अशी 'दंगल' नको
esakal February 04, 2025 02:45 PM
अग्रलेख

खेळात राजकारण नको आणि राजकारणात खिलाडूवृत्ती हवी, असे म्हटले जाते. पण या दोन्ही उक्तींचा सपशेल पराभव पाहायचा असेल तर तो कुस्तीच्या आखाड्यात पाहायला मिळतो आहे. अहिल्यानगरमधील ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्तीस्पर्धेतील निकालांमुळे समोर आलेले चित्र याचाच प्रत्यय देणारे होते. ही स्पर्धा जशी वादामुळे गाजली, तशी बक्षिसांमुळेही. ‘महाराष्ट्र केसरी’ पृथ्वीराज मोहोळ आणि त्या आधीचा ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षे यांच्यातील कुस्ती वादात सापडली. त्यानंतर झालेल्या किताबी लढतीतही त्याचीच पुनरावृत्ती झाली. त्यामुळे कुस्तीप्रेमींसह सर्वसामान्यांच्या भुवया उंचावल्या.

त्यांना निकाल पटला नाही आणि निकालानंतर घडलेले नाट्यही रुचले नाही. कुस्तीगीर संघ म्हणतो, शिवराज चीतपट झाला, त्यामुळे त्या निर्णयाला आव्हान देता येत नाही, तर शिवराज म्हणतो, आव्हान असेल तर निकाल जाहीर करता येत नाही. दुसरे म्हणजे निकाल दिल्याशिवाय आव्हान देणार कसे? असा नियमांचा पट आणि धोबीपछाड देणारी ही सगळी गुंतागुंत आहे.

यानिमित्ताने ‘बगल डुब’सारखे अनेक प्रश्न उफाळून आले आहेत. मुळात ही ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा अधिकृत आहे की नाही, इथपासून चर्चा सुरू होते. वादाचे मूळ संघटनेतच आहे. राजकीय मंडळी कुस्ती संघटनेत आणि कुस्तीगीर राजकीय पक्षात आहेत. त्यामुळे आपसूक दोन्हीकडे एकमेकांचे प्रतिबिंब दिसतेय.

राजकारणात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस दोन पक्षांत विभागली, तशीच कुस्ती संघटनेची गत. कुस्तीगीर परिषद महाराष्ट्रात गेल्या पन्नासहून अधिक वर्षे काम करते. तीच संघटना ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धा घेत आली आहे. मल्ल आणि पंचही याच संघटनेसोबत होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून कुस्ती संघटनेत राजकारण उफाळून आले. भारतीय कुस्ती महासंघाने या राज्य संघटनेची संलग्नता काढून घेतली.

‘महाराष्ट्र कुस्तीगीर संघ’ नावाची संघटना उदयास आली. तिला ‘भारतीय कुस्ती महासंघाने’ बळ दिले. आम्हालाच संलग्नता असल्याचं सांगू लागले. आता या महासंघावर ब्रिजभूषणसिंहसारख्या भाजप नेत्याचे वर्चस्व होते. आपसूकच महाराष्ट्रातही या कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष भाजप नेते रामदास तडस झाले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ उपाध्यक्ष आहेत.

तो महासंघही दिल्लीतील आंदोलनामुळे बरखास्त झाला आहे. दोन वर्षांपूर्वी झालेला कुस्तीगीर संघ आपली ६७ वर्षांची परंपरा असल्याचे सांगतो, तर दुसरीकडे कुस्ती महासंघ कुस्तीगीर परिषदेची संलग्नता काढू शकतो. उभय संघटनांची ताब्यासाठीची कुस्ती न्यायालयात गेली आहे, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉँग्रेससारखीच. निकालावर आक्षेप घेणारा शिवराज राक्षे कुस्तीगीर परिषदेचे पदाधिकारी काका पवार यांचा पठ्ठा आहे.

रिव्ह्यू का पाहिला नाही, एक भूजा टेकली असताना शिवराज चीतपट कसा, चीतपट निकालाला आव्हान देता येत नाही, असे असले तरी पारदर्शकता म्हणून रिव्ह्यू पाहायला काय हरकत होती, असे कुस्तीप्रेमींना वाटले. शिवराज जेव्हा ‘महाराष्ट्र केसरी’ झाला, तेव्हा त्याला पंचांबाबत आक्षेप नव्हता. मग आता पराभूत झाल्यावर का? मुळात तिसऱ्या पंचाकडे गेले तरी तो पारदर्शक निकाल देईलच, याची खात्री नाही.

या असल्या वादग्रस्त निर्णयाने अनेक खेळाडूंचे करिअर बरबाद झाले. ‘महाराष्ट्र केसरी’ तर लाल मातीचा अभिमान आहे. देशातील ही सर्वांत मोठी आणि मानाची स्पर्धा मानली जाते. त्यासाठी पहिलवान आपले उभे आयुष्य खर्ची घालतो. याच भूमीतील खाशाबा जाधव यांनी देशाला पहिले पदक मिळवून दिले होते. त्यानंतर कित्येक वर्षे पदकांची झोळी रिकामी होती.

खाशाबांवरील पुस्तकात त्यांच्यावर झालेला अन्याय, कुस्तीतील राजकारणाचा उल्लेख आढळतो. त्यामुळे कुस्तीतील राजकारण हे आजचे नाही. मात्र आता त्याने अगदी उघडेवागडे रूप धारण केले आहे, ही चिंतेची बाब आहे. आमदार संग्राम जगताप यांनी कुस्तीप्रेमापोटीच सर्वांची एवढी सरबराई केली. कोणाही आयोजकाला स्पर्धा यशस्वी करायची असते. त्यांनी ते परोपरीने केले. पण अखेर वादामुळे गालबोट लागलेच.

‘महाराष्ट्र केसरी’ नरसिंग यादवने हरवले म्हणून याच नगरीत त्याला मारहाण झाली होती. उत्तर भारतीयांनी नेहमीच महाराष्ट्राच्या मल्लांवर अन्याय केला. आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे हे एकच उदाहरण सांगता येईल. ‘‘पिला (गोल्ड) हमारा, बाकी सब तुम्हारा’’, असे दिल्लीतील एक मोठा पदाधिकारी महाराष्ट्रातील मल्लांना म्हणायचा.

ही त्यांची दादागिरी हिमनगाचे टोक. ‘ज्याच्या बाजूने यंत्रणा त्याचं चांगभलं’ असे आजचे दिवस. म्हणून निकाल पटला नाही, तर डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये रेफ्रीची धुलाई करतात, तसे कुस्तीपटूंनी करणे कदापि समर्थनीय नाही. पण व्यवस्था नि यंत्रणांनीही तशी वेळ आणता कामा नये. नाहीतर शिवराजने मारलेली लाथ ही पंचांना नव्हे, तर व्यवस्थेला होती, असे नाईलाजाने म्हणावे लागेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.