मोठी बातमी! अर्धा लाख शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत; चालू आर्थिक वर्षाचे ११०० कोटी मिळेनात; 'इतक्या' शाळा व तुकड्यांचे २० टक्के वाढीव टप्पा अनुदान रखडले
esakal February 03, 2025 12:45 PM

सोलापूर : राज्यातील जवळपास अंशत: व विनाअनुदानित तीन हजार शाळा, १५ हजार तुकड्यांना वाढीव २० टक्क्यांचे टप्पा अनुदान मार्च २०२५ पर्यंत अपेक्षित आहे. मात्र, आर्थिक वर्ष संपायला दोन महिनेच शिल्लक आहेत, तरीदेखील वाढीव टप्पा अनुदानासाठी निधी मिळाला नसल्याने अर्धा लाख शिक्षक पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत. सेवक संच रखडल्याने व सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्याने शिक्षण खात्याकडून निधीसाठी प्रस्तावच पाठविण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.

राज्यातील ७७१ शाळा व ३८३ तुकड्या मागील ११ वर्षांपासून २० टक्के अनुदानावरच आहेत. त्यांना मागच्या वर्षी २० टक्के अनुदान मिळाले, त्यांनतर याच अंशत: व विनाअनुदानित शाळा व तुकड्यांना अद्याप वाढीव टप्पा मिळालेला नाही. त्या शाळा व तुकड्यांना ४३० कोटींचा निधी अपेक्षित आहे. त्यानंतर २० टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर आलेल्या २२८ शाळा व २६५० तुकड्यांना पुढचा वाढीव टप्पा (दरवर्षी २५० कोटी) यंदा मिळालेला नाही. तसेच यावर्षी राज्यातील दोन हजार नऊ शाळा व चार हजार ११ तुकड्यांचे टप्पा अनुदान ८० टक्के व्हायला हवे होते, पण त्यासाठी ३७६ कोटींचा निधी न मिळाल्याने त्या शाळा व तुकड्या अजूनही ६० टक्क्यांवरच आहेत.

तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या मार्च २०२३ मधील निर्णयानुसार राज्यातील ३४२७ अंशत: व विनाअनुदानित शाळा व १५ हजार ५७१ तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदानासाठी ११६० कोटी रुपये देणे अपेक्षित होते. मात्र, चालू २०२४-२५ या आर्थिक वर्षात तब्बल अर्धा लाख शिक्षक वाढीव टप्पा अनुदानासाठी कधी निधी मिळणार, याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे चालू शैक्षणिक वर्षातील सेवकसंच देखील अजूनपर्यंत झालेला नाही. त्यामुळे त्यांना आता पुढच्याच आर्थिक वर्षात वाढीव टप्प्यासाठी निधी मिळेल, असेही विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.

शासनाकडून अनुदान मिळाल्यावर वाढीव अनुदान

अंशत: अनुदानित शाळा व तुकड्यांना वाढीव २० टक्के अनुदान सध्या देय आहे. शासनाकडून अनुदान प्राप्त होताच, संबंधित पात्र शाळा व तुकड्यांना वाढीव टप्पा अनुदान वितरीत केले जाईल.

- डॉ. संपत सूर्यवंशी, संचालक, माध्यमिक शिक्षण

वाढीव टप्पा अनुदानाची स्थिती

  • वाढीव अनुदानास पात्र शाळा

  • ३,४२७

  • टप्पा अनुदानाची प्रतीक्षा

  • १५,५७१ तुकड्या

  • पगारवाढीतील अंदाजे शिक्षक

  • ५१,०००

  • वाढीव टप्प्यासाठी अपेक्षित निधी

  • ११०० कोटी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.