PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट, तारीखही ठरली; कसा असेल अमेरिका दौरा? जाणून घ्या...
esakal February 04, 2025 03:45 PM

PM Modi's Upcoming US Visit : डोनाल्ड ट्रम्प हे पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी लवकरच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार असून यादरम्यान ही भेट होणार आहे. दोन्ही देशांच्या संबंधांच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी यांचा हा अमेरिका दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १२ फेब्रुवारी रोजी दौऱ्याची सुरुवात होईल. तत्पूर्वी पंतप्रधान मोदी हे पॅरिसमध्ये असतील. १२ फेब्रुवारी रोजी ते पॅरिसमधून थेट वॉशिंगटनच्या दिशेने रवाना होतील. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प आणि पंतप्रधान मोदी यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती पुढे आली आहे.

कसा असेल पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा?

पंतप्रधान मोदी १३ फेब्रुवारी रोजी वॉशिंगटनमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतील. त्यानंतर ते अमेरिकेतील काही उद्योगपतींचीदेखील भेट घेणार आहेत. याशिवात ते अमेरिकेतील भारतीय समुदायांशीदेखील चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

कोणत्या मुद्द्यांवर होईल चर्चा?

दोन्ही देशांतील संबंधांच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातो आहे. यादरम्यान, द्विपक्षीय व्यापार, सुरक्षा, इंडो पॅसिफिक रिजनमधील सहयोग, उर्जा, एआय, व्हिझा, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान मोदी-ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा..

डोनाल्ड ट्र्म्प यांनी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींना फोनवरून त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशातील संबंध मजबूत करण्यावर भर दिला होता. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांनीही पंतप्रधान मोदींना अमेरिका येण्याचं निमंत्रण दिलं होतं. त्यानंतर आता पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार आहेत. या भेटीकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.