भागधारकांना NTPC ने दिली लाभांशाची भेट, रेकॉर्ड तारीखही केली जाहीर
ET Marathi January 27, 2025 12:45 PM
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एनटीपीसीने डिसेंबर तिमाहीच्या निकालासह भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला आहे. कंपनी प्रति शेअर २.५० रुपये अंतरिम लाभांश देणार आहे. भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीखही जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये ०.०२ टक्क्यांची किरकोळ वाढ झाली आणि बीएसईवर हा शेअर ३२३.७० रुपयांवर बंद झाला. कंपनीचे मार्केट कॅप ३.१३ लाख कोटी रुपये आहे. रेकॉर्ड तारीख एनटीपीसीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले की, कंपनीच्या संचालक मंडळाने २५ जानेवारी रोजी २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर २.५० रुपयांचा दुसरा अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. या लाभांशासाठी ३१ जानेवारी २०२५ ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. यापूर्वी कंपनीने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी पहिला अंतरिम लाभांश प्रति शेअर २.५० रुपये दिला हाेता. हा लाभांश नोव्हेंबर २०२४ मध्ये देण्यात आला. तिमाही निकालआर्थिक वर्ष २५ च्या डिसेंबर तिमाहीत एनटीपीसीचा निव्वळ नफा ३.१ टक्क्यांनी वाढून ४७११.४ कोटी रुपये झाला. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत नफा ४५७१.९ कोटी रुपये होता. या तिमाहीत महसूलातही चांगली वाढ झाली. महसूल गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ३९,४५५ कोटी रुपयांच्या तुलनेत ४.८ टक्क्यांनी वाढून ४१,३५२.३ कोटी रुपयांवर पोहोचला. या कालावधीत EBITDA २०.३ टक्क्यांनी वाढून १९६०.६ कोटी रुपये झाला, जो आर्थिक वर्ष २०२४ च्या तिसऱ्या तिमाहीत ९९४१ कोटी रुपये होता. कंपनीचे EBITDA मार्जिन देखील मागील वर्षीच्या तुलनेत २५.२ टक्क्यांवरून २८.९ टक्क्यांपर्यंत सुधारले.
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.