‘‘डबल इंजिन असलेले सरकारच बदल घडवून आणू शकते,’’ असे सांगत आम आदमी पक्षाचे(आप) दिल्ली मॉडेल पूर्णपणे अपयशी ठरले असल्याची टीका आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी येथे केली. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांसाठी नायडू यांनी दिल्लीत प्रचार केला. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
‘‘देशाला आम्ही हैदराबाद मॉडेल दिले. हिरवळीपासून ते पाण्यापर्यंत सर्व बाबींचा विचार केला तर हैदराबाद शहर हे राहण्यास योग्य आहे. हैदराबादमध्ये आम्ही नऊ महिन्यांत पाणी घेऊन आलो. तर इकडे दहा वर्षे सत्तेत असूनही ‘आप’ सरकारला यमुना नदी स्वच्छ करता आली नाही,’’ असा टोलाही नायडू यांनी यावेळी लगावला.
‘मोठे बदल घडवून आणू’राजधानी दिल्लीत डबल इंजिनचे सरकारच मोठे बदल घडवून आणू शकते, असा दावा नायडू यांनी केला. ‘‘दिल्लीतील वायू प्रदूषण आणि राजकीय प्रदूषण या दोन्ही बाबी आरोग्यासाठी धोकादायक आहेत. दिल्ली सरकारचे दहा वर्षांचे मॉडेल हे फोल ठरलेले सरकारी मॉडेल आहे.
दिल्ली मॉडेलमध्ये पैसा कोठून येतो? दिल्ली आणि पंजाबमध्ये ‘आप’चे सरकार सत्तेत आहे. याठिकाणी गटारीचे पाणी आणि पिण्याचे यात फारसा फरक नाही,’’ असा गंभीर आरोपही त्यांनी केला. दिल्लीतील रस्ते कचऱ्याने भरलेले आहेत.
देशाच्या राजधानीत लोक करिअर बनवण्यासाठी येत असत. मात्र आता लोक दिल्लीच्या बाहेर जात आहेत, अशी टिप्पणी नायडू यांनी केली. केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया विचारली असता यावेळचा अर्थसंकल्प हा रोजगार निर्मितीवर लक्ष्य केंद्रित करणारा आहे. २०४७ पर्यंत भारत विकसित होईल, असे नायडू म्हणाले.