किल्लेधारूर - धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील केज तालुक्यातील तरनळी येथे (ता. ५) रोजी दुपारी वाल्मीक कराड व मुंडे साहेबांच्या बातम्या पाहिल्या तर तुझा संतोष देशमुख करू, म्हणत गावातील दोन युवकांनी तरनळी येथील अशोक मोहिते याला लाथा बुक्क्या, लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण करून जखमी केले असून तो रुग्णालयात उपचार घेत असून त्याचा मावस भाऊ बाळासाहेब भोसले याच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये २ जनावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
धारूर पोलीस स्टेशन हद्दीतील व केज तालुक्यातील तरनळी गावामध्ये (ता. ५) फेब्रुवारी बुधवार रोजी दुपारी अडीच वाजता गावातील रमाई चौक या ठिकाणी अशोक शंकर मोहिते हा मोबाईल वर व्हिडिओ पाहत असताना गावातील एका लाल रंगाच्या MH 44 R 9294 या मोटार सायकलवर वैजनाथ भारत बांगर ,अभिषेक सिद्धेश्वर सानप हे दोघे आले व त्यांनी अशोक मोहिते याला लाथाबुक्याने, लोखंडी रॉड, कोयत्याने मारहाण केली व यापुढे वाल्मीक कराड व मुंडे साहेबांच्या बातम्या पाहिल्या तर तुझा संतोष देशमुख करू म्हणत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.
जखमी अशोक मोहीते याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार चालू आहे. मोहिते यांचा मावस भाऊ बाळासाहेब भोसले याच्या फिर्यादीवरून धारूर पोलीस स्टेशनमध्ये सानप व बांगर यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक देविदास वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.