सोलापूर : शिक्षण घेऊन पदवी हाती पडल्यावरही नोकरी, रोजगार मिळत नाही म्हणून निराश, हताश झालेल्या तरुण-तरुणींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने तीन ते १२ महिन्यांतच रोजगार व करिअरची संधी उपलब्ध करून दिली आहे. सध्या विद्यापीठात कौशल्य विकास प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे १४७ कोर्स सुरू आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाअंतर्गत कौशल्य विकासाच्या कोर्सेसना महत्त्वाचे स्थान आहे, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने स्थानिक परिस्थितीचा अभ्यास करून २००५ पासूनच कौशल्य विकासाचे कोर्स सुरू केले. स्थानिक उद्योगांची गरज ओळखून पुढील काळात आणखी कोर्स वाढविण्यात आले. कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. प्रभाकर कोळेकर यांच्या प्रयत्नातून दरवर्षी १४७ कोर्ससाठी दोन हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेश घेतात.
२०१७ पासून शहर-जिल्ह्यातील तब्बल १५ हजार जणांना या कोर्सेसमधून करिअरची संधी मिळाली आहे. आता सोलापूर गारमेंट असोसिएशनसोबतही सामंजस्य करार केला जाणार आहे. जेणेकरून विद्यापीठात कोर्स केलेल्यांना त्याठिकाणी रोजगाराची संधी मिळणार आहे. याशिवाय सोलापूर शहरातील १९८ रुग्णालयांपैकी मोठ्या रुग्णालयांशी संलग्नीकरण करून विद्यापीठात कोर्स केलेल्या तरुण-तरुणींना त्या रुग्णालयांमध्ये प्रशिक्षण व नोकरी मिळू लागली आहे.
करिअरची संधी मिळेल, नक्की वाचा...
विद्यापीठातील कौशल्य विकासाचा प्रमाणपत्र कोर्स करण्यासाठी किमान दहावी पास-नापास आवश्यक
कौशल्य विकासाच्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही
कोर्सचा कालावधी तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षाचा असून सध्या १४७ कोर्स सुरू आहेत
विद्यापीठाच्या संकेतस्थळावर कौशल्य विकास केंद्रावर क्लिक केल्यास सर्वच कोर्सेस व कालावधी आणि शुल्क, पात्रता यासंदर्भातील माहिती मिळते
‘या’ कोर्सेसना मोठी मागणी
विद्यापीठाच्या कौशल्य विकासाच्या प्रमाणपत्र कोर्सेसपैकी आरोग्य सेविका (हेल्थ असिस्टंट), मॉटेंसरी टिचर, स्पोकन इंग्लिश, शेअर मार्केट, योगा, फॅशन डिझायनिंग, ड्रेस डिझायनिंग, ऑफिस ॲटोमेशन, टॅली ईआरपी, ॲक्युप्रेशर, ॲंकरिंग, पर्यावरण माहिती प्रणाली अभ्यासक्रम अशा कोर्सेसना मोठी मागणी आहे. दरवर्षी प्रत्येक सत्रासाठी ९१५ विद्यार्थी प्रवेश घेतात. दरवर्षी साधारणतः २१०० विद्यार्थी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा कोर्स पूर्ण करून करिअरची वाट निवडत आहेत.
कुलगुरुंच्या मार्गदर्शनाखाली नियोजन
सोलापूर जिल्ह्यापुरतेच सुरू असलेले कोर्स आता कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य विकास केंद्राने शासन मान्यताप्राप्त संस्था, कंपनी ॲक्टअंतर्गत नोंदणी केलेल्या संस्था व धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थांनाही विद्यापीठाशी सामंजस्य करार करून हे कोर्स सुरू करता येतील. सामंजस्य कराराअंतर्गत मुंबई, सातारा, जळगाव, कोल्हापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांमध्ये देखील हे कोर्स सुरू केले जाणार आहेत.
- प्रा. डॉ. प्रभाकर कोळेकर, संचालक, कौशल्य विकास, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ