धाराशिव : मंत्री उदय सामंत यांनी ठाकरेंच्या शिवसेनेतील आमदार आणि खासदार फुटण्याची शक्यता वर्तवली आहे. उदय सामंत यांनी ऑपरेशन ‘धनुष्यबाण’सह ऑपरेशन ‘टायगर’ची चर्चा रंगली आहे. परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी धाराशिवमध्ये ऑपरेशन ‘टायगर’ राबवण्याचे सूचक संकेत दिले. त्यामुळे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगली होती. परंतु, कैलास पाटील यांनी ही चर्चा धुडकावून लावली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेत कुठलीही अस्वस्थता नाही. आम्ही कालही ठाकरेंसोबत होतो आणि उद्याही ठाकरेंसोबत असू. मी आणि ओमराजे निंबाळकर ठाकरेंसोबत राहणार आहे, असं कैलास पाटील यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : पुण्यात ‘NCP’च्या नेत्यानं एका व्यक्तीला उचलून आपटले, अजितदादा संतापले; थेट फोन केला, पण…
26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री प्रताप सरनाईक हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा, सरनाईक यांनी लवकरच ऑपरेशन ‘टायगर’ रावबण्याचे संकेत दिले होते. “धाराशिव जिल्ह्यात बदल झाला, तर त्यात वावगे वाटायला नको. भविष्यातही तुम्ही अनेक बदल अनुभवाल. विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने दाखवून दिले की, खरी शिवसेना कोणाची आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात बदल झाला, तर आश्चर्य वाटून घेऊन नका,” असं वक्तव्य सरनाईक यांनी केले होते.
सरनाईक यांच्या वक्तव्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेतील खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील हे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, आमदार कैलास पाटील यांनी उद्धव ठाकरेंची साथ कधीही सोडणार नाही, असं स्पष्ट केले.
“नवीन सरकार आल्यापासून जिल्ह्यातील काही लोकांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता महाराष्ट्राला दिसत आहे. पण, आम्ही कालही, आजही आणि उद्याही उद्धव ठाकरेंसोबत राहणार आहे. शिवसैनि आणि ठाकरेंमुळे आम्ही आमदार झालो; याची जाणीव मला आहे,” असं कैलास पाटील यांनी म्हटलं.
हेही वाचा : …तर फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील; चंद्रकांतदादांनी स्पष्टच बोलून टाकलं