमिका घेत असताना बाबू हमाल त्यांना मदतीचा हात देतो. दवाखान्यात नेतो.
पाच दिवसांनी दवाखान्यातून बाहेर आल्यानंतर बाबूचा शोध घेऊनही तो सापडत नाही. गेल्या तीस वर्षांपासून लोकांना मदत करणाऱ्या प्रत्येकात ते बाबूला शोधत असतात. माणुसकी जिवंत करणारा आणि हळव्या मनोवृत्तीचा हा अनुभव वाचकांच्या मनाला भिडतो.
सादबा आणि गणपाची मैत्री, त्यांच्यावर आलेली वाईट वेळ आणि त्यातून बाहेर पडण्याचा निर्धार ‘जोडीदार’ या लेखात मांडला आहे. भविष्यात प्रवचनकार होण्याची त्यांची इच्छा व त्यासाठी कष्ट करायची त्यांची तयारी आहे. दोन अनाथांची मैत्री आणि एकमेकांना त्यांनी दिलेला आधार हे आगळंवेगळं नातं लेखकाने उत्तमरीत्या रेखाटलं आहे.
‘कोलाज’मधील चित्रे प्रा. टाक यांनी स्वतः काढली आहेत. अतिशय आखीव- रेखीव असणाऱ्या या चित्रे काढण्यामागील रहस्य ‘कलेशी मैत्री’ या लेखात रेखाटले आहेत. अंधश्रद्धेवर प्रहार करणाऱ्या ‘चोप’, ‘भुताचे पलायन’ यासारख्या लेखांतून वाचकांचे प्रबोधन करायचा प्रयत्न केला आहे. रूढीचा जन्म कसा होतो आणि नंतर त्या अंधपणे कशा स्वीकारल्या जातात, याचे वर्णन ‘रूढीचा जन्म’ या लेखात अतिशय मजेदारपणे मांडले आहे.
अतिशय साध्यासोप्या आणि सरळ भाषेमुळे वाचकांच्या मनावर हे लेख गारुड करतात. ओघवत्या शैलीमुळे त्यात गुंतून पडतात. पुस्तकातील अनेक व्यक्तिरेखा मनात रेंगाळतात आणि वाचकाला समृद्ध करून जातात.
पुस्तकाचे नाव : कोलाज
लेखक : प्रा. डॉ. नारायण टाक
प्रकाशन : स्वयं प्रकाशन
(मो. ९८९०८११५६७)
पृष्ठं : १४४
मूल्य : १७५ रुपये