सोलापूर : विजयपूर रोडवरील संत तुकाराम नगरातून चारचाकी (एमएच १३, डीवाय ५७१९) चोरणाऱ्या दोघांना विजापूर नाका पोलिसांनी जेरबंद केले आहे. रमेशकुमार प्रभुराम बिश्नोई (वय २५, रा. मासोई की डाणी सिया, सांचौर, राजस्थान) व रुपाराम मनाराम बिश्नोई (वय ३२, रा. पुनासा, ता. भिनमाल, राजस्थान) अशी जेरबंद केलेल्या संशयित तरुणांची नावे आहेत. त्यांना उद्या (गुरुवारी) जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. गुजरात व राजस्थानच्या सीमेवर अवैध दारू वाहतुकीसाठी त्यांनी वाहन चोरल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
आण्णाराव म्हेत्रे यांच्या घरासमोरून १६ जानेवारी रोजी दोघांनी चारचाकी कार चोरुन नेली होती. त्यांनी विजापूर नाका पोलिसांत फिर्याद दिली आणि पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला. पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त यशवंत गवारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, पोलिस निरीक्षक संगीता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वातील पथकाने गाडी चोरणाऱ्या दोघांना राजस्थानातून शोधून काढले. त्यातील एकाविरुद्ध पूर्वीचे सात व दुसऱ्याविरुद्ध चार गुन्हे दाखल आहेत.
दोघेही सराईत गुन्हेगार असून यापूर्वी देखील चोरीच्या गुन्ह्यात त्यांच्यावर कारवाई झाली आहे. तरीदेखील, त्यांनी चोरीचा नाद सोडून दिला नाही, असेही पोलिसांनी सांगितले. ही कामगिरी सहायक पोलिस निरीक्षक श्री. गायकवाड यांच्या नेतृत्वात पोलिस हवालदार सचिन हार, गणेश शिर्के, शंकर भिसे, अमृत सुरवसे, राहुल विटकर, संतोष माने, श्रीनिवास बोल्ली, समाधान मारकड, सद्दाम अबादीराजे, स्वप्नील जाधव, रमेश कोर्सेगाव, हरिकृष्ण चोरमुले, अयाज बागलकोटे, अर्जुन गायकवाड यांच्या पथकाने पार पाडली. पोलिस आयुक्तांनी त्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.
चोरीचे ठिकाण शोधण्यासाठी गुगल मॅपचा वापर
राजस्थानातून सोलापुरात चारचाकी कार घेऊन आलेल्या दोघांनी गुगल मॅपवरून सोलापूर शहर परिसरात ज्याठिकाणी लोकांची व वाहनांची वर्दळ कमी अशा ठिकाणाची माहिती पाहिली. त्यावेळी त्यांना संत तुकाराम नगरातील आण्णाराव म्हेत्रे यांच्या घरासमोरील चारचाकी कार गुगल मॅपवर दिसली. त्यांनी सावज निश्चित करुन रात्रीच्यावेळी गाडी चोरली आणि तेथून रातोरात पसार झाले. पण, सोलापूर शहर पोलिसांनी अखेर त्यांना पकडलेच.