5th T20I Wankhede Stadium Live : भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत ४-१ असा दणदणीत विजय मिळवला. अभिषेक शर्माने ( ) अष्टपैलू कामगिरी करून विजयात सिंहाचा वाटा उचलला. भारताच्या ९ बाद २४७ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडचा संपूर्ण संघ १०.३ षटकांत ९७ धावांवर तंबूत परतला. इंग्लंडचा हा ट्वेंटी-२०तील सर्वात वाईट पराभव ठरला, त्यांना १५० धावांनी हार पत्करावी लागली.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारताचा २२ ट्वेंटी-२० सामन्यांतील १८वा विजय ठरला.अभिषेकने ५४ चेंडूंत ७ चौकार व १३ षटकारांसह १३४ धावांची खेळी केली आणि नंतर गोलंदाजीत दोन विकेट्सही घेतल्या. एका ट्वेंटी-२० सामन्यांत शतक व दोन विकेट्स घेणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला. फलंदाजीत अभिषेकला तिलक वर्मा ( २४), शिवम दुबे ( ३०) आणि अक्षर पटेल ( १५) यांची साथ मिळाली आणि भारताने २४७ धावांपर्यंत मजल मारली
इंग्लंडचा सलामीवीर फिल सॉल्ट २३ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांची खेळी करून एकटा नडला. पण, १०.३ षटकांत इंग्लंडचा संपूर्ण संघ ९७ धावांत माघारी परतला. इंग्लंडला अभिषेकच्या १३५ धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. मोहम्मद शमीने २५ धावांत ३ विकेट्स घेतल्या, तर वरुण चर्क्रवर्थी ( २-२५), शिवम दुबे ( २-११) व अभिषेक ( १-०-३-२) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
या मालिका पराभवानंतर निराश असल्याची प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर यांनी दिली. त्याने टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचे कौतुक केले. IND vs ENG यांच्यातल्या पाच सामन्यांच्या ट्वेंटी-२० मालिकेत अभिषेकने सर्वाधिक २७९ धावा केल्या, तर वरुण चक्रवर्थीने सर्वाधिक १४ विकेट्स घेतल्या. अभिषेकला या सामन्यात चार पुरस्कार मिळाले आणि त्याचे प्रत्येकी १ लाख बक्षीस म्हणून त्याला दिले गेले.
अभिषेक म्हणाला, खूप चांगलं वाटतंय... प्रशिक्षक व कर्णधारांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले आणि त्यावर मी आज खरा उतरलो त्याचा आनंद आहे. चेंडू आला की त्याला टोलवण्याची माझी रणनीती होती. आदिल राशीदला मारलेला षटकार माझ्यासाठी खास होता. युवी पाजीने मला १५-२० षटकांपर्यंत खेळ असा सल्ला दिला होता आणि गंभीर यांचेही हेच मत होते.
मालिकेत १४ विकेट्स घेणाऱ्या वरुणला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. त्याला आजच्या सामन्यात सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा पुरस्कारही दिला गेला. तो म्हणाला, "मला आनंद आहे की क्षेत्ररक्षणाने देखील काही टाळ्या मिळवल्या. मी सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे, पण सुधारण्यासाठी भरपूर वाव आहे. काही [खराब] चेंडू मला टाकायला नको होते. हा पुरस्कार मी माझ्या मुलाला आणि पत्नीला आणि आई-वडिलांना समर्पित करू इच्छितो.