आर्थिक स्वावलंबनाची ताकद
esakal January 30, 2025 01:45 PM

- अश्विनी आपटे- खुर्जेकर, व्यक्तिमत्त्वविषयक सल्लागार

आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या तीन गोष्टी कुठल्या, असं जर मला विचारलं, तर मी सांगेन,

1) स्वतःचा स्वीकार करणे अगदी गुणदोषांसकट

2) शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले ठेवणे आणि त्यासाठी प्रयत्न करणे

3) आर्थिक स्वातंत्र्य

मैत्रिणींनो, आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे नक्की काय? आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त स्वतः पैसे कमावणे नसून, पैसे कमावण्याचे किंवा वाचवण्याचे, गुंतवणुकीचे, नियोजनाचे स्वातंत्र्य. अशा प्रकारच्या आर्थिक स्वातंत्र्यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो. त्यांना स्वतःच्या निर्णयांवर उभे राहता येते आणि कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय घेता येतो. आर्थिक स्वातंत्र्य महिलांना केवळ सक्षम बनवत नाही, तर त्यांना स्वतःच्या जीवनावर नियंत्रण मिळवण्याची ताकद देखील देते.

आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवायचे?

  • तुमच्या सद्य परिस्थितीचा आढावा घ्या. तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या मासिक खर्चाचा अभ्यास करा. तुमच्या कौशल्यांचा शिक्षणाचा आवडीनिवडीचा आढावा घ्या आणि आर्थिक ज्ञानातील त्रुटी ओळखा.

  • तुमची आर्थिक साक्षरता वाढवा. बजेट बनवणे, बचत करणे, गुंतवणूक करणे शिकून घ्या. ऑनलाइन कोर्सेस, पुस्तके आणि कार्यशाळांमधून आर्थिक शिक्षण घ्या. बँक खाते, म्युच्युअल फंड, विमा, ऑनलाईन पेमेंट्स यांसारख्या साधनांबद्दल माहिती मिळवा.

  • तुम्ही जर नोकरी किंवा व्यवसाय करत नसाल, तर काही फ्रीलान्सिंग काम किंवा कौशल्य-आधारित काम अथवा लघुउद्योग सुरू करून किंवा औपचारिक नोकरी मिळवून तुमच्या कुटुंबाला आर्थिक सहकार्य करा.

  • तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा आढावा घ्या. बचत करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी उत्पन्नाचा एक ठरावीक भाग बाजूला ठेवा. खर्चाचे नियोजन करण्यासाठी एक्सेल शीटचा किंवा ऑनलाईन ॲप्सचा उपयोग करा.

  • भविष्यासाठी नियोजन करण्यासाठी स्पष्ट आर्थिक उद्दिष्ट निश्चित करा. उदाहरणार्थ, घर खरेदी करणे, मुलांचे शिक्षण किंवा निवृत्ती त्यासाठी योग्य योजना निवडा; तसेच आर्थिक सुरक्षिततेसाठी आरोग्य विमा आणि जीवन विमा यांची निवड करा

मैत्रिणींनो, धान्याच्या डब्यात पैसे साठवणे, घर खर्चाचे पैसे वाचवणे, प्रत्येक खर्चाचे पैसे वेगवेगळ्या पाकिटात साठवणे, या नियोजन पद्धतींच्या पुढे जाऊन आजच्या बदललेल्या आधुनिक गरजांना आपण सामोरे जाऊया. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ पैसा कमवणे नव्हे, तर आपल्या जीवनाचे निर्णय स्वायत्तपणे घेण्याची ताकद आहे.

पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा. हा एक मोठा आणि लांब असा प्रवास आहे. त्यामुळे न कंटाळता, न थकता, आत्मविश्वासाने, लहान लहान पावले टाकत राहा. कारण या छोट्या छोट्या पावलांनी तुम्ही फक्त तुमचे आर्थिक स्वातंत्र्यच नाही, तर तुमच्या आणि तुमच्या कुटुंबासाठी एक सुरक्षित आणि मजबूत भविष्य घडवायला मदत कराल. त्यामुळे आजच सुरुवात करा, कारण सुरुवात करायला कधीही उशीर नसतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.