- केदार फाळके, editor@esakal.com
मुघलांना दख्खनेत हवे तसे यश येत नाही हे पाहून शाहजहान स्वतः दख्खनेत उतरला. शाहजहानने आदिलशहाला शाहजीराजांना साहाय्यता करू नये आणि दौलताबादेस खंडणी पाठवून द्यावी असे सांगितले होते. शाहजीराजांनी मुघलांच्या प्रतिकारासाठी उचललेले शस्त्र खाली ठेवले तेव्हा त्यांचे वय ३६ वर्षे होते. महाराष्ट्रातील त्यांच्या कारकिर्दीचा कालखंड हा २५ वर्षांचा आहे. वयाच्या अकरा-बाराव्या वर्षी त्यांनी आपल्या पित्याचे छत्र गमाविले. कितीही संकटे आली तरी ते आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत. नेतृत्व कसे असावे याचा उत्कृष्ट आदर्श त्यांनी हिंदूंसमोर ठेवला.
शाहजीराजांनी निजामशाहीला नवसंजीवनी दिल्यानंतर त्या सल्तनतीची पुनर्बांधणी करण्यासाठी कंबर कसली. देशावरील आणि कोकणातील निजामशाहीच्या ताब्यात आलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावली आणि सैन्यबळ वाढविण्याकडे लक्ष दिले. त्यांनी आदिलशाही आणि कुत्बशाहीशी मैत्रीपूर्ण संबंध राखले होते; त्याचा असा फायदा झाला. या दोन्ही सल्तनतींनी त्यांना आवश्यक ते आर्थिक आणि लष्करी सहकार्य केले. मुरार जगदेव हा मूर्तजास तख्तावर बसविण्याच्या समारंभास उपस्थित होता.
निजामशाहीचा देशावर आणि कोकणात विस्तार झाला होता. उत्तरेस गाळणा, जालना, पूर्वेस बीड, केज, धारूर, कंदार, उदगीर, दक्षिणेस चाकण, तर पश्चिमेस कल्याण-चौल अशा प्रदेशांदरम्यान ही सल्तनत पसरली होती. या सल्तनतीच्या मध्यात शिवनेरी, जुन्नर, नाशिक, चांभारगोंदा ही ठिकाणे होती. निजामशाहीचा साधारण महसूल ८० लाख होन एवढा होता, तर ८४ डोंगरी किल्ले आणि ४० कोट होते. शाहजीराजांकडे पाच हजार स्वार होते. त्यांपैकी दोन हजार आदिलशहाने दिले होते.
मुघलांचा वरिष्ठ मुघल मनसबदार महाबतखान याच्या सांगण्यावरून शाही फौजेने परांड्याचा किल्ला वेढा घालून घेण्याचे ठरविले. मुघल फौज परांड्याकडे जात असताना तिची वाट अडविण्यासाठी आणि दौलताबादेचा परिसर लुटून जाळण्याचे शाहजीराजांनी नियोजन केले. त्याप्रमाणे त्यांनी फौजेची जुळवाजुळव केली.
या रणनीतीला प्रत्युत्तर म्हणून मुघलांनी अशी योजना आखली. शाहजीराजांचा जुन्नरपर्यंत पाठलाग करून त्यांची जागीर असणाऱ्या चांभारगोंद्याचा विध्वंस घडवून आणावा. राजांच्या हालचालींना पायबंद घालण्यासाठी मुघलांची एक तुकडी संगमनेरास ठेवण्यात आली.
मुघल सैन्य परांड्याच्या परिसरात जाऊन पोहोचल्यानंतर आदिलशाही सैन्याबरोबर त्यांच्या दररोज चकमकी उडू लागल्या. १६३४च्या फेब्रुवारीपासून ते मेपर्यंत दोन्ही सल्तनतींमध्ये घमासान युद्ध झाले. मुघलांना परांडा घेता आला नाही. फौजेत अव्यवस्था निर्माण झाली आणि महाबतखानही आजारी पडून मरण पावला. १६३५च्या सुरूवातीस शाहजीराजांनी महाबतखानाच्या मृत्यूचा फायदा उचलला.
त्यांनी दौलताबादेच्या परिसरातून खंडणी (जमीन महसूल आणि इतर कर) वसूल करण्यास सुरुवात केली. त्यांच्या हालचालींना पायबंद घालण्यासाठी खान दौरानाने बलाढ्य फौजेसह बुऱ्हाणपूर सोडले आणि खडकीस पोहोचला. या वेळी शाहजीराजांनी धावती लढाई करून शत्रूला कसा चकवा द्यावा याचे उत्कृष्ट प्रात्यक्षिक सादर केले. त्यांचा पाठलाग करताना मुघलांची धावपळ होऊन चांगलीच दमछाक झाली.
खान दौरान खडकीस असताना त्यास असे समजले, की मराठे रामडोहाकडे गेले आहेत. त्यांच्या पाठलागावर तो बाणगंगेपर्यंत गेला असता त्यास असे समजले, की मराठे शेवगावला गेले आहेत. तो शेवगावला गेला तेव्हा तेथून दोन कोसांवर ओढ्याच्या काठी मराठे एकत्र आले होते. तेथून ते अमरापुराकडे निघून गेले होते. मुघलांनी आता शेवगावाहून अमरापुराकडे कूच केले.
मराठे तेथूनही निघून गेले आणि त्यांनी मोहरी घाटातून पुढे सरकण्याचा बेत आखला. त्यांनी आपली सामग्री माणिकदौंडी घाटातून जुन्नरकडे पाठवून दिली. इथे मात्र मुघलांनी मराठ्यांना गाठले आणि उडालेल्या चकमकीत अनेक सैनिक ठार होऊन शाही सैन्याला भरपूर लूट मिळाली.
मराठ्यांना तोंड देण्यासाठी नगरच्या किल्ल्यात आवश्यक ती सामग्री असल्याचा खान दौरानास विश्वास आला. शिवाय खान जमानही दौलताबादेच्या परिसरात होता. जिंकून घेतलेल्या निजामशाही प्रदेशात थोडीफार व्यवस्था लागलेली आहे याची खात्री झाल्यानंतर खान दौरान बुऱ्हाणपुरास निघून गेला.
शाहजहान स्वतः दख्खनेत
मुघलांना दख्खनेत हवे तसे यश येत नाही हे पाहून शाहजहान स्वतः दख्खनेत उतरला. १६३६च्या सुरुवातीस त्याने हांडिया येथे नर्मदा ओलांडली. येथून त्याने आदिलशहा आणि कुत्बशाह यांना कडक फर्माने रवाना केली. शाहजहानाने आदिलशहाला बजावले होते. त्याने शाहजीराजांना साहाय्यता करू नये आणि दौलताबादेस खंडणी पाठवून द्यावी.
शाहजहानाने आदिलशाहास शाहजीराजांना साह्यता करण्यापासून परावृत्त करण्यासाठी सोलापुराचा किल्ला आणि वार्षिक नऊ लक्ष होन एवढा महसूल मिळणारा प्रदेश देण्याची तयारी दाखविली. कुत्बशाहाला पाठविलेल्या फर्मानात मशिदीत पढल्या जाणाऱ्या खुत्ब्यात इराणच्या शाहाचे नाव न वापरता शाहजहानाचे नाव वापरावे आणि खंडणीची थकबाकी जमा करावी असे बजाविण्यात आले होते.
निजामशाहीचा शाहजीराजांच्या ताब्यात असणारा प्रदेश जिंकण्याकरिता शाहजहानाने तीन फौजा तयार करून त्या खान दौरान, शायस्ताखान आणि खान जमान यांच्या नेतृत्वाखाली पाठवून दिल्या. याशिवाय आदिलशाहीचा मुलूख बेचिराख करण्यासाठी दोन हजार सैनिकांची स्वतंत्र तुकडी तयार करण्यात आली. कुत्बशाह केवळ फर्मानाने घाबरून गेला. त्याने मशिदीत शाहजहानाच्या नावाने खुत्बा पढला, नाणी पाडली आणि खंडणीची थकीत रक्कम पाठवून दिली.
उपर्युक्त तीन फौजांपैकी खान दौरानाची फौज कंदार-उदगीरामार्गे आदिलशाहीत शिरली. तिने बिदर-कल्याणी परिसरात लोकांची बेसुमार कत्तल उडवून जाळपोळ-लुटालूट केली. तेथून विजापुराकडे सरकत या फौजेने गुलबर्ग्याचा परिसर आणि गावे लुटून जाळून टाकली. खान दौरान याने विजापुरापासून बारा कोसांपर्यंत धडक मारली. तेथून तो कुत्बशाहीकडे सरकला आणि तो प्रदेश लुटून जाळला. त्याचा मुक्काम औशाजवळ असताना त्यास शाहजहानाचे फर्मान आले. आदिलशाहीशी तह केला असून, प्रदेशाची नासाडी करू नये. उदगीर आणि औसा हे किल्ले जिंकून घ्यावेत. त्यानंतर तो जून १६३६ मध्ये उदगीरकडे सरकला.
दुसऱ्या फौजेचे नेतृत्व खान जहान करीत होता. तो धारूरास पोहोचला, शिरढोण काबीज केले आणि धाराशीव लुटले. त्याने काटी हे गाव जिंकून देवगाव लुटले आणि साहोरास आला. २ एप्रिल १६३६ तारखेस झालेल्या लढाईत त्याने आदिलशाही सैन्याचा पराभव केला. या लढाईत रणदौलाखान जखमी झाला. त्याने ११ एप्रिल या दिवशी रणदौलाखानाच्या नेतृत्वात लढणाऱ्या आदिलशाही फौजेचा पुन्हा पराभव केला. त्याचा मुक्काम धारूराला असताना शाहजहान आणि आदिलशहा यांच्यात तह होऊन त्यास दरबारात बोलावून घेण्यात आले.
पहिली फौज खान जमानाच्या नेतृत्वाखाली देण्यात आली होती. तिला शाहजीराजांची जागीर लुटून उद्ध्वस्त करण्याचा हुकूम सोडला होता. खान जमान जुन्नराच्या परिसरात असताना शाहजीराजे पुणे परगण्यातील लोहगावास आले. खानाने चांभारगोंदे आणि परिसर ताब्यात आणला. त्याने थेट कोल्हापुराला धडक मारली आणि तो परिसर, तसेच मिरज लुटले. त्याने जून १६३६ मध्ये शाहजहानाची भेट घेतली. त्यास हुकूम सोडण्यात आला, शाहजीचा पराभव करावा.
अल्लाहवर्दीखानास दोन हजार सैन्यासह शाहजीराजांच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकून घेण्यासाठी रवाना करण्यात आले. त्याने चांदवड, कांचना, मांचना, खळा, जवळा, अहिवंत, राजदेहेर, धोडप आणि इतर किल्ले जिंकले.
तिसरी फौज शायस्ताखानाच्या नेतृत्वात देण्यात आली. त्याने संगमनेर परिसर जिंकला आणि जुन्नरवर मुघलांचा झेंडा फडकविला. मराठ्यांनी जुन्नर पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. याचवेळी मुघलांनी अंकाई, टंकाई हे किल्ले जिंकून घेतले. १६३६च्या मेपर्यंत दख्खनेच्या राजकारणात या सर्व घडामोडी अत्यंत वेगाने घडत होत्या.
निजामशाहीचे विघटन
मुघल फौजा सर्व बाजूंनी आपल्या सल्तनतीमध्ये घुसून प्रदेशाची नासाडी करीत असल्याचे मुहम्मद आदिलशहास दिसले. आपल्या सरदारांचे झालेले पराभव आणि गमाविलेले किल्ले पाहून त्याने शाहजहानबरोबर मे १६३६मध्ये तह केला. या तहान्वये निजामशाहीचे विघटन झाले. तहात पुढील कलमे होती -
आदिलशहाने शाहजहानाचे मांडलिकत्व मान्य करावे.
निजामशाहीचा मुलूख मुघल आणि आदिलशहा यांनी वाटून घ्यावा.
आदिलशहाला निजामशाहीच्या मिळालेल्या मुलखात पुढील प्रदेशांचा समावेश झाला होता ः भीमा आणि सीना या दोन नद्यांमधील प्रदेश, सोलापूर आणि परांडा हे किल्ले, तसेच प्रदेश, ईशान्येकडील भालकी आणि चिडगुपा परगणे, पुणे आणि चाकण परगणे, निजामशाही कोकण. या सर्व मुलखात ५० परघणे होते आणि वार्षिक उत्पन्न वीस लाख होन एवढे होते. राहिलेला मुलूख जो भीमेच्या उत्तरेकडे आहे तो मुघल साम्राज्याला जोडण्यात आला.
आदिलशहाने तहाकरिता पाच लाख होन द्यावेत.
मांजरा नदी आदिलशाही आणि कुत्बशाहीची सीमा असेल. पहिल्याने दुसऱ्यास त्रास देऊ नये.
परस्परांनी एकमेकांच्या नोकरांना सेवेत घेऊ नये.
शाहजी भोसले याने निजामशाही वंशातील एका मुलाला पुढे करून जुन्नर, त्रिंबक इत्यादी किल्ले अजूनही आपल्या हातात ठेविले आहेत. हे किल्ले तो शाहजहानास देईपर्यंत आदिलशहाने त्यास आपल्या नोकरीत ठेऊ नये. त्याने तसे करण्याचे नाकारले तर त्यास आदिलशाहीत आश्रयच काय, तर प्रवेशही दिला जाऊ नये.
परिस्थितीवर नियंत्रण प्रस्थापित करून शाहजहान आग्र्यास परतला. त्यास डिसेंबर १६३६मध्ये मुघलांनी उदगीर आणि औसा हे किल्ले जिंकून घेतल्याचे वृत्त समजले.
१६३३ प्रमाणे सर्वांनी शस्त्रे खाली ठेवली होती, तरीही शाहजीराजांनी अजूनही हार मानली नव्हती. आपल्या लढाऊ वृत्तीला शोभेल असा लढा त्यांनी सुरू ठेवला, मात्र यावेळी परिस्थिती बदलली. शाहजीराजांना मिळणारी रसद थांबली, उपर्युक्त दोन्ही शाह्यांचे साह्य थांबले, रक्षण करणारे किल्ले ताब्यातून गेले आणि सैन्यसंख्या घटत गेली.
पूर्वी शाहजीराजांना साहाय्य करणारा रणदौलाखान आता आदिलशाहाच्या हुकमावरून मुघलांना साहाय्य करीत होता. खान जमानाच्या नेतृत्वात राजांविरुद्ध चालून आलेल्या या मुघल फौजेबरोबर रणदौलाखानाची आदिलशाही फौजही होती.
शाहजीराजांनी अखेरचा लढा सुरू केला. त्यांनी कुंभा घाटातून कोकणात उतरून तेथील राज्यकर्त्यांची साहाय्यता मिळविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नांना यश आले नाही. ते मुरंजनामार्गे माहुलीला गेले. मुघलांनी त्यांचा पाठलाग करीत अनेक सैनिकांना ठार केले आणि बरेच साहित्य ताब्यात घेतले. हा पाठलाग माहुलीपर्यंत लांबत गेला. खान जमानाने माहुली गाठून किल्ल्याला मोर्चे लावले.
सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यावर शाहजीराजांनी अखेर माघार घेतली. त्यांनी मुघलांच्या सेवेत जाण्याची तयारी दाखविली; परंतु खान जमानाने सांगितले, की जीव वाचवावयाचा असेल तर आदिलशाहीत जावे. त्याप्रमाणे तहनामा ठरविण्यात आला. त्यातही काही अटी राजांना उपयुक्त नव्हत्या. मात्र सर्व उपाय हरले होते. ते मूर्तजा निजामशाहाला घेऊन माहुली उतरले. निजामशाहास खान जमानाच्या हवाली केले. आपल्या ताब्यातील जुन्नरसहित (शिवनेरी) इतर किल्ले मुघलांना दिले आणि रणदौलाखानासोबत विजापुरास निघून गेले.
खान जमानाने आपली मोहीम यशस्वी झाल्याचे पत्र शाहजहानास पाठवून दिले. त्याने कैद केलेल्या निजामशाहास सोबत घेऊन मुघल दख्खनेचा सुबादार औरंगजेबाची भेट घेण्याकरिता दौलताबादेकडे पाऊल टाकले. औरंगजेब कैद केलेल्या निजामशाहाला घेऊन एप्रिल १६३७मध्ये आग्र्यात पोहोचला. मुघलांनी १५९९मध्ये नगर जिंकले तेव्हा एका निजामशाहाला, १६३३मध्ये दौलताबाद जिंकले तेव्हा दुसऱ्या निजामशाहाला आणि आता या तिसऱ्या निजामशाहाला कैद केले. या सर्वांना ग्वाल्हेरच्या किल्ल्यात डांबण्यात आले. अशा प्रकारे मुघलांनी निजामशाहीचा घास घेतला.
पुनरावलोकन
शाहजीराजे रणदौलाखानाबरोबर विजापुरास निघून गेले. त्यांची कर्नाटकात नेमणूक करण्यात आली. महाराष्ट्र सोडून एकदा ते दूर कर्नाटकात निघून गेल्यानंतर आपल्या मातृभूमीत पुन्हा परत आल्याची नोंद नाही. शाहजीराजांनी मुघलांच्या प्रतिकारासाठी उचललेले शस्त्र खाली ठेवले तेव्हा त्यांचे वय ३६ वर्षे होते. महाराष्ट्रातील त्यांच्या कारकिर्दीचा कालखंड हा साधारण २५ वर्षांचा आहे. वयाच्या अकरा-बाराव्या वर्षी त्यांनी आपल्या पित्याचे छत्र गमाविले.
अतिशय मोठ्या जागिरीची अल्पवयात त्यांच्या खांद्यावर जबाबदारी येऊन पडली, ती त्यांनी लिलया पेलली. वयाच्या चोविसाव्या वर्षी आपला पाठचा भाऊ, पाठीराखा, डोळ्यांसमोर धारातीर्थी पडला, तरी राजांनी आपले धैर्य गमविले नाही. त्यांच्या पत्नीला आणि मुलीला मुघलांनी कैद केले तरी ते आपल्या ध्येयापासून विचलित झाले नाहीत.
नेतृत्व कसे असावे याचा उत्कृष्ट आदर्श त्यांनी हिंदूंसमोर ठेवला. ज्या निजामशाहीत त्यांची कारकीर्द बहरली ती सल्तनत म्हणजे मलिक अंबर असे देशात समीकरण तयार झाले होते. या मलिक अंबर याने चौल पंचक्रोशीतील हिंदूंवर ‘जकात-ए-हिंदूवानी’ हा अन्यायकारक कर लादला होता. त्याची वर्तणूक वाईट होती, त्यास विलक्षण गर्व होता आणि त्याच्यात उद्दामपणा होता. अशा मलिक अंबराची रेड्यावरून धिंड काढण्याचा शाहजीराजांनी चंग बांधला होता.
मध्ययुगीन कालखंडात राज्यकर्त्यांनी आपल्या जागिरीचे व्यवस्थापन कसे करावे याचे उत्कृष्ट उदाहरण शाहजीराजांनी सर्वांपुढे ठेवले. त्यांच्याकडे अपुरी सामग्री होती, आर्थिक स्थितीही बेताची होती, सैन्यबळ अल्प होते. अशा वेळी त्यांनी गिरीदुर्गांच्या साह्याने आपला लढा सुरू ठेवला. धावत्या लढाया कशा लढावयाच्या याची तर प्रात्यक्षिके सादर केली.
संक्रमणाच्या कालखंडात ते कोणत्याही सल्तनतीमध्ये असू देत, त्यांनी आपला मुकासा-पुण्यावरील ताबा कधीही ढिला होऊ दिला नाही. या दूरदृष्टीचा त्यांना असा फायदा झाला, की संकटाच्या काळात या मुकास्यामध्ये आश्रय घेता आला. कमकुवत आर्थिक स्थिती आणि अल्प सैन्य या आपल्या पडत्या बाजू सावरण्याकरिता त्यांनी मोठ्या चातुर्याने आदिलशाही आणि कुत्बशाही या सल्तनतींची साह्यता घेतली.
मुघल साम्राज्याविरुद्ध बंड करण्याचे त्यांनी दाखविलेले धैर्य विलक्षण आहे. प्रामुख्याने मुघलांविरुद्ध बंड केलेले हिंदू राज्यकर्ते जिवंत राहू शकले नाहीत, त्यांना ठार करण्यात आले. शाहजीराजे मात्र या गोष्टीस अपवाद ठरले. इथे त्यांची अफाट बुद्धिमत्ता अधोरेखित होते. आदिलशाहीत परतण्याचा एक दरवाजा त्यांनी कायम उघडा ठेवला होता, ज्याचा त्यांना १६३६ मध्ये उपयोग झाला. अशी ही शाहजीराजांची महाराष्ट्रातील कारकीर्द आहे.