सहल - छंदाच्या माध्यमातून मार्गदर्शन
esakal January 26, 2025 08:45 AM

- अश्विनी देव, editor@esakal.com

बिरबलाच्या खिचडीची गोष्ट आपणा सर्वांना माहीतच आहे. बरेचदा शैक्षणिक धोरणांच्या माध्यमातून शिक्षणाच्या उद्दिष्टांची खिचडी शिजवताना धोरण राबविण्याची आग ही दूर खाली असते व उद्दिष्टांचे मडके उंच बांधलेले असते. बिरबलाच्या गोष्टीसारखी आता ती खिचडी शिजणार कधी आणि समाजाचे पोषण होणार कधी ? परंतु अनेकदा शिवराज पिंपुडे यांच्यासारखे अनेक शिक्षक याला अपवाद ठरतात.

शिक्षकाकडे जर तळमळ, जिद्द, कल्पकता, उत्साह असेल, तर अनेक शैक्षणिक धोरणे फार उत्तमरीत्या फळास येतात. पिंपुडे याच कुळातील आहेत. ज्ञान प्रबोधिनीमधील शिक्षण व त्याच संस्थेत गेल्या पंचवीस वर्षांपासूनचे अध्यापन या अनुभवातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडले आहे. अखंड उपक्रमशीलता, कल्पकता, चिकाटी आणि स्वतःच्या चिंतनातून प्रकट झालेले शैक्षणिक तत्त्वज्ञान यांच्या बळावर ते अव्याहतपणे कृतिशील आहेत. त्यांनी राबविलेल्या अनेक उपक्रमांबाबत ते लिहीत असतात. विविध कार्यशाळा व संवाद सभांमधून बोलत असतात.

'धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची'' हे त्यांचे नवे पुस्तक वेगळेच आहे. पुस्तकाची मांडणी आकर्षक व सुटसुटीत आहे. प्र. के. घाणेकर यांची प्रस्तावना अभ्यासपूर्ण आहे. १४० पानांचे हे पुस्तक एकूण ११ प्रकरणांमध्ये विभागले आहे. या पुस्तकातील देवराई, पक्षी निरीक्षण, आकाश निरीक्षण, जंगल, समुद्र अशा प्रकरणांमध्ये निसर्गाच्या रचनांचा कुतूहलाने भरलेला प्रवास आहे आणि दुसऱ्या बाजूस गड, मंदिरे, वारसा स्थळे, वीरगळ, लेणी आणि दुर्ग मोहिमा अशा मानवी संरचनांची सौंदर्यस्थळे आहेत.

निसर्गनिर्मिती आणि मानवी संरचना यांचा सुंदर मिलाफ वाचकांना समृद्ध अनुभव देतो. प्रत्येक प्रकरण एका संपन्न व अभ्यासपूर्ण उपक्रमाची उद्दिष्टे, रचना, नियोजन, अंमलबजावणी आणि फलनिष्पत्ती याची समग्र मांडणी करते. हे लहानसे पुस्तक फार मोठे विषय आणि शैक्षणिक तत्त्वज्ञानाचा आशय आपल्या कवेत घेऊन वाचकांसमोर येते. श्री. पिंपुडे यांची लेखनशैली संवादी आहे.

‘राकट देशा, कणखर देशा, ‘गडांच्या’ही देशा’ या पुस्तकाच्या अगदी पहिल्याच प्रकरणात गडभेटीचा प्रसंग आहे. आपण प्रत्येक जण गड-किल्ल्यांना पर्यटनाच्या निमित्ताने भेट देत असतो. परंतु एक किल्ला पाहताना तो किती वैविध्यपूर्ण दृष्टिकोनातून पाहता येतो, याची प्रचिती हे प्रकरण वाचल्यावर येते.

निसर्गावर कोणाचीही सत्ता असू शकत नाही, तो सर्वशक्तिमान आहे. हे ध्यानात घेऊन आपण निसर्गाला शरण जायला हवे. निसर्गाला व इतिहासाला शिक्षक मानून केलेला विकास हा मानव जातीचा शाश्वत विकास असेल, हा संस्कार मुलांवर लहान वयापासून झाला, तर जीवनशिक्षणाची अनेक उद्दिष्ट साध्य करता येतील. गडकोट, लेणी, मंदिरे, वारसा स्थळे, वीरगळ या आपल्या वैभवशाली इतिहास व वारशाच्या खुणा आहेत.

आपले सामर्थ्य, श्रद्धा, कलात्मकता यांच्या अपूर्व संगमातून निर्माण झालेली ही ठिकाणे पुढच्या पिढ्यांचा वारसा आहेत. त्यासाठी निसर्गाचे सान्निध्य, संगोपन वृत्ती, निरीक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन या गोष्टी मुलांच्या बालमनामध्ये रुजवाव्या लागतील. यासाठी शाळा, कुटुंब व समाज अशा सर्व स्तरांवर परस्पर पूरक प्रयत्न सातत्याने व्हायला हवेत.

या कामी श्री. पिंपुडे यांच्या पुस्तकांची मोठी मदत होईल. केवळ ज्ञान नाही तर दृष्टिकोन देणारी अशी पुस्तके संवेदनशील, सृजनशील व वैज्ञानिक वृत्तीचे विद्यार्थी निर्माण करण्यात मोलाचे योगदान देतील.

पुस्तकाचे नाव : ‘धमाल भटकंतीची कमाल शिकण्याची’

लेखक: शिवराज पिंपुडे

ज्ञान प्रबोधिनी प्रकाशन, पुणे

(८८८८४३१८६८)

पृष्ठं : १४०

मूल्य :१५० रुपये.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.