संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज तिसऱ्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. या चर्चेवेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भाजपवर हल्लाबोल केला. मेक इन इंडिया चांगली कल्पना होती. पंतप्रधानांनी प्रयत्न केला पण ते अयशस्वी ठरल्याचं राहुल गांधी म्हणाले. लोकसभेत बोलण्यासाठी उभा राहताच राहुल गांधी यांनी सभापती ओम बिर्ला यांचे आभार मानले. तसंच कॅमेऱ्यासाठीही डबल थँक्यू म्हटलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणात काही नवं नाही. बेरोजगारीचा उल्लेख नाही. युपीए किंवा एनडीए दोघांनीही तरुणांना नोकरीच्या प्रश्नावर उत्तर दिलं नाही असंही राहुल गांधी यांनी म्हटलं.
चीनने भारतीय जमीनीवर ताबा मिळवल्याचं विधान राहुल गांधी यांनी केलं. तसंच परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या अमेरिका दौऱ्याचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी म्हटलं की, आम्ही पंतप्रधानांना निमंत्रण आणण्यासाठी अमेरिकेला पाठवत नव्हतो. यावर किरेन रिजिजू यांनी आक्षेप घेतला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अशी विधाने करू नयेत. गंभीर विषयावर चर्चा सुरू आहे असं म्हटलं. राहुल गांधी म्हणाले की, जयशंकर यांना तीनदा अमेरिकेला पाठवलं. जर माझ्या विधानाने विचलित झाला असाल तर माफी मागतो.
राहुल गांधी संविधान दाखवत हे संविधान मतांच्या पाठिंब्याने भक्कम होतं असं म्हटलं. यावेळी राहुल गांधींनी महाराष्ट्रातील निकालाचा उल्लेख केला. लोकसभा निवडणुकीत राज्यात इंडिया आघाडीला चांगलं यश मिळालं. पण त्यानंतर विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यात हिमाचल प्रदेशाच्या एकूण मतदारांइतके नवे मतदार महाराष्ट्रात नोंद झाले. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात जे घडलं नाही ते शेवटच्या पाच महिन्यात कसं घडलं? शेवटच्या पाच महिन्यात ७० लाख मतदारांची नोंद झाली.
शिर्डीत एका इमारतीत सात हजार नव्या मतदारांची नोंद झाली. मी आरोप नाही करत. फक्त इतकंच म्हणेन की काही तरी अडचण नक्की आहे. हिमाचल प्रदेशाइतके मतदार लोकसभा निवडणुकीनंतर जादूने आले का? आम्ही निवडणूक आयोगाकडे एकच साधी मागणी केलीय की लोकसभेची मतदार यादी, नाव आणि पत्ता द्या. तसंच विधानसभेची मतदारयादी द्या. महाराष्ट्रात नव्याने नोंद झालेल्या मतदारांची संख्या जिथं जास्त आहे तिथं भाजपचा सुपडा साफ झाला होता. याचा डेटा आमच्याकडे असल्याचंही राहुल गांधी यांनी लोकसभेत सांगितलं.