The evolution of Dhanurveda :अथ धनुर्वेद:।
esakal February 02, 2025 12:45 PM

गिरिजा दुधाट, dayadconsultancies@gmail.com

एकऽपि यत्र नगरे प्रसिद्ध: स्याध्दनुर्धर: ।

ततो यान्त्यरयो दूरान्मृगा: सिंहगृहादिब ।।

अर्थात, जशी अरण्यातली हरणे सिंहाच्या गुहेपासून दूर पळतात, तसे कुशल धनुर्धर असलेल्या नगरापासून शत्रू दूर राहतात. धनुष्यबाण... किमान तीस हजार वर्षांचा इतिहास असलेलं शस्त्रं! भारताच्या समृद्ध शस्त्रभूमीमध्ये या शस्त्रावर ‘वेदां’च्या तोडीचा ग्रंथ म्हणजेच-‘धनुर्वेद’ वेगवेगळ्या कालखंडात लिहिला गेला, तोही एक-दोन नव्हे, तर वसिष्ठ, जामदग्न्य, औशनस, विश्वामित्र अशा वेगवेगळ्या सात शाखांचा! भारतीय युद्धशास्त्राच्या व्यापक परिघात दीर्घ काळ व्यूहरचनेपासून ते अगदी मल्लयुद्धापर्यंतचे घटक ‘धनुर्वेदा’ची अंगे मानली गेली होती. थोडक्यात, धनुर्वेद ही केवळ धनुर्विद्येसंबंधी नाही, तर शस्त्रांसंबंधीच्या विविधांगी पैलूंना सामावून घेणारी शस्त्रशाखा होती.

भारतामध्ये प्राचीन ते मध्ययुगीन काळापर्यंत (अगदी अठराव्या शतकापर्यंत) धनुष्यबाण सैन्यामधल्या घोडदळ, गजदळ, पायदळ या सगळ्यांकडून वापरले जायचे, शिवाय धनुष्यबाण फक्त युद्धाचे नाही, तर खेळ, शिकार, स्पर्धा अशा माध्यमातून वापरले जाणारे मनोरंजनाचेही साधन होते. धनुष्यबाणाइतकं परस्परावलंबी शस्त्र शोधून सापडणार नाही! बाण चालवायचा, तर धनुष्य पाहिजे, धनुष्य वापरायचं तर बाण पाहिजे, दोन्ही वापरायचं तर प्रत्यंचा पाहिजे, चालवताना वारा नियंत्रित पाहिजे, जास्त काळ हे शस्त्र चालवायचं, तर मुबलक साठा पाहिजे! थोडक्यात काय... धनुष्यबाण हे अनेक घटकांच्या समन्वयाने चालणारं किंबहुना चालवावं लागणारं शस्त्र होतं. याशिवाय तुमचे कौशल्य, सराव, अनुभव या गोष्टी वेगळ्याच!

धनुष्याचे अवयव

जसं आपलं शरीर डोके, हात, पाय अशा अवयवांचं बनलेलं आहे, अगदी तसंच प्रत्येक शस्त्रसुद्धा वेगवेगळ्या अवयवांनी बनलेलं असतं. त्यांच्या प्रत्येक अवयवालाही नेमून दिलेली कामं असतात. धनुष्याचं अंग बनलेलं असायचं लाकूड/शिंगं/चामडं किंवा अगदी धातूचंसुद्धा. आता बघूया धनुष्याचे अवयव कोणते आणि ते काय काय करतात :

पहिले असते ते ‘परस्थ’ म्हणजे धनुष्याचे मुख्य अंग. धनुष्याचा प्रकार कोणता? त्याचा पल्ला किती? अशा गोष्टींवरून या ‘परस्था’चा आकार कधी सरळ, कधी कमानदार, तर कधी दुहेरी बाकदार बनवला जायचा. दुसरी असते ती म्हणजे ‘मूठ’. परस्थाच्या बरोबर मध्यभागी बाण ठेवण्यासाठी आणि धनुष्य धरण्यासाठी बनवलेली पकड. याला ‘कमानखाना’सुद्धा म्हटलं जायचं. हाताला व्यवस्थित पकड मिळावी यासाठी बरेचदा या मुठीवर कापड, दोऱ्या, सुतळ्या किंवा रेशमाचे धागे गुंडाळले जायचे. ही मूठ पकडण्याचेही तुंग, समद्धृत, परिमण्डल असे विविध पवित्रे असायचे पण त्याबद्दल नंतर कधीतरी!

धनुष्याचे ‘उदर’ म्हणजेच त्याचे पोट! परस्थाचा भाग तयार केल्यानंतर त्याच्या विरुद्ध बाजूचा, आतला भाग म्हणजे ‘उदर’, याला ‘सुफर’सुद्धा म्हटलं जायचं. उदराचं काम काय? तर धनुष्याला बळकटी देणं आणि बाण सोडताना धनुष्यावर येणारा ताण सहन करणं. परस्थाच्या दोन टोकांना दोरी लावण्यासाठी दोन खाचा कोरल्या जायच्या. यांना ‘खाचा’ किंवा ‘गोशा’ म्हटलं जाई. धनुष्याचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणजे, त्याला जोडली जाणारी प्रत्यंचा उर्फ मौर्वी उर्फ जीवा उर्फ द्रुणा किंवा फारसी मध्ये चिल्लाह/जीह/रोडा. धनुष्य कितीही चांगले बनवले, बाण कितीही उत्तम असला, तरी प्रत्यंचेशिवाय दोन्हीचाही उपयोग शून्य!

ही प्रत्यंचा बनवण्यासाठी पारंपरिक पद्धतीत हरीण, म्हैस किंवा रेड्याच्या नसांचा वापर केला जाई. मध्ययुगात याबरोबरच रेशीम, गवत तसेच भाद्रपद महिन्यात काढलेल्या झाडांच्या सालींचाही वापर केला जायचा. जामदग्न्य धनुर्वेदात या प्रत्यंचेबद्दल फार सुंदर संकल्पना सांगितली आहे. हा धनुर्वेद सांगतो, की प्रत्यंचा ही तीन सूत्रांची-म्हणजे तीन धाग्यांची बनवावी. प्रत्यंचेचे हे तीन सूत्र म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेशाचे प्रतीक आहेत. त्यामुळे त्रिसूत्री प्रत्यंचा ही कार्यसाधक आहे! शस्त्राच्या एखाद्या भागाबद्दलचा किती खोल विचार! बाणाचा पल्ला, बाणाची दिशा, धनुष्याची ताकद अशा अनेक गोष्टी प्रत्यंचेच्या साह्याने नियंत्रित केल्या जायच्या.

बाण

धनुर्विद्येचे दुसरे अविभाज्य अंग म्हणजे ‘बाण’. हा बाण तीर, शर, बुंद, असुसू, अंबू अशा वेगवेगळ्या नावांनी भारताच्या वेगवेगळ्या भागात ओळखला जायचा. वेत, बांबू आणि लाकूड हे बाण बनवण्यासाठी सर्वाधिक वापरले जाणारे घटक होते. जशी धनुष्याची अंगे असतात, तशीच त्यासोबत वापरल्या जाणाऱ्या बाणाचीही असतात. यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे बाणाचं टोक, ‘शृंग’. या शृंगाचा आकार नेमका कसा आहे - त्रिकोणी, काट्याप्रमाणे, बदामी, वक्र अशा अनेक आकारांवरून बाणांचे वेगवेगळे प्रकार बनवले गेले होते. बाणांच्या टोकांच्या आकारावरून त्यांचे सूची, आरामुख, क्षुरप्र, लिप्त, तीर, घेरा, खदंग असे अनेक प्रकार अस्तित्वात होते. प्रत्येक आकाराच्या बाणाचं काम वेगळं!

दुसरा भाग म्हणजे ‘शाल्य’, बाणाचा दंड. या शाल्याच्या खाली बाण धनुष्यावर लावण्यासाठी लहान खाच कोरली जायची, ती म्हणजे बाणाची ‘तेजना’. बाण धनुष्यातून सोडल्यावर लक्ष्यापर्यंत जाईपर्यंत वाऱ्याची दिशा, वेग, धनुष्याची ताकद अशा अनेक गोष्टींचा त्याच्यावर परिणाम होई. त्या सर्वातून बाणाचं उड्डाण स्थिर व्हावं म्हणून तेजनेच्या आजूबाजूला मोर, कावळा, गिधाड, साळुंखी अशा पक्ष्यांची पिसे लावली जायची आणि यांना ‘परनानी’ म्हटले जायचे. बाणाचं संतुलन, स्थिर उड्डाण, परिणाम या गोष्टी बाणावर लावली जाणारी पिसे, तसेच शाल्यावर गुंडाळल्या जाणाऱ्या दोऱ्या, वेताच्या कामट्या यांनी नियंत्रित केल्या जायच्या.

तरकश

धनुष्यबाण युद्धावर घेऊन जायचे म्हणजे हातात धरून तर नेता येणार नाहीत. त्यांना घोडयावर, पायी चालताना सोबत वागवण्यासाठी काहीतरी लागणारच. मग शस्त्रकर्त्यांनी बाण ठेवण्यासाठी तयार केले बाणांचे भाते, अर्थात मध्ययुगातले ‘तरकश’. लाकूड, चामडे, बांबू अशा गोष्टींपासून तयार केलेल्या भात्यामध्ये बाण उलटे ठेवले जायचे. तरकशमध्ये ठेवल्यावर बाणांची टोकं बोथट होऊ नयेत म्हणून तरकशच्या तळाला आतल्या बाजूने कापड किंवा कापसाचं आवरण लावलं जायचं. धनुष्य ठेवण्यासाठीही धनुष्याच्या आकाराच्या कापडी पिशव्या बनवल्या जायच्या. यामध्ये निम्मं धनुष्य बरोबर सामावलं जायचं. या पिशव्यांना ‘किरबान’ म्हटलं जाई.

तरकश आणि किरबान या दोन्हींनाही अंगावर किंवा घोड्यांवर बांधण्यासाठी कापडी किंवा चामडी पट्टे बसवले जायचे. धनुष्यबाणाला पूरक अशीही काही उपकरणं मध्ययुगात वापरली जायची. बाण सोडताना अंगठ्याचे चामडे सोलवटू नये म्हणून वापरले जाणारी अंगुलीत्राणं, युद्धांमध्ये अंगात रूतलेले बाण काढण्यासाठी पकडप्रमाणे असलेले ‘तीरकश’, भात्यामधून बाण काढण्यासाठी वापरला जाणारा ‘पैकनकश’ - चिमटा अशी वेगवेगळी, आज फारशी माहीत नसलेली उपकरणे वापरली जायची.

धनुर्विद्या : एक थेरपी

काळ बदलला, युद्ध, युद्धातली तंत्र, शस्त्रं बदलत गेली. बदलत्या काळानुसार युद्धांतून धनुर्विद्येची संपन्न परंपरा कालबाह्य झाली. १८५९ च्या शस्त्रबंदीनंतर नागर जीवनाला धनुर्विद्येचा असा काही विसर पडला, की हजारो वर्षांच्या समृद्ध शस्त्रपरंपरेला अवघ्या शे-दोनशे वर्षांत ओहोटी लागली. आजमितीस मध्ययुगापर्यंत प्रचलित असणारी पारंपरिक धनुर्विद्या बव्हंशी विस्मरणात गेली आहे.

याचे काही अंश आधुनिक काळात आजही आदिवासी समाजातील धनुर्विद्यांमध्ये टिकून आहेत. धनुर्विद्या ही फक्त शस्त्रकला आहे का? तर नाही! शरीराचे संतुलन, श्वासांवर नियंत्रण, एकाग्रता, अचूकता, चापल्य अशा सर्व कौशल्यांची मिळून असणारी ही ‘थेरपी’ आहे. वेगाने लुप्त होणाऱ्या या शस्त्रकलेचे पुनरूज्जीवन होणे गरजेचे आहे, पण त्याही आधी तिचे भारताच्या विविध भागातील दस्तावेजीकरण अत्यावश्यक आहे!

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.