अखेर पार्किंगच्या विळख्यातून म्हाडाच्या हिरकणी कक्षाची सुटका, स्तनदा मातांना दिलासा
Marathi February 06, 2025 06:24 AM

म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनाच्या आवारामधील हिरकणी कक्ष पार्किंगच्या विळख्यात अडकला असून ताह्या बाळासह महिलांनी या कक्षात पोहोचायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत दै. ‘सामना’ने ‘पार्किंगच्या विळख्यात अडकला म्हाडाचा हिरकणी कक्ष’ या मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. अखेर दै. ‘सामना’च्या दणक्यानंतर म्हाडा प्राधिकरण खडबडून जागे झाले असून हिरकणी कक्षाजवळील पार्किंग हटवत महिलांना या कक्षात येण्या-जाण्यासाठी रस्ता मोकळा केला आहे. तसेच कुणी या ठिकाणी वाहने पार्र करू नये यासाठी कुंड्यादेखील लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

म्हाडाच्या गृहनिर्माण भवनाच्या इमारतीमध्ये विविध कामानिमित्त ताह्या बाळासह येणाऱ्या महिलांची गैरसोय होऊ नये यासाठी झोपडपट्टी सुधार मंडळाच्या माध्यमातून हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे, मात्र हा हिरकणी कक्ष पार्किंगच्या एका कोपऱ्यात  उभारण्यात आला आहे. काही वेळा पार्ंकगमधील गाडया हिरकणी कक्षाच्या दरवाजाला अगदी चिटपून उभ्या राहत होत्या. त्यामुळे या कक्षात ताह्या बाळासह महिलांनी प्रवेश करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित झाला होता. परिणामी हा कक्ष धूळ खात पडला होता. त्यामुळे अडगळीत उभारण्यात आलेल्या या कक्षाची जागा बदलावी, अथवा येथील पार्ंकग हटविण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत होती.

पार्किंग हटवलीपण सोयीसुविधांचे काय?

हिरकणी कक्षात येणाऱ्या महिलांना पिण्यासाठी आरओचे पाणी, वॉश बेसिन आणि स्वच्छतागृह या सुविधा देणेदेखील बंधनकारक आहे. म्हाडातील हिरकणी कक्षात या सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे पार्किंग हटवली, पण सोयीसुविधांचे काय, हा प्रश्न मात्र अजूनही प्रलंबितच आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.