मुलींसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग
esakal February 04, 2025 02:45 PM

महेंद्र गोखले - फिटनेसविषयक प्रशिक्षक

मी दररोज बऱ्याच अशा मुलींना भेटतो ज्यांना स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू करण्यासाठी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. त्या मुलींना असं वाटतं, की व्यायामाचे एकच ध्येय आहे ते म्हणजे वजन कमी करणे; पण शरीराचा फिटनेस असणे म्हणजे वजन कमी करणे नव्हे. हा केवळ एक गैरसमज आहे. शरीराने सुडौल नसणाऱ्या कितीतरी व्यक्ती खूप फिट असू शकतात. त्यामागे आपण आपल्या शरीराचे एकूण आरोग्य चांगले ठेवले पाहिजे हा विचार असतो किंवा असायला हवा. अगदी व्यायामाच्या शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं, तर शरीराचे वजन कमी होणे तितकेसे गरजेचे नाही जितके चरबी म्हणजे फॅट कमी करणे गरजेचे आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे, की वजन कमी करणे म्हणजे फिटनेस साध्य करणे नाही.

आता चरबी म्हणजेच फॅट कमी करण्यासाठी काय करावे लागते? तर त्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंगबरोबरच योग्य आहाराची ही गरज असते. स्ट्रेंथ ट्रेनिंग याबद्दल बरेच गैरसमज आहेत. स्ट्रेंथ ट्रेनिंगचा संबंध बऱ्याच मुली वेट लिफ्टिंगशी जोडतात. त्यामुळे वेटलिफ्टिंग केल्याने आपले शरीर मर्दानी दिसेल किंवा आपल्याला काही दुखापत होईल अशी त्यांना भीती वाटते. खरंतर सगळ्या मुलींनी आपल्या फिटनेसमध्ये स्ट्रेंथ ट्रेनिंगसुद्धा केलं पाहिजे. अशा ट्रेनिंगचा त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम होतो.

आपण आता स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे आणखी काय फायदे होतात यावर सविस्तर चर्चा करू.

चयापचय वाढते

आपलं वय जसजसं वाढतं तशी चयापचय क्रिया नैसर्गिकरित्या मंदावते, त्याचबरोबर शरीराचं वजन संतुलित ठेवणंही कठीण जातं; पण स्ट्रेंथ ट्रेनिंगमध्ये सातत्य राखल्यामुळे विश्रांतीच्या काळातही कॅलरीज बर्न होऊन चयापचय क्रिया सुधारते आणि वजन संतुलित राखायला मदत होते.

मसल मासचे संतुलन आणि शरीर रचनेत सुधारणा

बऱ्याच मुली आपलं शरीर मर्दानी दिसेल, या भीतीपोटी स्ट्रेंथ ट्रेनिंग टाळतात आणि खूप हलकी वजनं उचलण्याचा व्यायाम करतात; परंतु वस्तुस्थिती ही आहे, की मुलींमध्ये शरीर बलदंड होण्यासाठी पुरुषांइतकं टेस्टोस्टेरॉन नसते. ज्या मुली बॉडीबिल्डर्स असतात, त्या तसं होण्यासाठी अतिशय टोकाचा आहार घेतात आणि तीव्र स्ट्रेंथ ट्रेनिंग करतात. आपल्या शरीरासाठी आवश्यक असं स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं, तर मुलींना शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी फायदा होतो.

यामुळे त्यांचे फक्त सध्याचे नाही, तर भविष्यातलंही आरोग्य सुधारतें. शरीराची रचना म्हणजे फॅटचं वजन आणि फॅट फ्री वजन यांचं गुणोत्तर होय. स्ट्रेंथ ट्रेनिंग नियमितपणे केलं, तर आपण ‘मसल मास’ संतुलित ठेवू शकतो आणि फॅट मास कमी करू शकतो. असं केल्यानं आपल्या शरीराची रचना सुडौल होते. फिटनेसच्या प्रवासामध्ये आपलं शरीर अशी रचना साध्य करू शकते का आणि आपण आपल्या आवडत्या कपड्यांमध्ये फिट होतो का हे बघणं म्हणजे आपल्या फिटनेसच्या प्रवासाची प्रगती मोजण्यासारखं आहे.

स्नायूंच्या नुकसानीला आळा घालते

वयाच्या तिसाव्या वर्षानंतर, महिलांचं ‘मसल मास’ प्रत्येक दहा वर्षाला तीन ते पाच टक्के कमी होतं. त्यामुळे वयस्कर स्त्रियांमध्ये हे ‘मास’ आणखीन जास्त कमी झालेलं आढळतं. त्यामुळे शारीरिक हालचाली मंदावतात आणि अशक्तपणा वाटू लागतो. काही वेळा याचा परिणाम शारीरिक अपंगत्वामध्ये होऊ शकतो. नियमितपणे स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं, तर अशा स्थितीपासून आपण दूर राहू शकतो. त्यासाठी प्रत्येक मुलीनं मसल आणि स्ट्रेंथ निर्माण करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग सुरू केलं पाहिजे.

हाडांचे आरोग्य सुधारते

विसाव्या वर्षांपर्यंत प्रत्येक व्यक्तीमध्ये बोन मास जास्तीत जास्त तयार होऊ शकतं. (बोन मास म्हणजे हाडांमध्ये असलेल्या खनिजांचं वजन उदाहरणार्थ कॅल्शियम फॉस्फरस वगैरे). तरुण मुलींनी याचा फायदा घेऊन ‘बोन मास’ वाढवण्यासाठी नियमितपणे स्ट्रेंथ ट्रेनिंग करावं. तरुण वयात तसं केलं नसेल, तर मेनोपॉजच्या वयाच्या जवळपास असणाऱ्या महिलांना ऑस्टिओपोरोसिसचा धोका जास्त असतो (यामध्ये हाडे कमकुवत आणि ठिसूळ बनतात). जसजसं आपलं वय वाढतं, तसतसं बोन मास कमी होतं. बोन मासचं संतुलन राखण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, तर ‘ऑस्टिओपोरोसिस’ होऊ शकतो ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. नियमित स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि पोषक आहार यांच्या मदतीनं हे थांबवता येतं.

आत्मविश्वास वाढवते आणि कणखर बनवते

स्ट्रेंथ ट्रेनिंगमुळे आपण आपल्याला हव्या त्या हालचाली हव्या तेव्हा अगदी मनसोक्त आणि आत्मविश्वासानं करू शकतो. यामुळे हालचालींमध्ये एक ठामपणा येतो आणि आपलं जीवनमान उंचावतं. आपला आत्मविश्वास सुधारल्यामुळे आयुष्याची गुणवत्ता वाढते. मात्र, स्ट्रेंथ ट्रेनिंग एका अनुभवी प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनानेच करा.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.