वृत्तसंस्था / नवी दिल्ली
हरियाणातील भारतीय जनता पक्षाचे सरकार यमुनेचे पाणी विषारी बनवित आहे, या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या विधानावर मोठे राजकीय वादंग माजणार, असे दिसून येत आहे. हरियाणा राज्य सरकारने केजरीवाला यांच्या विरोधात अवमान तक्रार सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.
हरियाणाचे मंत्री विपुल गोयल यांनी या विधानावर जोरदार टीका केली आहे. केजरीवाल यांच्या विधानामुळे दिल्ली आणि हरियाणाची जनता भयभीत झाली आहे. केजरीवाल यांचे विधान अत्यंत बेजबाबदार आणि भयंगड पसरविणारे आहे. केजरीवाल यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे हे लक्षण आहे. त्यांना त्यांचा पराभव समोर दिसत असल्याने ते बेताल वक्तव्य करीत आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार सादर करणार आहोत. केजरीवाल यांनी त्वरित हरियाणा आणि दिल्लीच्या जनतेकडे क्षमायाचना केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
केजरीवाल यांचे विधान काय…
हरियाणातून येणाऱ्या यमुनेच्या पाण्यात वीष मिसळलेले असल्याने दिल्लीच्या जलमंडळाच्या इंजिनिअर्सनी या पाण्याचा प्रवाह थांबविला होता, असे विधानही केजरीवाल यांनी केले होते. या विधानालाही भारतीय जनता पक्षाच्या हरियाणा सरकारने तीव्र आक्षेप घेतला आहे. या पाण्यात वीष आहे, हे दिल्लीच्या इंजिनिअर्सना कसे समजले ? त्यांनी पाण्याचे रीतसर परीक्षण केले होते काय ? तसे केले असेल तर त्याचा अहवाल कुठे आहे ? असे अनेक प्रश्न हरियाणाचे मुख्यमंत्री नायाबसिंग सैनी यांनी उपस्थित केले आहेत. केजरीवाल अफवा पसरवीत असून लोकांमध्ये भीती पसरविण्याचा त्यांचा कट आहे, असा आरोप त्यांनी केला.
कास्टल्सचे प्रतिनिधित्व
यमुनेचे पाणी स्वच्छ आहे, असे भारतीय जनता पक्षाचे म्हणणे असेल, तर अमित शहा यांनी हे पाणी जाहीररित्या प्राशन करुन दाखवावे, असे प्रतिआव्हान केजरीवाल यांनी दिले आहे. मात्र, भारतीय जनता पक्षाने या विधानावरही टीका केली असून केजरीवाल सरकारच्या दुर्लक्षामुळे यमुनेचे पाणी बिघडले आहे. हरियाणा सरकारमुळे नव्हे, असा प्रत्यारोप या पक्षाकडून करण्यात आला.
पंतप्रधान मोदी यांच्याकडून खिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही केजरीवाल यांच्या हरियाणाला कारणीभूत मानण्याच्या विधानाची खिल्ली उडविली आहे. मी स्वत: अन्य दिल्लीकरांप्रमाणे यमुनेचेच पाणी पितो. मग या पाण्यात हरियाणातील माझ्याच पक्षाचे सरकार वीष कसे कालवेल याचा थोडा विचार केजरीवाल यांनी करावयास हवा होता, अशी खोचक टिप्पणी त्यांनी दिल्लीतील एका प्रचारसभेत भाषण करताना केली.