रुरु राग
esakal January 26, 2025 08:45 AM

'मी? अरे मला तर साधं आरवतादेखील येत नाही अजून. मी गाणं कसं तयार करणार?' रुरु म्हणाला. रुरु ? कोण हा रूरू? सांगते हं! पण त्या आधी मला एक गोष्ट सांगा. तुम्हाला शास्त्रीय संगीतातले राग माहितीहेत का? मल्हार, यमन, देस, भूप अशी रागांची किती तरी नावं तुम्ही ऐकली असतीलसुद्धा, पण आज की नाही आपण एक अगदी नवीन अनोखा असा राग ऐकणार आहोत. रुरु राग.’ हा राग ज्याने तयार केला नं तो रुरु - एक छोटासा कोंबडा!

आपल्या मागच्या लेखातल्या कपिला नावाच्या गायीला बांधायचा होता एक झोपाळा आणि त्यावर बसून घ्यायचे होते उंचच उंच झोके! बाकीच्या गायींपेक्षा अगदी निराळीच होती खरी कपिलेची इच्छा, पण अशी जगावेगळी इच्छा असण्यात कपिलेला काहीच वावगं वाटत नव्हते. तिने तिची इच्छा फक्त मनात नाही ठेवली, तर ती पूर्णसुद्धा केली! या आपल्या रूरूचीसुद्धा एक इच्छा होती बरं का! अंहं कपिलेसारखी जगावेगळी वगैरे काही नाही उलट ‘आपण सगळ्यांसारखं असावं. आपल्याला सगळ्यांसारखी बांग देता यावी.’ अशी ती होती.

झालं असं की, रुरुला इतर सगळ्या कोंबड्यांसारखं आरवताच यायचं नाही. अनेक चाली त्याच्या डोक्यात घोळत असत, पण त्याने चोच उघडली की, सगळी गडबड होऊन जाई. बांग देण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ‘कुकूच-कू’च्या ऐवजी ‘किकीकू कुकीकू’ असं काही बाही बाहेर पडत असे. या कारणामुळे रुरु फार दुःखी होता.

‘उद्या तर कोंबडा-दिन! उद्या मलाही सगळ्यांसारखं छान आरवायचं आहे.’ - रुरु ने विचार केला. असा छान आवाज कसा लावायचा? हे शिकण्यासाठी त्याने गायीची मदत घ्यायचं ठरवलं आणि ‘‘तू कशी काय हम्माऽऽऽ म्हणतेस’’ असं तिला विचारलं. त्यावर गाय म्हणाली, ‘‘हे बघ, मी माझ्या वासराला सांगते -

तुझे डोके हलव,

तुझे तोंड उघड

आणि म्हण एक चांगला लांब हम्मा ऽऽऽऽ’

गायीने सांगितल्याप्रमाणे रुरुने इकडून तिकडे डोकं हलवलं, चोच उघडली आणि त्याच्या तोंडून निघालं, 'कुका हम्माऽऽऽ!’

‘असं नाही रे’ म्हणून गायीने रुरुला पाठवलं गाढवाकडे. गाढवानेसुद्धा आपल्याला शिंगराला शिकवताना ज्या सूचना दिल्या होत्या त्याच रुरुलाही दिल्या, पण परत तेच! रुरुच्या गळ्यातून बाहेर पडलं ‘कूक हीं...हॉ!’ मग गाढवाकडून मांजराकडे, मांजराकडून डुकराकडे, डुकराकडून बदकाकडे, बदकाकडून बकरीकडे असं खूप फिरला रुरु सगळ्यांनी शिकवल्याप्रमाणे तंतोतंत करून पाहिलं त्यानं पण छ्या!

‘कुकूच-कू’ अशी बांग काही त्याला जमली नाही म्हणजे नाहीच! या सगळ्या त्याच्या ‘शिक्षकमित्रांच्या’ शिकवण्याच्या वेगवेगळ्या तऱ्हा आणि शिकण्याचा जिवापाड प्रयत्न करू पाहणारा रुरु हे प्रिया कुरियन यांच्या सुंदर व बोलक्या चित्रातून आपल्याला भेटतात.

प्रत्येकाने सांगितल्याप्रमाणे अंग वळवून, वेगवेगळ्या कोनात मान करून, हुबेहूब आवाज काढू बघणारा रुरु कधी गमतीशीर वाटतो, कधी मेहनती विद्यार्थी वाटतो, तर कधी अगदीच बिचारा वाटतो. मूळ इंग्रजी भाषेतली ही गोष्ट नताशा शर्मा यांनी लिहिली असून, या गोष्टीचा मराठी अनुवाद स्नेहलता दातार यांनी केलाय. तुलिका प्रकाशनानं हे पुस्तक प्रसिद्ध केलंय.

‘कुकूच-कू’ म्हणण्याच्या असफल प्रयत्नात बघता बघता संध्याकाळ झाली होती. रुरुचा चेहरा पार उतरून गेला. खुराड्यात येऊन तो बिचारा एका कोपऱ्यात बसून राहिला. आजूबाजूला सगळे जण अगदी लगबगीने दुसऱ्या दिवशीच्या कोंबडादिनाची तयारी करत होते. छोटे छोटे कोंबडुले छाती फुगवून बांग देण्याची तयारी करत होते. ओह! रुरु आणखी उदास झाला.

तेवढ्यात एक छोटा कोंबडा येऊन म्हणाला, 'अरे रुरु, आम्ही तर तुलाच शोधत होतो. उद्यासाठी तुला एक कोंबडागीत तयार करायचं आहे हं.'

‘काय? मी ? आणि कोंबडागीत?’ रुरुला खूप आश्चर्य वाटलं. मला साधी बांगसुद्धा देत येत नाही तिथे मी गाणं कसं तयार करणार- तेही उद्याच्या विशेष दिवसासाठी-असं त्याला वाटलं, तेव्हा सगळ्या छोट्या कोंबड्यांनी त्याला समजावलं, 'अरे रुरु कुकूच-कू भले ही आम्ही म्हणू, पण त्यात काय वेगळी कमाल? तू जी धून काढतोस ना तीच तर आहे खरी धमाल! तुझं गाणं म्हणजे प्रत्येक वेळी चाल नवी, आगळे सूर अन वेगळे ताल!’

‘खरंच? आपल्यातली जी गोष्ट आपल्याला आवडत नाही, जी बदलावी आणि सुधारावी म्हणून आपण एवढे धडपडत होतो ती गोष्ट छान आहे - खास आहे असं सगळ्यांना वाटतं?’ हा विचार करून रुरुला खूप समाधान वाटलं. त्या रात्री त्याला खूप शांत झोप लागली.

सकाळ झाली. आज ‘कोंबडादिन’. रुरु प्रसन्नपणे उठला, कुंपणावर जाऊन बसला. त्याच्या मनात नेहमीप्रमाणे अनेक चाली घोळत होत्याच. एक गोष्ट मात्र या वेळी नव्याने घडली. या वेळी पहिल्यांदाच अगदी आत्मविश्वासाने रुरुने गायला चोच उघडली आणि तो गाऊ लागला त्याचा स्वतःचा असा रुरु राग!’

कूका हम्माऽऽऽ

कूक ही... हॉ

कुका मियॉव

कुक खगरर्र

कूक क्वॅक

कूका में ऽऽऽ

कूका कुका

कुकूच कू!

रुरुच्या गाण्याच्या शेवटच्या ओळीत त्याने म्हटलं होतं की जो सच्चा है वो अच्छा है! सगळ्यांसारखे असलो म्हणजेच आपण चांगले असतो, असं कुठे असतं? आपलं वेगळेपण ओळखून ते आपण स्वीकारायला आणि मिरवायलासुद्धा हवं! सगळ्यांसारखे असू किंवा सगळ्यांपेक्षा वेगळे, जसे आहोत तसे सच्चे-खरे असलो की झालं!

आपण जे नाही आहोत ते दाखवण्याच्या प्रयत्नात अडकण्यापेक्षा, इतर सगळ्यांना जे जमतं ते जमवण्याच्या धडपडीपेक्षा, आपण जसे आहोत तसे अगदी खास आहोत हे कळणं महत्त्वाचं आहे हे रुरुला आता नेमकं उमजलं होतं. तर तो अगदी आनंदानं, खड्या आवाजात गात होता-आपल्यातलं वेगळेपण साजरं करणारा हा ‘रुरु राग’- जो आपण सगळ्यांनीसुद्धा शिकून घ्यायला हवा ! कुकूच-कू

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.