‘‘दिल्लीत भाजपचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम आदमी पक्षाचे(आप) नेते अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री असताना ज्या ‘शीशमहल’मध्ये राहत होते, तो जनतेला पाहण्यासाठी खुला केला जाईल,’’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी जंगपूरा येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना सांगितले.
‘आप’ सरकारच्या गैरव्यवहारातून आलेला पैसा शीशमहल बनविण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. ‘‘एका घरामुळे समाधान न झाल्यामुळे केजरीवाल यांनी आलिशान शीशमहल बनविला.
शीशमहल बनविण्यासाठी दिल्लीकर जनतेचे ५१ हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले. मुख्यमंत्री बनलो तर घर, कार आणि सुरक्षा घेणार नाही, असे केजरीवाल यांनी २०१३ मध्ये सांगितले होते. त्या आश्वासनांचा केजरीवाल यांना विसर पडला,’’ असे शहा म्हणाले.
सिसोदियांवर टीकादिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांनी दिल्लीतील जवळपास प्रत्येक मंदीर, शाळा आणि गुरुद्वाराजवळ मद्यालय उघडल्याचा आरोप शहा यांनी केला. ‘‘सिसोदिया यांनी पटपडगंज मधील लोकांची फसवणूक केली.
निवडून येण्याची खात्री नसल्याने ते यावेळी जंगपुरा मध्ये आले आहेत. शिसोदिया हे एकमेव असे शिक्षण मंत्री असावेत, की ज्यांनी तुरुंगवारी केली असावी,’’ असे शहा म्हणाले. यावेळच्या निवडणुकीत केजरीवाल आणि सिसोदिया या दोघांचा पराभव नक्की आहे. ‘बडे मिया- छोटे मियाँ ’ या दोघांनी दिल्लीकरांची फसवणूक केली आहे, असा आरोप शहा यांनी केला.