जसप्रीत बुमरा ही राष्ट्रीय संपत्ती आहे..! विराट कोहलीचे हे उद्गार टी-२० विश्वकरंडक जल्लोषाच्या आणि विजयोत्सवाच्या वातावरणात तेवढे कोणाच्या लक्षात राहिले नाही; पण खच्चून भरलेल्या स्टेडियममध्ये सर्व जण विराट कोहली मनोगत व्यक्त करत असताना त्याचा उदोउदो करत होते. त्याच वेळी विराटने बुमराचा खास उल्लेख करत केलेले भाष्य कितीतरी पटीने किमती होते, याची प्रचिती आजही येत आहे.
सर्वोत्तम कसोटी खेळाडू आणि तिन्ही प्रकारांतील मिळून दिला जाणारा सर्वोत्तम खेळाडूचा सर गारफिल्ड सोबर्स हा आयसीसीचा पुरस्कार बुमराला जाहीर झाला. पुरस्काराने सन्मान झाला म्हणून नाही; पण आजच्या मितीला भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अन्य देशांतील सर्वोत्तम खेळाडूंची क्रमवारी लावायची झाली तर बुमराचा क्रमांक पहिलाच असेल, हे निर्विवाद!
केवळ आपला भारतीय खेळाडू आहे म्हणून नाही तर आज जगभरातील सर्व आजी-माजी खेळाडू बुमरा सर्वोत्तमातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज आहे हे जाहीरपणे बोलत आहेत. मुळात तेज आणि अतिजलद वेगवान गोलंदाज तयार होणे ही भारतीयांची खासियत नाही. भारतीय क्रिकेट एकापेक्षा एक सर्वोत्तम फलंदाजांसाठी ओळखले जाते; पण अशा भारतातील एक वेगवान गोलंदाज क्रिकेट विश्वावर साम्राज्य निर्माण करतो, हे खरोखरीच अभिमानास्पद आहे.
वेगवान गोलंदाजांना एकदा का मोठी दुखापत झाली, की तो गोलंदाज पूर्वीच्याच जोशात परतणे सोपे नसते. कारण पुन्हा आपल्याला तीच दुखापत पुन्हा होणार नाही, याचा विचार येत असतो; पण बुमरा केवळ परतला नाही तर साम्राज्याबरोबर त्याने दहशतही निर्माण केली.
साधारतः गेल्या दोन वर्षांत म्हणजेच २०२३ मधील मायदेशात झालेली एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा, त्यानंतर ट्वेन्टी-२० विश्वकरंडक आणि या दरम्यान कसोटी अजिंक्यपद मालिकेत ऑस्ट्रेलिया दौऱ्यापर्यंत असलेले भारतीय संघाचे वर्चस्व हे केवळ आणि केवळ बुमरामुळेच होते. आकडेवारीत तुलना करायची म्हटले तर महान खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचे अपयश कायम असताना भारतीय संघाचा हा गोवर्धन बुमराने आपल्या करंगळीवर उचलला यात शंकाच नाही.
आणि म्हणूनच २०२४ मधील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराच्या शर्यतीत बुमराला आव्हानच नव्हते. आजमितीला तिन्ही प्रकारांत आणि तेही वेगवान गोलंदाजाने खेळणे फारच कठीण आहे. २०२३च्या अखेरीस झालेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेनंतर मुळात भारतीय संघ चारच एकदिवसीय सामने खेळला. सर्व भर ट्वेन्टी-२० विश्वकरंडक आणि कसोटी मालिकांवर होता. बुमराने हे दोन्ही प्रकार गाजवले.
मुळात पाठीच्या दुखापतीमुळे तो अनेक महिने क्रिकेटपासून दूर होता. वेगवान गोलंदाजांना एकदा का मोठी दुखापत झाली की तो गोलंदाज पूर्वीचाच जोशात परतणे सोपे नसते. कारण पुन्हा आपल्याला तीच दुखापत पुन्हा होणार नाही, याचा विचार येत असतो; पण बुमरा केवळ परतला नाही तर साम्राज्याबरोबर त्याने दहशतही निर्माण केली.
मायदेशातील इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत ऑली पोपने पहिल्या सामन्यात द्विशतकाच्या जवळ जाणारी मोठी खेळी केली होती. इंग्लंडने तो सामना जिंकला होता; पण पुढच्या सामन्यात बुमराच्या एका यॉर्करने पोपच्या दोन यष्टी उखडून फेकल्या. तो चेंडू दशकातील सर्वोत्तम चेंडू म्हणून गणला जात आहे. त्या एका चेंडूने पोपच काय अख्ख्या इंग्लिश संघाचे मनोबल खच्ची केले होते.
आठवतंय ना... ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी ३० चेंडूत ३० धावांची गरज असताना बुमराने टाकलेला स्पेल आफ्रिकेला विजयाच्या मार्गावरून पराभवाकडे नेणारा आणि भारतीय संघाच्या जवळपास संपलेल्या आशांना संजीवनी नेणारा ठरला होता. बुमराची हीच महानता विराट कोहली जवळून अनुभवत होता, म्हणूनच तो विश्वकरंडक विजेतेपदाच्या जल्लोषात बुमराला ‘राष्ट्रीय संपत्ती’ म्हणून संबोधत होता...
बुमरा हा अहमदाबादमधील असला तरी तो सिख पंजाबी कुटुंबातील आहे. त्याच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. त्यानंतर आईने संगोपन करून त्याला वाढवले. वस्त्रपूर येथील हायस्कूलमध्ये त्याची आई उपप्राचार्य होती. त्यामुळे जसप्रीतवर चांगले शैक्षणिक संस्कार होणे स्वाभाविक असले तरी तो बारावीनंतर शिकलेला नाही; मात्र क्रिकेटमध्ये त्याने मिळवलेली ‘मास्टर डिग्री’ निश्चितच थक्क करणारी आहे. लहानपणापासून क्रिकेटची ओढ होतीच.
२०१० मध्ये गुजरात क्रिकेट संघटनेच्या १९ वर्षांखाली चाचणी स्पर्धेत तो सहभागी झाला. संभाव्य संघात स्थान मिळाले; परंतु गोलंदाजीची काहीशी तिरकस आणि वेगळी शैली असल्यामुळे त्याला अंतिम १५ खेळाडूंत स्थान मिळाले नाही; मात्र त्याच्या संघाने पहिले तीन सामने जिंकल्यानंतर पुढच्या सामन्यासाठी या राखीव खेळाडूंना खेळण्याची संधी देण्यात आली. बुमराने सात विकेट मिळवून आपल्या आगमनाची वर्दी दिली होती.
२०१२-१३ मधील मुश्ताक अली राष्ट्रीय ट्वेन्टी-२० स्पर्धेचे पश्चिम विभागाचे सामने मुंबईत झाले होते. बुमराचीही पदार्पणाची टी-२० स्पर्धा होती. यात गुजरात संघाने पंजाबचा पराभव करून विजेतपद मिळवले आणि अंतिम सामन्यात बुमरा सर्वोत्तम खेळाडूही ठरला; पण त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट या स्पर्धेत घडली होती.. जॉन राईट हे मुंबई इंडियन्स संघाचे प्रशिक्षक होते. ‘टॅलेंट हंट’ या संकल्पनेतून ते अशा स्थानिक स्पर्धांतील सामने पाहायला जात.
गुजरात विरुद्ध मुंबई सामन्यात जॉन राईट यांची नजर बुमरावर पडली आणि आगळीवेगळी शैली असली तरी त्यांनी हा हिरा ओळखला आणि त्याला मुंबई इंडियन्स संघात आणले. पहिले दोन मोसम बुमरा केवळ संघातील अतिरिक्त खेळाडू म्हणून होता.
तेव्हापासून आतापर्यंत बुमरा मुंबई इंडियन्स संघाचा सदस्य आहे; पण आयपीएलच्या निमित्ताने बुमराला क्रिकेटविश्वासमोर आणण्यात जॉन राईट यांचा वाटा सर्वात मोठा आहे. आता मुंबई इंडियन्स संघाकडून तो लसिथ मलिंगानंतर सर्वाधिक १६५ विकेट मिळवणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.
२०१६ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून बुमराने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. यातील ट्वेन्टी-२० मालिकेतील तो सर्वाधिक विकेट मिळवणारा गोलंदाज ठरला. याच वर्षात तो सर्वाधिक २८ विकेट मिळवणाराही गोलंदाज झाला. बुमराचे कसोटी पदार्पण दोन वर्षांनंतर म्हणजेच २०१८ मध्ये झाले. त्यानंतर त्याचा आलेख उंचावतच गेलेला आहे.
या दरम्यान दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर राहिल्यावर बुमरा आता पुन्हा त्याच जोशात गोलंदाजी करू शकणार नाही, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. २०२४ या वर्षात समोर मिचेल स्टार्क, पॅट कमिंस, कागिसो रबाडा, शाहिन शहा आफ्रिदी असे विख्यात वेगवान गोलंदाज असतानाही बुमरा त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे राहिला...
गेल्याच महिन्यात संपलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावे लागले. हाता-तोंडाशी आलेला कसोटी अंतिम सामन्यातील प्रवेश हुकण्याची नामुष्की आली, ती फलंदाजांना सातत्याने आलेल्या अपयशामुळे; मात्र याच दौऱ्यात एकीकडे मिचेल स्टार्क, पॅट कमिंस, जॉश हॅझलवूड आणि बोलंड रोहित शर्मा, विराट कोहली यांना धोबीपछाड देत असताना बुमराने सर्वाधिक ३२ विकेट आणि वर्षभरात केवळ कसोटीत ७१ विकेट मिळवण्याचा पराक्रम केला.
त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्याची सरासरी १५ पेक्षाही कमी होती. सर्वाधिक विकेट आणि कमीत कमी सरासरी याला दहशत असे म्हटले जाते... अशी ही राष्ट्रीय संपत्ती पुढच्या काळात काळजीपूर्वक वापरण्याची गरज आहे. बीसीसीआयने त्याच्यावरील वर्कलोडवर दिवसागणिक लक्ष ठेवायला हवे.