Political Leaders Respond to Actor's Claims on Shivaji Maharaj's Agra Escape : आग्रा येथून सुटका करून घेताना छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन सुटून करून घेतली होती, असा दावा अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नुकताच केला होता. त्यांच्या या विधानानंतर मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर विविध प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत, अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनीही यावरून राहुल सोलापूरकर यांच्यावर टीकास्र सोडलं आहे.
जितेंद्र आव्हाड आणि अमोल मिटकरी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत संताप व्यक्त केला आहे. ''छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून स्वकर्तुत्वावर निसटले. हा इतिहास महाराष्ट्राच्या मनामनात कोरलेला असताना जाणीवपूर्वक राहुल सोलापुरकर याने छत्रपती शिवरायांची बदनामी करण्याची चाल खेळली आहे. याबाबत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी सभागृहात करेल'', अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.
पुढे बोलताना, ''राहुल सोलापुरकर याने आपण 'टकलू हैवान' असल्याचं सिद्ध केलं आहे. त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत वादग्रस्त विधान करत आपल्या विकृत मानसिकतेतून इतिहासाची मोडतोड केली आहे. हे शिवप्रेमी म्हणून कधीच खपवून घेतल्या जाणार नाही'', असा इशाराही अमोल मिटकरी यांनी दिला.
शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राहुल सोलापूरकर यांच्या विधानानंतर आक्रमक भूमिका घेतली आहे. ''हिरकणी झालीच नव्हती. हिरकणी नावाचे व्यक्तिमत्व अस्तित्वातच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे आग्र्याहून लाच देऊन निघाले, अशा पद्धतीने इतिहासाचे विकृतीकरण करणारा हा राहुल सोलापूरकर कोण महामूर्ख?'' असा संताप जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला.
''हा मुर्ख माणूस सध्या महाराष्ट्राला इतिहासाचे डोस पाजतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न अशा या फडतूस माणसांकडून केला जातोय, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच आहे, या महामुर्खाने आपल्या तोंडाला टाळे लावावे''. असे ते म्हणाले. तसेच शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.
राहुल सोलापूरकर नेमकं काय म्हणाले होते?अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका मुलाखतीत बोलताना शिवाजी महाराजांच्या आग्रा भेटीचा उल्लेख केला होता. याबाबत बोलताना शिवाजी महाराजांनी आग्रा येथून लाच देऊन सुटका करून घेतली होती, अशा दावा त्यांनी केला होता. “ त्यावेळी पेटारे-बिटारे काहीच नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्रा येथून सुटून आले होते. त्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोलादेखील लाच दिली होती. महाराजांनी औरंगजेबाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं पत्र घेतलं होतं. तो परवाना दाखवून महाराज आग्रा येथून बाहेर पडले होते, असं ते म्हणाले होते.