५० हजार हक्काची घरे देण्यासाठी मिशन मोडवर काम करा -पालकमंत्री प्रकाश आबिटकर
Inshorts Marathi February 03, 2025 04:45 AM
  • ‘आम्ही सोबती घरकुलाचे’ मोहीमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर, दि. ०२ (जिमाका): प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व अन्य राज्यस्तरीय योजनांतून कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू कुटुंबांसाठी कमीत कमी 50 हजार हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी महसूल, समाज कल्याण, जिल्हा परिषद व संबंधित यंत्रणेने मिशन मोडवर काम करावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केल्या.

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण- टप्पा 2 ची आढावा बैठक पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे आदी उपस्थित होते.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळा सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षित केल्याबद्दल पालकमंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, सरपंच व गट विकास अधिकारी, ग्रामसेवक यांना सन्मानित करण्यात आले.

पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले की, प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असून राज्य शासनही या योजनेला सर्वतोपरी सहकार्य करत आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण मधून जिल्ह्यातील 44 हजार लाभार्थ्यांना या आर्थिक वर्षात घरकुलाचा लाभ देण्यात येणार असून अन्य राज्यस्तरीय योजनांमधून 10 हजार घरकुले अशाप्रकारे किमान 50 हजारांहून अधिक घरकुलांचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. गरजू कुटुंबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेने समर्पित भावनेने काम करावे. लाभार्थ्यांची यादी निश्चित करण्यापासून ते त्यांच्या गृह प्रवेशा पर्यंतची सर्व कामे वेळेत व गतीने मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व ग्रामसेवकांनी परस्पर समन्वय साधून झोकून देऊन काम करावे, असे त्यांनी सूचित केले.

आम्ही सोबती घरकुलाचेया मोहीमेचा पालकमंत्री श्री.आबिटकर यांच्या हस्ते शुभारंभ

प्रधानमंत्री आवास योजना व अन्य राज्यस्तरीय घरकुल योजनेतून लाभार्थ्यांसाठी घरकुले उभी करताना त्यांना मूलभूत सुविधा देणे आवश्यक आहे. यासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून ‘आम्ही सोबती घरकुलाचे’ ही मोहीम कोल्हापूर जिल्ह्यात राबविण्यात येणार असून या मोहिमेचा शुभारंभ श्री.आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आला.

या मोहिमेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सोबतीने तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणेमार्फत घरकुल लाभार्थ्यांच्या सोयीसाठी सर्व योजनांचा कृतीसंगम एकाच व्यासपीठावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. बहुतांश लाभार्थी हे ग्रामीण व डोंगरी भागात राहत असल्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा, आरोग्य, शिक्षण व अन्य सुविधा पुरवून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. यामुळे लाभार्थ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होईल.

या विषयाच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, जिल्ह्यात मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांना घरकुले उपलब्ध करुन देताना ‘आम्ही सोबती घरकुलाचे’ या मोहिमेअंतर्गत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, आरोग्य, शिक्षण, रस्ते, वीज पुरवठा, कौशल्य प्रशिक्षण, गृह कर्ज देण्यासाठीही चोख नियोजन करा. त्याचबरोबर यासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या देण्याचे काम संबंधित विभागांनी वेळेत पूर्ण करावे. जिल्ह्यातील बहुतांश लाभार्थी हे ग्रामीण व डोंगरी भागात राहत असल्यामुळे त्यांना चांगल्या सुविधा, आरोग्य, शिक्षण व अन्य सुविधा पुरवून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यासाठी प्रयत्न करा. तसेच ही मोहीम राज्याला मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने काम करुन मोहीम यशस्वी करा, असेही त्यांनी सूचित केले.

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, आजवर प्रत्येक योजना कोल्हापूर जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यात आली आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचे काम प्रभावीपणे करून राज्यात कोल्हापूर जिल्हा अग्रेसर ठरण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.

१० एप्रिल पर्यंत घरकुल बांधून पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना बक्षीस

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी या योजनेचे सादरीकरण केले. ते म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजने मधून चालू आर्थिक वर्षात सुमारे 700 कोटी रुपयांचा निधी जिल्ह्याला उपलब्ध झाला आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जवळपास 94 टक्के घरकुले पूर्ण करण्यात आली आहेत. या दुसऱ्या टप्प्यातही घरे उपलब्ध करुन देताना विविध योजनांचा कृती संगम घडवून लाभार्थ्यांना सर्व सोयीसुविधांनी युक्त घरकुले उपलब्ध करुन देण्याचे नियोजन केले आहे. घर गृहलक्ष्मीचे, प्रधानमंत्री सूर्य घर, गृह कर्ज, हर घर जल, उज्वला गॅस, स्वच्छ भारत मिशन, तसेच वीज कनेक्शन देण्यात येणार आहे. तसेच नाविन्यपूर्ण योजनेतून बहुमजली इमारती उभ्या करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प म्हणून प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करुन घरकुलाची निर्मिती करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

आम्ही सोबती घरकुलाचे या मोहिमे अंतर्गत घरकुलाचे काम स्पर्धात्मक होण्यासाठी एक विशेष प्रतियोगिता सुरु करण्यात आली आहे. 2 फेब्रुवारी ते 10 एप्रिल 2025 या कालावधीत घराचे काम पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना बक्षीस स्वरुपात गृहोपयोगी वस्तू देण्यात येणार असून लाभार्थ्यांनी या मोहिमेचा लाभ घेवून जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी 10 एप्रिल पर्यंत आपले घरकुल बांधून पूर्ण करावे, असे आवाहन कार्तिकेयन एस. यांनी केले.

बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नाबार्डचे व्यवस्थापक, गटविकास अधिकारी, ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक तसेच संबंधित विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

०००

नूतनीकरण केलेल्या जिल्हाधिकारी दालनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर,दि. ०२ : जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या सुसज्ज दालनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या नूतनीकरण केलेल्या दालनासह राजर्षी शाहू सभागृह, अभ्यागतांसाठी प्रतिक्षा कक्ष व स्वीय सहायक कक्षाचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. यावेळी नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार छत्रपती शाहु महाराज, खासदार धैर्यशील माने, सर्वश्री आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे आदी उपस्थित होते.

०००

The post first appeared on .

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.